•  12 Sep 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

केरळमधील हुतात्मा स्वयंसेवक

विश्व संवाद केंद्र - पुणे today
भाष्य  

केरळमधील हुतात्मा स्वयंसेवक

(रा.स्व.संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्री. सेतू माधवन यांची अक्षय जोग यांनी घेतलेली मुलाखत.)

प्रश्न: केरळमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा कधी सुरू झाली आणि त्यामागची पार्श्वभूमी काय होती?

उत्तर: केरळमध्ये संघाची शाखा १९४२ साली सुरू झाली. नागपूरहून दत्तोपंत ठेंगडी जी शिक्षणानंतर परम पूजनीय गुरुजींच्या पत्रासह मद्रासला गेले. त्यावेळी मलबार, कालिकत आदी भाग मद्रास प्रांताचा भाग असून ब्रिटिश शासनाखाली होते. गुरुजींनी दादाजी परमार्थ यांना पत्र लिहून दत्तोपंत ठेंगडीजी यांना कालिकतला जाण्यास सांगितले. त्यांच्या सांगण्यावरून दत्तोपंत ठेंगडी जानेवारी १९४२ च्या सुमारास संघकार्यासाठी कालिकतला आले. त्यावेळी आजचे केरळ तीन भागांत विभागलेले होते; 'मलबार' हा ब्रिटिश मद्रास प्रांताचा भाग होता, तर 'त्रावणकोर' आणि 'कोचीन' अशी वेगवेगळी संस्थाने होती. यात संघाचे प्रारंभिक कार्य प्रथम मलबार भागात सुरू झाले.

ठेंगडीजी येण्याच्या साधारण एक महिना आधी बाबूराव तेलंग नावाचे एक कार्यकर्ते विस्तारक म्हणून त्रिवेंद्रमला आले होते. तिथे शाखा सुरू झाली, पण ती शाखा फार काळ चालू शकली नाही. त्यामुळे तीन महिन्यांनंतर ते परत गेले. तरीही तिथून एक स्वयंसेवक १९४३ साली संघ शिक्षा वर्गात गेला. त्याप्रमाणे कालिकतमध्ये संघाचे दोन कार्यकर्ते काही काळासाठी आले होते. शाखेची सुरुवात आधी झाली होती, पण सातत्य कालिकतमध्ये ठेंगडीजींच्या कार्यामुळे टिकले.

----------------

प्रश्न: त्यावेळी केरळमधील राजकीय आणि सामाजिक परिस्थिती संघासाठी प्रतिकूल होती. तरीही संघ शाखांचा विस्तार कसा झाला? कोणत्या अडचणी आल्या आणि कोणते प्रयत्न केले गेले?

उत्तर: केरळची परिस्थिती संघ येण्यापूर्वी फारच गुंतागुंतीची होती. फार पूर्वीपासून मलबार आणि कालिकत भागात अरब व्यापारी व्यापारासाठी येत असत. त्या वेळी समुद्री राजांचे शासन होते. अरब व्यापाऱ्यांबरोबर कौटुंबिक जीवनाच्या व्यवस्थेसाठी स्थानिक समाजातील मुलींशी विवाह करून संबंध प्रस्थापित करण्यात आले. त्यामुळे मलबार भागात मुस्लिम लोकसंख्या वाढली.

नंतर टिपू सुलतानाच्या आक्रमणाच्या काळातही मलबार भागात इस्लामचा प्रभाव वाढला. दक्षिण केरळमध्ये त्रावणकोर आणि कोचीनच्या महाराजांच्या काळात ख्रिश्चन मिशनऱ्यांना शिक्षण आणि सेवाकार्यासाठी जागा देण्यात आल्या. त्यामुळे स्थानिकांना शाळा, चर्च आणि इतर सुविधा मिळाल्या मात्र त्यामुळे दक्षिण केरळमध्ये ख्रिश्चन समाजाचा प्रभाव वाढला. आजही दक्षिण केरळमधील मोठ्या शहरांत आणि महत्त्वाच्या ठिकाणी मोठी चर्च, शाळा आणि महाविद्यालये दिसतात.

१९२१ साली मलबारमध्ये मोपला बंड झाले. त्यावेळी खिलाफत आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा होता. खिलाफत आंदोलन अयशस्वी झाल्यानंतर मुस्लिम समाजात असंतोष वाढला आणि त्यांनी हिंदूंवर हल्ले चढवले. यामुळे मलबारच्या हिंदू समाजात काँग्रेसविषयी विरोधाची भावना निर्माण झाली.

याच पार्श्वभूमीचा फायदा कम्युनिस्टांनी घेतला. काँग्रेसमधून बाहेर आलेले काही लोक कम्युनिस्ट चळवळीत सक्रिय झाले. १९३० च्या दशकात कम्युनिस्ट पक्ष केरळमध्ये सक्रिय झाला. संघ येण्याच्या साधारण दहा वर्षे आधीच केरळमध्ये कम्युनिस्ट, मुस्लिम आणि ख्रिश्चन अशा तिन्ही प्रभावशाली शक्ती अस्तित्वात होत्या.

हिंदू समाजात उच्च-नीचता आणि सामाजिक भेदभावही होता. ज्यांना बदल हवा होता, त्यांना वाटले की क्रांती फक्त कम्युनिस्ट पक्षच घडवू शकतो. त्यामुळे हिंदू समाजातील अनेक लोकही कम्युनिस्टांकडे वळले. हीच संघ येण्यापूर्वीची केरळची स्थिती होती.

---------------
प्रश्न : परिस्थितीत कसा बदल होत गेला? 
उत्तर : १९४२ मध्ये संघाचे कार्य केरळमध्ये सुरू झाले. ठेंगडीजींचे व्यक्तिमत्व, प्रभाव आणि संघटन क्षमता यांमुळे फक्त दोन वर्षांत नवे तरुण कार्यकर्ते पुढे आले. चार-पाच कार्यकर्ते प्रचारक म्हणून बाहेर पडले, ते म्हणजे पी. माधवन, टी. एन. भरतन, टी. एन. मार्तंडवर्मा, आर. वेणुगोपाल आणि कुमारन. हे कार्यकर्ते वेगवेगळ्या ठिकाणी गेले आणि त्यांनी संघकार्य सुरू केले.

१९४५-४६ च्या सुमारास गुरुजींच्या आवाहनावर बाहेरूनही कार्यकर्ते केरळमध्ये आले. नागपूरहून शंकर शास्त्री कालिकतला आले, चंद्रपूरहून मनोहर देव त्रिवेंद्रमला आले आणि मुंबईहून भास्कर राव एरणाकुलमला आले. अशा प्रकारे मलबार, कोचीन आणि त्रावणकोर अशा तिन्ही भागांत संघकार्याची केंद्र निर्माण झाली.

१९४८ साली संघावर बंदी घालण्यात आली. त्याच्या विरोधात सत्याग्रह झाला. मद्रास प्रांतांतर्गत येणाऱ्या भागात सत्याग्रह झाला, पण कोचीन आणि त्रावणकोरमधूनही लोक पुढे आले. या सत्याग्रहामुळे विविध ठिकाणी संघाचा संपर्क वाढला आणि कार्यविस्ताराची शक्यता निर्माण झाली.

१९५६ साली केरळचे तिन्ही भाग एकत्र येऊन एक राज्य बनले. त्यावेळी भास्करराव केरळच्या कार्याकडे लक्ष देत होते. यानंतर संघाचे कार्य अधिक संघटित स्वरूपात वाढले.

१९५८-५९ च्या सुमारास मंदिर पुनर्निर्माण आणि संरक्षणाचे कार्य सुरू झाले. मलबारमध्ये टिपू सुलतानाच्या आक्रमणामुळे अनेक मंदिरे उद्ध्वस्त झाली होती आणि तिथे पूजा बंद झाली होती. माधवजी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी प्रमुख लोकांना सोबत घेऊन मंदिर पुनर्निर्माणाचा कार्यक्रम सुरू केला. हे क्षेत्र संरक्षण समितीच्या स्वरूपात पुढे नेण्यात आले.

स्वातंत्र्य चळवळीतील एक प्रमुख कार्यकर्ते के. केळप्पनजी यांनीही मंदिर पुनर्निर्माणाची मोठी जबाबदारी स्वीकारली. मलप्पुरम जिल्ह्यात एका मंदिराच्या पुनर्निर्माणाचा प्रयत्न झाला, पण त्यावेळी कम्युनिस्ट सरकारने परवानगी दिली नाही. स्थानिक मुस्लिम समाजानेही विरोध केला. यावर मोठे आंदोलन झाले आणि अखेर हिंदू कार्यकर्त्यांना यश मिळाले. ते मंदिर आजही व्यवस्थित चालू आहे.

याच काळात मलप्पुरम हा वेगळा मुस्लिमबहुल जिल्हा बनवण्याचा प्रयत्न झाला. त्याच्या विरोधातही आंदोलन झाले. जिल्हा बनलाच, पण या आंदोलनामुळे हिंदू समाजात जागृतीचे कार्य घडले. १९६४ साली संघाच्या दृष्टीने केरळ हा वेगळा प्रांत बनला. त्यावेळेपर्यंत विशेषतः मलबारमध्ये शाखांची संख्या बऱ्यापैकी वाढली होती.

१९६५ साली कालिकतमध्ये एक मोठे शिबिर आयोजित करण्यात आले. शेषाद्री जोशी म्हणाले की संघाची शक्ती वाढली आहे, पण हिंदू समाजात विश्वास वाढवण्यासाठी शांततेचे प्रदर्शनही झाले पाहिजे. या शिबिरात सुमारे २००० स्वयंसेवक आले. पथसंचलन आणि प्रदर्शन चांगल्या पद्धतीने झाले. गावोगाव संपर्क साधून लोकांना बोलावण्यात आले. या शिबिराने मलबार भागात एका वर्षाच्या आत शाखांची संख्या जवळपास दुप्पट झाली.

दक्षिण केरळमध्येही १९५९ साली शबरीमला भागात आग लावण्याच्या घटनेनंतर हिंदू समाजात एकतेची भावना वाढली. नायर आणि एझवा समाजासह अनेक हिंदू संघटनांनी एकत्र येऊन हिंदू महामंडळाच्या स्वरूपात मोठे संमेलन घेतले. संघाची ताकद तेव्हा कमी होती, पण स्वयंसेवकांनी तळागाळात काम केले. यामुळे संघाचा संपर्क वाढला आणि विस्तारास मदत झाली.

नंतर विद्यार्थी परिषदेची संमेलने, १९६७ साली भारतीय जनसंघाचे अखिल भारतीय अधिवेशन आणि मोठ्या मिरवणिकांनीही संघाचा प्रभाव वाढवला. १९७५ च्या आणीबाणीच्या काळात संघ कार्यकर्त्यांनी धैर्याने सत्याग्रह केला. गावोगाव संपर्क वाढला. आणीबाणीनंतर शाखांची संख्या वेगाने वाढली. सुमारे ७०० शाखा एक-दोन वर्षांत वाढून सुमारे १४०० पर्यंत पोहोचल्या.

१९६८-६९ साली एकनाथजी रानडे यांच्या प्रवासादरम्यान मंडळ व्यवस्थेवर भर देण्यात आला. जिल्हा आणि तालुक्याऐवजी पंचायत पातळीपर्यंत कार्य नेण्याबाबत चर्चा झाली. एक पंचायत म्हणजे एक मंडळ मानून तिथे कार्यकर्त्यांची छोटी टीम, बैठका, प्रशिक्षण आणि शाखाविस्ताराचे कार्य सुरू झाले. यामुळे सध्याच्या विस्ताराला मोठे बळ मिळाले.

१९५१ साली केरळमध्ये 'केसरी' नावाचे साप्ताहिकही सुरू झाले होते. नंतर वनवासी भागांत आदिवासी संघ आणि सागरी किनारपट्टीच्या भागांत 'मत्स्य प्रवर्तक संघम' यासारख्या संघटनांच्या माध्यमातून समाजाच्या वेगवेगळ्या वर्गात कार्य करण्यात आले. आणीबाणीच्या काळात शाळा बंद होत्या, त्यामुळे मुलांमध्ये संस्कार रुजवण्यासाठी 'बाल गोकुलम' सुरू करण्यात आले. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मोठ्या मिरवणुका आणि कार्यक्रम होऊ लागले. यामुळे हिंदू समाजात व्यापक जागृती झाली. साहित्यिक, विचारवंत आणि कलाकार यांच्याशी संपर्कासाठीही प्रयत्न झाले. पुढे जाऊन तपस्या कला-सांस्कृतिक संस्था आणि विचार केंद्र यांसारखी कार्ये उभी राहिली. पी. परमेश्वरन जी यांनी वैचारिक पातळीवर संघाची बाजू मांडण्यासाठी विचार केंद्राच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावली.

आज केरळमध्ये सुमारे १४०० मंडले आहेत, त्यापैकी सुमारे ९०० मंडळांपर्यंत कार्य पोहोचले आहे. सुमारे ४००० ठिकाणी संघाचे कार्य चालू आहे. वेगवेगळ्या वेळी ज्या आव्हानांना सामोरे जावे लागले, त्यानुसार स्वयंसेवकांनी समाजात कार्य उभे केले. हीच केरळमधील संघविकासाची गाथा आहे.

---------
प्रश्न : संघाच्या कार्यकर्त्यांपैकी आतापर्यंत कुणाला इतरांच्या संघर्षाचा सामना करावा लागला? आणि त्यात जे हुतात्मा झाले त्याबद्दल सांगू शकाल का?

उत्तर : आतापर्यंत अशा संघर्षाच्या बऱ्याच घटना घडल्या ज्याात संघ कार्यकर्ते हुतात्मा झाले, त्यापैकी काही ठळक असे सांगतो

वडिक्कल रामकृष्णान हे कन्नूर जिल्ह्यातल्या थलासेरी येथे राहत होते. ते केरळमधील संघ संघर्षाचे पहिले हुतात्मा मानले जातात. ते एका अत्यंत गरीब कुटुंबातील होते आणि शिंपी म्हणून काम करायचे. थलासेरी (कन्नूर) भागात जेव्हा संघाने आपले पाय रोवायला सुरुवात केली, तेव्हा तिथल्या कम्युनिस्ट नेत्यांना हा आपल्या राजकीय एकाधिकारशाहीला धोका वाटला. २८ एप्रिल १९६९ रोजी रामकृष्णन यांच्यावर कम्युनिस्ट गुंडांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला आणि या हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला. रामकृष्णन यांच्या बलिदानाने केरळमधील संघ स्वयंसेवकांना हा प्रवास कठीण असल्याची जाणीव करून दिली. त्यांच्या अंतयात्रेला हजारो हिंदू एकत्र आले आणि तिथूनच केरळमध्ये संघकार्याला एक नवी भावनिक शक्ती मिळाली.

दुसरे जयकृष्णन मास्टर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि मोकेरी पूर्व प्राथमिक शाळेत शिक्षक होते. ते अत्यंत लोकप्रिय होते आणि तरुणांना राष्ट्रवादाकडे आकर्षित करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. सतत येणाऱ्या धमक्यांमुळे त्यांना पोलीस संरक्षणही देण्यात आले होते. १ डिसेंबर १९९९ रोजी, जयकृष्णन मास्टर नेहमीप्रमाणे शाळेत इयत्ता ६ वीच्या वर्गात विद्यार्थ्यांना शिकवत असताना, अचानक वर्गचि दरवाजे तोडून ७ कम्युनिस्ट हल्लेखोर आत घुसले. त्यांनी पोलीस रक्षकला बाजूला केले आणि ६ वीच्या चिमुकल्या मुलांसमोर जयकृष्णन यांच्यावर कुऱ्हाडी आणि तलवारींनी ४० हून अधिक वार करून त्यांची निर्घृण हत्या केली. ही घटना केरळच्या इतिहासातील अत्यंत क्रूर घटना मानली जाते, ज्याचा लहान मुलांच्या मनावर भीषण परिणाम झाला आणि या बलिदानाने कम्युनिस्ट हिंसेचा क्रूर चेहरा संपूर्ण देशासमोर आणला.

असाच सुजित नावाचा अवघ्या २७ वर्षांचा तरुण स्वयंसेवक होता, तो कन्नूर जिल्ह्यातील पापिनिसेरी येथील संघाचा 'सक्रिय' कार्यकर्ता होता. फेब्रुवारी २०१६ मध्ये, रात्रीच्या वेळी १५ ते २० कम्युनिस्ट हल्लेखोरांनी सुजितच्या घरावर हल्ला केला. हल्लेखोर घरात घुसले तेव्हा सुजितने आपल्या वृद्ध आई-वडिलांना वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र गुंडांनी त्याच्या आई-वडिलांना मारहाण करून बाजूला फेकले आणि त्यांच्या डोळ्यांदेखत सुजितची निर्घृण हत्या केली. आपल्या मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात त्याचे आई-वडीलही गंभीर जखमी झाले होते.

राजेश हा तिरुवनंतपुरम येथील एका झोपडपट्टी भागात राहणारा आणि हातावर पोट भरणारा सामान्य मजूर होता, जो संघाचा स्थानिक 'बस्ती कार्यवाह' म्हणून काम पाहत असे. जुलै २०१७ मध्ये, राजेश एका दुकानातून घरचे सामान घेऊन परत असताना त्याच्यावर अचानक हल्ला करण्यात आला. हल्लेखोरांनी त्याच्यावर तब्बल ८९ वार केले आणि क्रूरतेची सीमा गाठत त्याचे दोन्ही हात कोपरापासून कापून वेगळे करून रस्त्याच्या कडेला फेकून दिले. रुग्णालयात नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. या अमानुष हत्येनंतर देशाचे तत्कालीन संरक्षण मंत्री आणि राष्ट्रीय नेते त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आले होते, ज्यामुळे केरळमधील हिंसेवर राष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली.

कन्नूर जिल्ह्यातल्या एकाच कुटुंबातील सुजीत आणि सुधीश या दोन सख्ख्या भावांनी संघाच्या कामासाठी आपले प्राण गमावले. सुजीत आणि सुधीश हे दोघेही तरुण वयातच संघाच्या विचारांशी जोडले गेले होते. डाव्यांच्या गटात राहून हिंदूंचे सण आणि उत्सव साजरे करणे हाच त्यांचा गुन्हा ठरला. वेगवेगळ्या वर्षांत, पण सारख्याच क्रूर पद्धतीने या दोन्ही भावांची कम्युनिस्टांनी हत्या केली.

एकाच घरातील दोन तरुण मुले गमावलेल्या या कुटुंबाचा त्याग केरळमधील संघर्षाची भीषणता दर्शवतो.

केरळमध्ये केवळ कम्युनिस्टांकडूनच नाही, तर इस्लामिक कट्टरपंथी संघटनांकडूनही संघ स्वयंसेवकांना लक्ष्य केले गेले आहे, ज्याचे उदाहरण म्हणजे संजित. तो पलक्कड जिल्ह्यातील संघाचा जिल्हा पातळीवरील पदाधिकारी होता. नोव्हेंबर २०२१ मध्ये, संजित आपल्या पत्नीला दुचाकीवरून कामावर सोडण्यासाठी जात असताना, वाटेत 'पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया' (PFI) आणि 'सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया' (SDPI) च्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवली आणि त्याच्या पत्नीच्या समोरच संजितवर एकामागून एक अनेक वार करून त्याला जागीच ठार केले.

या प्रमुख बलिदानांशिवाय, १२ मार्च १९६५ रोजी कालिकत जिल्ह्यातील थानूर येथून निघालेल्या मुस्लिम लीगच्या विजयाच्या मिरवणुकीने हिंदू वस्तीवर मोर्चा वळवून केलेल्या हल्ल्यात 'भारतीय जनसेने'चे दोन कार्यकर्ते, जयाचन्दन (ज्याला नाव विचारून गोळी मारण्यात आली) आणि सुब्रह्मण्यम (ज्याला पोटात मारण्यात आले) हुतात्मा झाले. तसेच मल्लपुरमचे प्रजा सोशालिस्ट पार्टी सोडून आरएसएसमध्ये आलेले अतिशय गरीब कोळी स्वयंसेवक उनिच्चोई कुट्टी, कन्नूर जिल्ह्यातील पय्यानुर येथील जनसंघाचे उपाध्यक्ष कोरन, मल्लपुरम येथील संघाचे कार्यकर्ते राजीव (ज्याला घरात घुसून मारण्यात आले), आणि एम. चंद्रन, के. चक्कम्, गोपालकृष्णन, पी. गणेशन, सथ्यन, एम. शशी कुमार, पलूर मोहन्चंद्रन, श्रीनिवासन यांसारख्या अनेक संघ कार्यकर्त्यांना हिंदुत्वाचे काम करत असल्यामुळे मुस्लिम गुंडांकडून मारण्यात आले.

केरळमधील या संघर्षाचे वैशिष्ट्य म्हणजे शहीद झालेले बहुतांश स्वयंसेवक हे आर्थिकदृष्ट्या गरीब पार्श्वभूमीचे, म्हणजेच मध्यमवर्गीय, मजूर, रिक्षाचालक किंवा शेतकरी कुटुंबातील होते. स्वतःला गरिबांचा पक्ष म्हणवणाऱ्या कम्युनिस्टांनी सर्वात जास्त हत्या गरीब हिंदू स्वयंसेवकांच्या केल्या. तसेच कन्नूर परिसरातील 'पार्टी व्हिलेज' सारख्या गावांमध्ये, जिथे दुसऱ्या कोणत्याही विचारसरणीला परवानगी नसते, तिथे संघ शाखा सुरू करण्याचे धाडस करणाऱ्यांना लक्ष्य केले गेले आणि कम्युनिस्ट पक्षाचे तरुण कार्यकर्ते संघाकडे वळू लागल्यामुळे आपले केडर वाचवण्यासाठी कम्युनिस्टांनी हिंसेचा वापर केला. एवढ्या शेकडो हत्या आणि छळ सोसूनही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केरळमध्ये कधीही सूडाचा किंवा हिंसेचा मार्ग स्वीकारला नाही, तर समर्पणाची भावना ठेवली. आज केरळमधील हुतात्म्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ अनेक सेवा प्रकल्प, रुग्णालये आणि शाळा यशस्वीपणे चालवल्या जातात. हे रक्तबलिदान वाया गेले नाही, कारण आज केरळमध्ये सुमारे १४०० मंडले असून, त्यापैकी ९०० मंडळांपर्यंत कार्य पोहोचले हा भव्य पाया याच हुतात्मा कार्यकर्त्यांच्या बलिदानावर रचला गेला आहे.
-------------------
प्रश्न: केरळमध्ये जे स्वयंसेवक हुतात्मा झाले आहेत तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी संघाने काय काम केले?

उत्तर: केरळमध्ये विशेषतः काही जिल्ह्यांत अनेक स्वयंसेवक हिंसला बळी पडले. सुमारे २००-३०० स्वयंसेवक हुतात्मा झाले. अनेक स्वयंसेवक तुरुंगातही गेले. त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी व्यवस्था उभारण्यात आली.

सुरुवातीला स्वयंसेवकांकडून दरमहा छोटी रक्कम घेऊन मदतकार्य सुरू करण्यात आले. हे दुरिताश्वास समितीसारख्या नावाने चालवले गेले. एकदा रज्जू भैया केरळमध्ये आले. त्यांनी हे पाहून सांगितले की संपूर्ण संघटनेने यासाठी सहकार्य केले पाहिजे. १९८०-८५ च्या सुमारास स्वयंसेवकांकडून सुमारे ४-५ लाख रुपये जमा करण्यात आले.

हुतात्मा कुटुंबांशी संपर्क, मुलांचे शिक्षण, कुटुंबाच्या गरजा, आणि कायदेशीर बाबींसाठी वेगवेगळ्या पातळीवर व्यवस्था करण्यात आली. विशेषतः कन्नूरसारख्या जिल्ह्यातील प्रकरणे पाहण्यासाठी जबाबदार कार्यकर्ते नेमले गेले, कोणते प्रकरण कुठे आहे, कोणता वकील पाहील, स्थिती काय आहे यासारख्या गोष्टींचा विचार केला गेला. संघाचे अधिकारी तुरुंगात जाऊन स्वयंसेवकांना भेटत असत, त्यांचा आत्मविश्वास वाढवत असत आणि कुटुंबीयांची काळजी घेत असत. अशातऱ्हेने हुतात्मा स्वयंसेवकांच्या कुटुंबीयांना वाऱ्यावर न सोडता त्यांची काळजी घेण्याची नैतिक जबाबदारी संघ गेले कित्येक वर्ष करतो आणि करत राहणार.

(शब्दांकन : मेघना घांग्रेकर)
साभार - सांस्कृतिक वार्तापत्र
 
 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • केरळ
  • संघ
  • हिंदू
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (58), सामाजिक (111), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (45), संस्कृती (40), जनजाती (17), महिला (15), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (29), कम्युनिझम (7), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (14), सेवा (19), साहित्य (11), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.