
सोलापूर, ता. २४ :
घोषाच्या दणदणीत तालावर एकसमान पावलांनी पुढे सरकणाऱ्या स्वयंसेवकांनी रविवारी सायंकाळी सोलापूरकरांना संघ पथसंचलनाचा थरार अनुभवायला मिळाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संघ शिक्षा वर्गातील ३३५ प्रशिक्षणार्थी स्वयंसेवकांचे शहरातून निघालेले शिस्तबद्ध संचलन केवळ एक मिरवणूक न ठरता संघटनशक्ती, आत्मविश्वासाचे प्रभावी दर्शन ठरले. पूर्ण गणवेशातील स्वयंसेवक, पारंपरिक वाद्यांच्या लयबद्ध निनादात पुढे सरकणारी घोष पथकांचे संचलन मार्गावर अनेक ठिकाणी नागरिकांनी उभे राहून स्वयंसेवकांचे स्वागत केले. घोषाच्या विविध रचनांनी आणि स्वयंसेवकांच्या एकसमान पावलांनी शहराचे संघमय वातावरण निर्माण झाले होते.
सायंकाळी पावणे सात वाजता हरिभाई देवकरण प्रशाला येथून भगव्या ध्वजाला प्रणाम करून संचलनास प्रारंभ झाला. हरिभाई देवकरण प्रशाला, ज्ञानप्रबोधिनी मार्ग, डॉ. फडकुले सभागृह, डॉ. आंबेडकर चौक, महापौर बंगला, अशोक चौक, पटवर्धन चौक, शांतीसागर मंगल कार्यालय मार्गे पुन्हा हरिभाई देवकरण प्रशाला येथे संचलनाची सांगता झाली.
- संचलन रचना ठरली आकर्षण
संचलनाची रचना ही विशेष आकर्षण ठरली. प्रारंभी स्वयंसेवकांच्या वाहिन्या, त्यामागे घोष पथक आणि स्वयंसेवकांच्या वाहिन्या अशा क्रमाने संचलन पुढे सरकत होते. संपूर्ण मार्गावर घोष पथकाच्या तालावर स्वयंसेवकांनी राखलेली शिस्त आणि समन्वय. विशेष हाॅस्पिटल समोर घोष वादन सौम्य असे हि बाब नागरिकांचे लक्ष वेधून घेत होती. या संचलनात संघ शिक्षा वर्गाचे सर्वाधिकारी शशिकांत फिरंगे, वर्ग कार्यवाह प्रशांत सहस्त्रबुद्धे, अखिल भारतीय व्यवस्था प्रमुख मंगेश भेंडे, यांच्यासह विविध अधिकारी सहभागी झाले होते.
‘- संरक्षण दलाच्या संचलनाचा भास’
पूर्ण गणवेशातील स्वयंसेवकांचे संचलन पाहताना अनेक नागरिकांना एखाद्या संरक्षण दलाची शिस्तबद्ध तुकडी शहरातून मार्गक्रमण करत असल्याचा अनुभव आला. घोषाच्या ठेक्यावर एकाच लयीत पडणारी पावले आणि स्वयंसेवकांची ताठ चाल संचलनाचे विशेष आकर्षण ठरली.
- व्यवस्थापनातही स्वयंसेवकांची तत्परता
संचलन सुरळीत पार पडावे यासाठी शहरातील अनेक स्वयंसेवकांनी व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळली. मार्गावरील अडथळे दूर करणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना मार्गदर्शन करणे अशी कामे त्यांनी केली.
---------------------------
कोट
संघ शिक्षा वर्गातील हे संचलन म्हणजे आत्मशिस्त, संघटनबळ आणि राष्ट्रसमर्पणाची अनुभूती आहे. येथे मिळणारे प्रशिक्षण स्वयंसेवकाची गुणवत्ता अधिक सक्षम करणारे असते. पुढील काळात समाजहित आणि राष्ट्रहितासाठी समर्पित कार्यकर्ता म्हणून स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न राहील. सोलापूरच्या घोष पथकाने अत्यंत उत्कृष्ट सादरीकरण केले.”
- शशिकांत फिरंगे, सर्वाधिकारी, संघ शिक्षा वर्ग