नाशिक ः संविधानाचा मूलभूत ढाच्या बदलण्याची तरतूद संविधानात नाही. त्यामुळे संविधानात दुरुस्त्या होऊ शकतात, पण संविधानाचा मूलभूत ढाचा बदलणे शक्य नाही. संविधानात बदल होणार या राजकीय हेतूने व जाणून बुजून केलेला अपप्रचार आहे. काँग्रेसने आणीबाणी लादून संविधान धोक्यात आणले होते. परंतू येथील लोकशाहीवादी जनतेने प्रसंगी तुरुंगात जावून संविधानाचे रक्षण केले व हुकूमशाही प्रवृत्तीला धडा शिकवला, असे मत संविधानाचे अभ्यास आणि विधिज्ञ ॲड. संदीप जाधव यांनी व्यक्त केले.

भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त विवेक विचार मंच आणि सहयोगी संघटनांच्या वतीने राज्यभर सामाजिक संवाद मेळाव्यांचे आयोजन केले जात आहे. नाशिक मध्ये वंचित घटकांमध्ये कार्य करणाऱ्या सामाजिक नेतृत्व व संस्था संघटनांच्या प्रतिनिधींचा "'सामाजिक संवाद मेळावा" संपन्न झाला.
या मेळाव्यातून अनुसूचित जाती आणि वंचित घटकांचे प्रश्न, सद्यस्थिती, भारतीय संविधान, आरक्षण, सामाजिक न्यायाच्या विषयासंदर्भात चर्चा - संवाद झाला. मेळाव्यात उपस्थित सामाजिक कार्यकर्त्यांनी सामाजिक न्यायाच्या विविध विषयांवर मते व्यक्त केली. यावेळी मंचावर विवेक विचार मंचाचे राज्य संयोजक सागर शिंदे, प्रमुख वक्ते ऍड संदीप जाधव, श्री राजाभाऊ गायकवाड व अमोल गायकवाड यांची उपस्थिती होती.
ॲड. संदीप जाधव यांनी संविधानातील विविध कलमांची माहिती दिली, केशवानंद भारती खटला समजून सांगितला व म्हटले की, संविधानाचा मूलभूत ढाच्या बदलण्याची तरतूद संविधानात नाही त्यामुळे संविधानात दुरुस्त्या होऊ शकतात पण संविधानाचा मूलभूत ढाचा बदलणे शक्य नाही. संविधानात बदल होणार या राजकीय हेतूने व जाणून बुजून केलेला अपप्रचार आहे. काँग्रेस ने आणीबाणी लादून संविधान धोक्यात आणले होते परंतू येथील लोकशाहीवादी जनतेने प्रसंगी तुरुंगात जावून संविधानाचे रक्षण केले व हुकूमशाही प्रवृत्तीला धडा शिकवला.
यावेळी सागर शिंदे म्हणाले की, भारतीय संविधानाने सामान्य माणसाला अनेक अधिकार देत प्रबळ केलेले आहे. समतेचे, सामाजिक न्यायाचा विचार व व्यवहार आणखी बुलंद झाला पाहिजे. संविधान समजून घेणे व संविधानाची जागृती करणे आपले कर्तव्य आहे.
संविधान सरनामा वाचनाने कार्यक्रमाची सुरवात झाली. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अमोल गायकवाड यांनी केले.
यावेळी श्याम बडोदे, राकेश शिंदे, कुणाल वाघ, आनंद साळवे, नामदेव शेलार, गणेश बोडके, नितीन देशमानकर, तेजाळे ताई, निलेश खैरनार, विजय काळोखे तसेच शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.