पुणे ः ग्रामिण अर्थव्यवस्था ही भारताच्या शाश्वत विकासाचे इंजिन आहे. शेती आणि शेतीप्रधान उद्योगांबरोबरच गावातील इतर उद्योगांना रचनात्मक चालना देणे गरजेचे आहे. गावागाड्याला समृद्ध करणाऱ्या अशा सुक्ष्म उद्योगांसाठी शासन स्तरावर भरीव तरतूदींची आवश्यकता आहे. नुकतेच महाराष्ट्र शासनाने संत सेना महाराज केश शिल्पी महामंडळाची स्थापना केली आहे.
महाराष्ट्रातील नाभिक समाज हा अत्यंत अल्पसंख्यांक समाज आहे. गावागणीस या समाजाचे एक किंवा दोन घरे असतात. हा समाज शासनाच्या विविध योजनांपासून कोसो दूर आहे. हा नाभिक समाज आपला पारंपरिक सलून व्यवसाय करुन उदरनिर्वाह करतो. या सलून व्यवसायात ही आता विविध समाजाने आगमन केले आहे.
नाभिक समाजातील विविध संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्याचा विचार करून, दिनांक 13 सप्टेंबर 2019 रोजी शासन निर्णय क्र. संकिर्ण-2018/प्र.क्र.118/ महामंडळे जीआर काढण्यात आला होता. परंतु निवडणूकी नंतर महाराष्ट्रात राजकारणात उलथापालथ झाली. आता या महामंडळास ५० कोटी रुपयांचे भाग भांडवलाला मंजुरी, दरवर्षी पाच कोटी रुपये विविध योजना राबविण्यासाठी देण्यात येणार असल्याचा ठराव राज्य सरकारने मंजूर केला आहे.
या उपकंपनीमार्फत २० टक्के बीज भांडवल योजना, एक लाखांपर्यंत थेट कर्ज योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा, दहा ते पन्नास लाख अशी गट कर्ज व्याज परतावा योजना, शैक्षणिक कर्ज व्याज परतावा, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना अशा योजना राबवण्यात येणार आहे .
ठळक मुद्दे
- नाभिक बांधवांना व्यवसाय करण्यासाठी कर्जपुरवठा केला जाईल. त्यासाठी महामंडळ २० टक्के आर्थिक भार उचलेल. लाभार्थीचा सहभाग ५ टक्के, बँकांचा ७५ टक्के असेल.
- पाच लाखांपर्यंतचे कर्ज या योजनेत दिले जाईल, व्याजदर सहा टक्के असेल आणि पाच वर्षांत परतफेड करावी लागेल.
- एक लाखापर्यंतचे थेट कर्ज दिले जाईल. त्यासाठी लाभार्थ्याला स्वतःचा एकही पैसा द्यावा लागणार नाही. ४८ समान हप्त्यांमध्ये या कर्जाची परतफेड करावी लागेल. मुदतीनंतर थकीत कर्जावर चार टक्के व्याज आकारले जाईल.
बँकांकडून दहा लाखांपर्यंतचे कर्ज घेऊन नियमित परतफेड करणाऱ्या समाजबांधवांच्या व्याजाची रक्कम महामंडळामार्फत जमा केली जाईल.
- दहा ते ५० लाख रुपयांपर्यंतच्या गट कर्जाबाबतही असेच साहाय्य महामंडळ करेल. समाजातील तरुण- तरुणींना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल.
- समाजातील तरुण- तरुणींना कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाईल.