•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

वेदमूर्ती देवव्रताच्या 'दंडक्रमाने' काय साध्य केले?

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 13 days ago
भाष्य  

वेदमूर्ती देवव्रताच्या 'दंडक्रमाने' काय साध्य केले?

भारताची आध्यात्मिक राजधानी आणि काशी विश्वनाथ व माता अन्नपूर्णेचा निवास असलेल्या काशी नगरीत देवव्रत महेश रेखे या १९ वर्षांच्या तेजस्वी, तपस्वी मुलाने शुक्ल यजुर्वेदातील दोन हजार  ऋचा मुखोद्गत करून शुद्ध स्वरात उच्चारण करीत 'दंडक्रम' ही वैदिक परंपरेतील अत्यंत अवघड समजली जाणारी कसोटी पार केली.

या पवित्र भारतभूमीत आजही वैदिक आपली ज्ञानपरंपरा अक्षुण्ण ठेवण्यासाठी वैयक्तिक जीवनात करावे लागणारे अत्यंत कठोर व्रताचरण आनंदाने आत्मसात करून, या वातावरणात शुद्ध ज्ञान प्रक्षेपित करणाऱ्या वैदिक ऋचांचे सुस्वर गायन करतात; म्हणूनच भारत ही देवभूमी असल्याचा विश्वास सगळ्या जगाला वाटतो. या कोवळ्या वयातील देवव्रतने गाठलेले हे शिखर दोनशे वर्षांत कुणाला पादाक्रांत करता आले नव्हते. त्याने त्याचे 'देवव्रत' हे नाव सार्थ केले. असा देवव्रत होणे ही अत्यंत कठीण परीक्षा आहे.

पवित्र वेद हे प्रत्यक्ष ईश्वराचे नि:श्वास मानले जातात. त्यांचे लिखाण मानवी प्रज्ञेने झालेले नाही, तर ते अपौरुषेय मानले जातात. अत्यंत शुद्ध व्रताचरण करणाऱ्या वैदिक काळातील ऋषींना वेदमंत्रांचे प्रत्यक्ष दर्शन झाले आणि नंतर त्यांनी ते कंठस्थ केले. त्या पवित्र वेदमंत्रांचे गायन करताना स्वराची शुद्धता, त्या गायनातील आरोह-अवरोह, शब्दांचे नेमके आघात, ओष्ठ्य, तालव्य, दंत्य, कंठ्य असे वेगवेगळे उच्चार अत्यंत अचूकपणे करणे, हे करताना यंत्रवत् उच्चार न करता त्यात हृदयातील भक्तीचे माधुर्य ओतणे, उच्चारणातील माधुर्यासोबत लय, दोन शब्दांच्यामध्ये येणारे विराम सांभाळत अखंड उच्चारण करणे हे सारे दंडक्रम सिद्ध होण्यासाठी अनिवार्य असते.

यासाठी शुद्ध स्वर, कुशाग्र बुद्धी, उत्कृष्ट स्मरणशक्ती आणि आचार-विचारांच्या शुद्धतेतून हृदयात प्रकट होणारी अंत:स्फूर्ती हे सारे आवश्यक आहे. काही भ्रमिष्ट दुरात्मे विचारतात - यामुळे काय साध्य होणार? ज्याने थोडेसेही वेदमंत्रांचे उच्चारण शास्त्रीय पद्धतीने केले आहे, त्याच्या मस्तकात जेव्हा हे वेदमंत्रांचे उच्चार तीव्र कंपनं निर्माण करतात, तेव्हा त्या साधकाला जो अनुभव येतो, तो शब्दात कसा व्यक्त करता येईल? त्याचा 'अनिर्वचनीय' या शब्दात उल्लेख भारतीय ज्ञान परंपरेत अनेकदा आला आहे.

जीवनात यम-नियम आदी साधनशुचितेचे पालन करीत शब्दांचे स्वर आणि लयीत शुद्ध उच्चारण करण्याने मनुष्याच्या जाणिवेचा स्तरच बदलतो. आपल्या अनुभवाला येणारे जग आपल्या जाणिवेच्या स्तरावर अवलंबून असते. एखादा मनुष्य अत्यंत बुभुक्षित असतो, त्याची अगदी साध्या गोष्टींसाठी असलेली वखवख जन्मात कधी संपत नाही. याउलट एखादा अत्यंत सामान्य परिस्थितीत जगाणारा मनुष्य अत्यंत समाधानी असतो. त्याचे मन कोणत्याही क्षुद्र ऐंद्रिय उपभोगांच्या इच्छेकडे आकृष्ट होत नाही. असे लोक त्यांचे अस्तित्व आज ज्या स्तरावर आहे, तिथून पुढे उत्क्रांत होण्यासाठी साधना करीत राहतात. साध्या पाण्याचा गोठून बर्फ होतो, त्यासाठी त्या पाण्यातील ऊर्जा काढून घ्यावी लागते. तोच बर्फ उष्णतेमुळे पाण्यात रूपांतरित होतो, तेव्हा ते प्रवाही होते. बर्फ प्रवाही नसतो.

यापुढे तेच पाणी आणखी ऊर्जा ग्रहण केली की वाफेत रूपांतरित होते. पाणी ज्या भांड्यात ठेवू तसा आकार धारण करते, पण वाफ आकाराचा त्याग करून निराकार होते. बर्फ आणि पाणी पाहता येते, वातावरणातील वाफ डोळ्यांना दिसत नाही. जसे साध्या जड वाटणाऱ्या पदार्थांमध्ये हे अवस्थांतर केवळ ऊर्जा देऊन करता येते, तसेच वेदमंत्रांच्या उच्चारणाने मानवी स्वभावाचा, वृत्तीचा, बौद्धिक क्षमतांचा आश्चर्यकारक क्रमविकास होतो. हिंदू परंपरेत आदि शंकराचार्यांनी क्रमविकासाचे जे टप्पे सांगितले आहेत, त्यात ते म्हणतात - "दुर्लभं त्रयमेवैतद् देवानुग्रह हेतुकम् | मनुष्यत्वम्, मुमुक्षुत्वम्, महापुरुष संश्रया: ||" मानवी जीवनात मनुष्यत्व, मुमुक्षुत्व आणि सत्पुरुषांचे सान्निध्य अत्यंत दुर्लभ असून ते केवळ ईश्वरी कृपेनेच लाभते. 

ईश्वर कृपेसाठी श्रद्धा आवश्यक आहे. कशावरच ज्यांची श्रद्धा नाही, अशा लोकांबद्दल भगवान श्रीकृष्णाने गीतेत - "संशयात्मा विनश्यति" असे सूत्र सांगितले आहे. देवव्रत होण्यासाठी असे आणि यापेक्षा अधिक असे बरंच काही आवश्यक असते. छोट्याशा टेकडीवर धापा टाकत कसेबसे पोहोचणाऱ्याला एव्हरेस्टची उंची कशी कळणार? चि. देवव्रत त्याच्या असाधारण प्रज्ञेच्या बळावर वेदमूर्ती देवव्रत झाला आहे. त्याचे वडील वेदाचार्य महेशजी रेखे आणि त्याच्या मातोश्री, या दोघांचे मनोरथ सिद्धीस जाण्यासाठी त्या उभयतांनी आणि चि. देवव्रत यांनी घेतलेल्या अपार ध्येय आणि परिश्रमांची कल्पनाही करता येणार नाही इतके आपण मागे आहोत.

आपण वेदमूर्ती देवव्रत महेश रेखे आणि त्याचे आई-वडील यांना फक्त कृतज्ञतेने प्रणाम करून पवित्र वेद वाङ्मयाबद्दल आपली आस्था व्यक्त करू शकतो.

सोबतच्या फोटोत तपस्या परिपूर्ण झाली, म्हणून कृतार्थतेने आपल्या लाडक्या देवव्रतला प्रेमाने कवेत घेणारे, त्याच्या मस्तकावर प्रेमाश्रूंचा अभिषेक करणारे त्याचे पिता वेदाचार्य महेशजी रेखे, आणि आनंदाश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी वत्सलतेने त्याच्या मस्तकावर हात ठेवून आशीर्वाद देणारी आई आहे. यालाच जीवनात 'याचि देही याचि डोळा' लाभलेली कृतार्थता म्हणतात. अवघे दहा मोबाईल क्रमांकही पाठ नसण्याइतकी बौद्धिक घसरण झालेल्या तरुण पिढीने देवव्रतकडून शिकण्यासारखे खूप काही आहे.

अभय भंडारी, पुणे.


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • ओष्ठ्य
  • तालव्य
  • दंत्य
  • कंठ्य
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (13), सामाजिक (156), कला (3), संस्कृती (39), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (8), इतिहास (63), रा. स्व. संघ आणि परिवार (71), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (8), राजकारण (5), महिला (11), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (8), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.