'करणी'च्या नावाखाली भोंदू फादरकडून धर्मांतराचा प्रयत्न

धर्म स्वातंत्र्य कायद्याअंतर्गत नगर जिल्ह्यात पहिला गुन्हा दाखल
अहिल्यानगर/राहाता:
आजारपण आणि ‘करणी बाधा’ दूर करण्याचे प्रलोभन दाखवून एका तरुण विवाहितेला व तिच्या भावाला बळजबरीने ख्रिश्चन धर्म स्वीकारण्यास भाग पाडण्याचा धक्कादायक प्रकार राहाता तालुक्यातील अस्तगाव येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणी राहाता पोलीस ठाण्यात ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६’ तसेच ‘जादुटोणा विरोधी कायदा, २०१३’ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अस्तगाव (ता. राहाता) येथील २१ वर्षीय विवाहित महिला वैष्णवी गोरक्षनाथ गायकवाड हिने राहाता पोलिसांत दिलेल्या लेखी फिर्यादीनुसार, जानेवारी २०२६ मध्ये गरोदर असताना आठव्या महिन्यात पोटातील बाळ मृत झाल्याची घटना घडली होती. या आघातामुळे तिची प्रकृती सातत्याने बिघडलेली होती. रक्षाबंधन प्रसंगी तिची आत्या (रा. पढेगाव) घरी आली असता, तिने "पढेगाव येथील ख्रिश्चन समाजाचे फादर तुझ्यासाठी प्रार्थना करतील, त्याने तुला फरक पडेल" असे सांगितले. त्यानंतर २९ ऑगस्ट २०२६ पासून संबंधित व्यक्तीने फिर्यादीच्या मोबाईलवर वारंवार फोन करून प्रार्थना व मंत्रोजाप करण्यास सुरुवात केली.
१५ सप्टेंबर रोजी संबंधित व्यक्तीने "तुमच्या वडिलांच्या घरात कोणीतरी काहीतरी (करणी) केले आहे, आम्हाला घरी यावे लागेल" असे सांगून घर गाठले. त्यानंतर १६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजेच्या सुमारास आरोपी अस्तगाव येथील फिर्यादीच्या माहेरी आला. त्याने बायबलचे पुस्तक काढून मोठ्याने मंत्र व प्रार्थना करण्यास सुरुवात केली. फिर्यादीचा लहान भाऊ प्रशांत याच्या हातातील धागा तोडण्यास सांगून त्याने धर्मांतराचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीस "तुला करणीबाधा झाली आहे, ही बाधा दूर करण्यासाठी तुला ख्रिश्चन धर्म स्वीकारावाच लागेल" असे सांगून धर्मांतरासाठी दबाव टाकला व प्रलोभन दिले.
घरात मोठ्याने सुरू असलेला मंत्रोजाप व प्रार्थना ऐकून आजूबाजूचे ग्रामस्थ जमा झाले. ग्रामस्थांनी संशय आल्याने संबंधित ‘फादर’चे आधारकार्ड तपासले असता, तो नारायण भाऊसाहेब चव्हाण (रा. श्रीरामपूर / पढेगाव) याने स्वतः हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता आणि तो ‘फादर’ बनून लोकांना धर्मांतरासाठी जाळ्यात ओढत होता. ग्रामस्थ, स्थानिक तरुण आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
फिर्यादी वैष्णवी गायकवाड यांच्या तक्रारीवरून राहाता पोलीस ठाण्यात आरोपी नारायण भाऊसाहेब चव्हाण याच्याविरुद्ध ‘महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा, २०२६’ च्या कलम ९(१), ९(२) आणि ‘महाराष्ट्र जादुटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम, २०१३’ च्या कलम ३(१), ३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कोमल कुमावत करत आहे.