संघगीतातील वरील ओळी ज्या कृतीतून सार्थ होतात ती कृती म्हणजे 'सामाजिक रक्षाबंधन'! राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील प्रमुख सहा उत्सवांपैकी 'रक्षाबंधन' हा उत्सव सामाजिक बंधुभावाच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण आहे. रक्षाबंधनाचा पारंपरिक अर्थ 'बहिणीने भावाला आपल्या रक्षणासाठीच्या (रक्षा) कटिबध्दतेचा धागा- म्हंणजेच राखी - बांधणे' असा आहे. मात्र संघसंस्थापक आद्य सरसंघचालक पू. डॉक्टरांनी या पारंपरिक संकल्पनेला सामाजिक आशय देऊन बंधुत्वाच्या सर्वोच्च उंचीवर नेऊन ठेवले. तेव्हापासून आजपर्यंत संघ स्वयंसेवक समाजातील सर्व स्तरापर्यंत पोचून 'हिंदू अवघा बंधू बंधू' या भावनेने सर्व बांधवांना रक्षा बांधून बंधुभावाचे प्रकटीकरण करीत आहे.
संघकार्य हे परिस्थती निरपेक्ष आहे. अनुकूल-प्रतिकूल परिस्थितीत ते तितक्याच वेगाने आणि सातत्याने चालू राहिले आहे, आणि राहील. मात्र याचा अर्थ असा नाही की, संघाला समाजभान नाही. हेच समाजभान ठेवून आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत संघाने आपल्या पारंपरिक उत्सव-पद्धतीबरोबरच रक्षाबंधनानिमित्त समाजप्रबोधनार्थ काही उपक्रम हाती घ्यायचे ठरविले. 'सामाजिक रक्षाबंधन' हे त्याचे नाव. गेल्या ५-६ वर्षांपासून संघस्वयंसेवक समाजप्रबोधनार्थ समाजात जाऊन विविध विषयांबद्दल जागृती करीत आहे, इ-कचरा संकलन (खराब इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, संगणक, मोबाईल इ.), रद्दीसंकलन (आलेला निधी सेवा संस्थांना पुरविणे), वाहतूक नियमन (रस्ता सुरक्षा) , स्वदेशी वस्तू वापर, लव्ह जिहाद इ. विषयांबाबत संघाने आजपर्यंत समाजप्रबोधन केले आहे.
सेवावस्तीत जाणे, त्यांच्यासोबत राहणे, गप्पा मारणे, जेवणे हेदेखील स्वाभाविकच ! याचसोबत त्यांना आपल्या घरी बोलावणे, हळदीकुंकू वा अन्य यथोचित सत्कार करणे, सहभोजन करणे हेदेखील कोणत्याही प्रसिद्धीशिवाय सुरु आहे. "आहे रे" समाजाने "नाही रे" या समाजबांधवांना बंधुत्वायाच्या नात्याने सन्मानित करणे यासारखे कालोचित, सुयोग्य रक्षाबंधन आणखी काय असणार?
केवढे व्यापक स्वरूप रा.स्व. संघाने रक्षाबंधन या पारंपरिक सणाला दिले आहे याची प्रचिती रा.स्व. संघाच्या या भूमिकेवरून सर्वांना दिसून येईल.
======
- प्रसन्न ज. खरे