अखंड भारताच्या विघटनाचा इतिहास

भारताचा इतिहास जितका समृद्ध आणि प्राचीन आहे, तितकाच तो संघर्षांनी भरलेला आहे. हजारो वर्षे अखंड राहिलेली ही सांस्कृतिक आणि भौगोलिक रचना काळाच्या ओघात कशी छिन्नभिन्न झाली, याचा अभ्यास करणे भारताच्या आधुनिक राजकीय प्रवासाला समजून घेण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे.आठव्या शतकानंतर भारतीय उपखंडावर पश्चिमेकडून आणि मध्य आशियातून आक्रमणे सुरू झाली. या आक्रमणांमुळे भारताच्या सीमा हळूहळू संकुचित होऊ लागल्या. सुरुवातीच्या काळात अफगाणिस्तान आणि लगतचे प्रदेश भारताच्या मूळ सांस्कृतिक प्रवाहापासून वेगळे झाले. मध्ययुगीन काळात अनेक भारतीय राज्यांनी या आक्रमकांचा तीव्र प्रतिकार केला, परंतु राजकीय विकेंद्रीकरणामुळे आणि आपापसातील मतभेदांमुळे अखंड भारताची मूळ राजकीय चौकट कमकुवत होत गेली.
- ब्रिटिशांचे आगमन आणि 'फूट पाडा व राज्य करा' धोरण ः
१८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्यसंग्रामानंतर ब्रिटिशांच्या एका गोष्टी लक्षात आली की, जर भारतीयांना त्यांच्या सांस्कृतिक आणि धार्मिक ओळखींवरून विभाजित केले नाही, तर त्यांच्यावर दीर्घकाळ सत्ता गाजवणे अशक्य आहे. म्हणूनच त्यांनी अत्यंत पद्धतशीरपणे 'फूट पाडा आणि राज्य करा' (Divide and Rule) या धोरणाचा अवलंब केला.
१. संस्थानांचे विभाजन: ब्रिटिशांनी सुमारे ५०० हून अधिक देशी संस्थानांशी वेगवेगळे करार केले, त्यांना काही स्वायत्तता दिली आणि त्यांच्यात आपापसांत अविश्वास निर्माण केला.
२. धार्मिक भेद: स्वातंत्र्यलढ्याची एकत्रित ताकद कमकुवत करण्यासाठी ब्रिटिशांनी हिंदू आणि मुस्लिम समुदायांमध्ये मजहबी आणि सामाजिक अंतर वाढवण्याचे राजकीय प्रयत्न केले.
३. कायद्यांमधील भेद: कायदे आणि प्रशासकीय निर्णयांमधून स्वतंत्र मतदारसंघ आणि धार्मिक प्रतिनिधित्वाच्या कल्पना रुजवून समाजाची उभी फाळणी करण्यात आली.
१९४७ ची वेदनादायी फाळणीब्रिटिशांची कूटनीती आणि तत्कालीन काही राजकीय नेत्यांची फुटीरतावादी मानसिकता यांमुळे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य तर मिळाले, परंतु ते अखंड स्वरूपात मिळाले नाही. भारत आणि पाकिस्तान या दोन राष्ट्रांची निर्मिती झाली. फाळणीच्या या निर्णयामुळे केवळ जमिनीची विभागणी झाली नाही, तर कोट्यवधी लोकांना आपापली घरेदार सोडावी लागली. मानवतेच्या इतिहासातील सर्वात मोठे आणि वेदनादायी विस्थापन या काळात झाले. फाळणीनंतर लगेचच भारतासमोर ५०० हून अधिक संस्थानांना एका छत्रछायेखाली आणण्याचे अवाढव्य आव्हान होते.
अशा कठीण प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल यांनी आधुनिक काळातील 'चाणक्य' भूमिका बजावली. त्यांनी अत्यंत मुत्सद्देगिरी, कठोरता आणि राजकीय कौशल्याने सर्व संस्थानांचे भारतीय संघराज्यात विलीनीकरण केले. यामुळे संयुक्त भारताची स्थापना झाली असली, तरी प्राचीन काळातील अखंड भारताचे मूळ भौगोलिक स्वरूप मात्र खंडितच राहिले. फाळणीचा ऐतिहासिक आढावा घेताना हे स्पष्ट होते की, या निर्णयाने उपखंडातील शांतता आणि प्रगतीला मोठा फटका बसला. सिंध प्रांतातील विचारवंत गुलाम मुर्तजा सैयद यांनी नमूद केले होते की, फाळणीमुळे कोणाचाही फायदा झाला नाही; जर हा भूभाग अखंड राहिला असता, तर आज हा उपखंड जगातील सर्वात मोठी आर्थिक व सांस्कृतिक शक्ती बनला असता.
(क्रमशः)