
पुणे, ता. ८ एप्रिल (प्रतिनिधी):
"भारतमातेला पुन्हा एकदा परम वैभवाकडे नेण्यासाठी आणि हिंदू धर्म, संस्कृती व समाजाच्या रक्षणासाठी संघटित शक्ती उभी करणे ही काळाची गरज आहे," असे प्रतिपादन मान्यवरांनी येथे व्यक्त केले. सन सिटी रोडवरील निंबज नगर परिसरात आयोजित ‘विराट हिंदू संमेलनात’ ७५० हून अधिक हिंदू बांधव-भगिनींनी राष्ट्रनिर्मितीचा दृढ संकल्प केला.
निंबज नगर परिसर, सन सिटी रोड, आनंदनगर येथे दि. ५ एप्रिल रोजी हे संमेलन मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात पार पडले. दीपप्रज्वलन आणि भारतमाता व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. संमेलनाचे अध्यक्ष महेश बेन्दरकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न झाला.

यावेळी डॉ. अजिंक्य देशपांडे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेपासून ते शताब्दी वर्षापर्यंतच्या गौरवशाली वाटचालीचा आढावा घेतला. एक स्वयंसेवक ते राष्ट्रचळवळ असा संघाचा प्रवास त्यांनी मांडला. अॅड. दक्षाताई मोकाशी यांनी 'पंच परिवर्तन' विषयावर मार्गदर्शन करताना समाजातील बदलाचा व्यापक विचार मांडला. इस्कॉनचे कौस्तुभ प्रभुजी यांनी आपल्या आशीर्वचनातून उपस्थितांना अनुगृहीत केले. शिवव्याख्याते सौरभ कर्डे यांनी आपल्या ओजस्वी वाणीने शिवचरित्र आणि हिंदू संस्कृतीचे सार श्रोत्यांसमोर मांडले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपाध्यक्ष मकरंद सरदेशमुख यांनी केले. संघ शताब्दीच्या पार्श्वभूमीवर, संघाच्या शंभर वर्षांच्या राष्ट्रसेवेचा आढावा घेणाऱ्या 'सांस्कृतिक वार्तापत्र' विशेषांकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

या सोहळ्यात स्वामी समर्थ मंदिराचे सेवेकरी संजय वाघमारे, ज्ञानप्रबोधिनीच्या गायन शिक्षिका श्रुती पावगी व कुचीपुडी गुरु गायत्री आंबेकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. ज्ञानप्रबोधिनीच्या विद्यार्थिनींनी प्रबोधनगीते सादर केली, तर गायत्री आंबेकर यांच्या शिष्यांनी कुचीपुडी नृत्यातून भक्तिमय वातावरण निर्माण केले. अमोल पटवर्धन यांनी गायलेल्या 'वंदे मातरम्'ने संमेलनाचा भावपूर्ण समारोप झाला.