निसर्गाकडे चला...

श्रमानुभवातून होते शेतीची ओळख !
निसर्गाची, ग्रामीण जीवनाची, शेतीची अनुभूती देणारा 'ग्राम - नगर संवाद' हा उपक्रम दरवर्षी पुण्याजवळ असलेल्या वेल्हे परिसरात आयोजित केला जातो. सहभागी होणारे सर्वजण या उपक्रमातून अनेक गोष्टी आपोआप शिकतात. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने या उपक्रमाची ओळख करून घेऊ या...
पर्यावरणाच्या क्षेत्रात अनेक संस्था, संघटना, व्यक्ती खूप आगळ्या-वेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवत असतात. पर्यावरणाचे रक्षण करायचे तर पर्यावरणाचे महत्त्व लोकांच्या लक्षात आणून द्यावे लागते. पर्यावरण म्हणजे काय, निसर्ग म्हणजे काय, त्याचे रक्षण कसे करायचे ते समजावून सांगावे लागते. त्याची प्रत्यक्ष अनुभूती द्यावी लागते. त्यातून खूप काही शिकता येते, शिकवता येते. निसर्गाची ओळख करून देणारा असाच एक उपक्रम पुण्याजवळ असलेल्या वेल्हे परिसरातील गावांमध्ये दरवर्षी आयोजित केला जातो.
वेल्हे येथे 'तोरण राजगड परिसर समाजोन्नती न्यास' ही स्वयंसेवी संस्था १९८६ पासून काम करत आहे. संस्थेतर्फे दुर्गम आणि ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह चालवले जाते. ग्राम विकासाच्या क्षेत्रातही संस्था या भागामध्ये लक्षणीय काम करत आहे. संस्थेचा आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे 'ग्राम - नगर संवाद.' या उपक्रमामध्ये शहरवासी आणि ग्रामवासी यांचा प्रत्यक्ष संपर्क होईल, त्यांच्यात संवाद होईल, ग्रामीण जीवनाचा अनुभव शहरवासीयांना घेता येईल, असे कार्यक्रम आयोजिले जातात. शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही त्यात आवर्जून सहभागी करून घेतले जाते. युवक, युवतींचाही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो.
श्रमानुभव आणि कृषिपर्यटन
शेतकरी शेतीमध्ये वर्षभर राबत असतो. त्याच्यापुढे अनेक समस्या असतात. मनुष्यबळाची कमतरता आणि मजुरीचे वाढते दर या परिस्थितीत असलेल्या बळीराजाला थोडी मदत करता आली तर ती त्याला उपयुक्त ठरेल, हे लक्षात घेऊन 'तोरण राजगड परिसर समाजोन्नती न्यास'तर्फे 'ग्राम - नगर संवाद' अंतर्गत भातलागवडीचा उपक्रम केला जातो. त्यासाठी गरजू शेतकऱ्यांची निवड केली जाते आणि शहरी बांधवांची सहल अशा शेतकऱ्यांच्या शेतात आयोजित केली जाते.
भातलावणीचा उत्साह
या सहलीत सहभागी होणाऱ्यांना निसर्ग तर बघायला मिळतोच, शिवाय खेडेगावही जवळून अनुभवता येते. भर पावसात अगदी गुडघाभर चिखलात भात खाचरांमध्ये काम करण्याचा आणि भात लागवडीचा आगळा अनुभव शहररवासीयांना मिळतो. भातलावणी कशी करायची हे आधी सगळ्यांना सांगितले जाते. शिकवले जाते. ते समजून घेतल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होेते. सर्वजण मिळून भात खाचरांमध्ये खूप उत्साहाने काम करतात. पुण्यातून शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्याही सहली भात लावणीसाठी येतात. ज्येष्ठ नागरिकही या उपक्रमात सहभागी होतात. या सर्वांना या कामात खूप आनंद तर मिळतोच आणि श्रमाचाही अनुभव घेता येतो. साधारण सकाळी दहा-अकरा पासून सायंकाळपर्यंत हे काम चालते.
भर पावसात, चिखलात काम सुरू असताना शेतकऱ्यांच्याच घरात दुपारच्या जेवणाचीही व्यवस्था केलेली असते. गरम गरम भाकरी, भाजी आणि स्थानिक प्रजातीच्या तांदळाचा भात, डाळ असा बेत असतो. चुलीवर केलेल्या या स्वयंपाकाची चव काही वेगळीच असते. चिखलातील भातलावणी, चवीष्ट भोजन, दिवसभर केलेले भरपूर श्रम आणि त्याबरोबरच नवीन काहीतरी शिकायला मिळाल्याचा आनंद घेऊन सहलीतील मंडळी सायंकाळी परतीचा प्रवास सुरू करतात, तेव्हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद असतो आणि आपण शेतकरी बंधूंना काहीतरी मदत केल्याचे समाधानही असते.
''निसर्ग प्रत्यक्ष अनुभवला की आपोआपच त्याच्याविषयी प्रेम उत्पन्न होते. पर्यावरणाबद्दलही लोकांमध्ये जागृती होते. त्या अनुषंगाने विचार केला तर शहरवासीयांसाठी भातलावणीचा हा जो उपक्रम आम्ही करतो, तो यशस्वी तर होतोच. शिवाय, 'ग्राम - नगर संवाद' हाही उद्देश त्यातून सफल होतो," असा अनुभव संस्थेचे विश्वस्त मंदार अत्रे यांनी सांगितला.
विहिरीसाठी सौर उर्जेवरील पंप
संस्थेतर्फे ग्राम विकास उपक्रमांतर्गत वेल्हे तालुक्यात चौदा विहिरी बांधून देण्यात आल्या आहेत. या कामातील विशेष म्हणजे पर्यावरणपूरक जलवहन प्रणालीचा येथे उपयोग करण्यात आला आहे. त्यामुळे गावाच्या मध्यवर्ती भागात पाणी पोहोचवता येते. त्यातील दोन विहिरींवर सौर जल पंप बसवण्यात आले आहेत. ग्राम विकासाची अशी अनेक कामे शहरवासीयांच्या सहकार्याने संस्था वेल्हे परिसरात करत आहे.
या उपक्रमाच्या अधिक माहितीसाठी, भात लावणी उपक्रमातील सहभागासाठी तसेच संस्थेच्या वसतिगृहाला भेट देण्यासाठी संस्थेचे विश्वस्त मंदार अत्रे (९४२२००८०६८) किंवा रमेश आंबेकर, वेल्हे (९४२१०५१८२२) यांच्याशी संपर्क साधता येईल.