संघ शिक्षा वर्गात रक्तदानाचा यज्ञ; २३ स्वयंसेवकांचे रक्तदान

सोलापूर, दिनांक ३ मे २०२६ :
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गाच्या सांगता समारंभाचे औचित्य साधून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. हेडगेवार रक्तपेढीच्या वतीने राबवण्यात आलेल्या या उपक्रमात २३ स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. स्वयंसेवकांमध्ये रक्तदानाचे महत्त्व रुजावे, या उद्देशाने हा कृतिशील उपक्रम हाती घेण्यात आला होता.
सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेत पश्चिम महाराष्ट्र प्रांताचा हा संघ शिक्षा वर्ग ३० मे रोजी संपन्न झाला. १५ दिवस चाललेल्या या वर्गाच्या समारोपप्रसंगी वैद्यकीय निकषांनुसार पात्र ठरलेल्या स्वयंसेवकांनी रक्तदान केले. डॉ. हेडगेवार रक्तकेंद्राचे डॉ. श्याम गायकवाड, रवी कोटा, रुपाली लोंदे, समर्थ कोळी, राहुल मस्के आणि मोहन कर्वे यांनी या शिबिराचे नेटके संयोजन केले.

- विविध सामाजिक उपक्रमांवर भर
१५ दिवसांच्या वर्ग कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते. याद्वारे सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संवर्धन, स्वबोध आणि नागरी कर्तव्ये या मूल्यांचे संस्कार स्वयंसेवकांवर करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून पर्यावरण रक्षणासाठी स्वयंसेवकांनी वर्गकाळात ३,००० पेक्षा जास्त 'सीड बॉल्स' (बियांचे गोळे) तयार केले असून, आगामी पावसाळ्यात त्यांचे रोपण करण्यात येणार आहे.