पर्यावरणातील पाच ‘ज’द्वारे कार्यरत स्वच्छतादूत लताताई

पर्यावरणात ५ ज येतात .जमीन ,जंगल,जल,जनावर आणि जन! आणि हे पाचही ‘ज’ परस्पर पूरक आहेत.
जमीन सुपीक राहावी म्हणून सेंद्रिय शेती, पाणी शुद्धीकरण,पाणी बचत,नद्यांची स्वच्छता.भरपूर प्राणवायू मिळावा म्हणून भरपूर झाडे लावणे, जंगल वाढवणे आणि वाचवणे, झाडे भरपूर लावली,वाढवली आणि वाचवली की आपोआप पक्षी,प्राणी यांच्यात वाढ होईल आणि या सर्वांना जोडणारा दुवा म्हणजे माणूस - जन! असे हे एकमेकांवर आधारित सुंदर गणित आहे. असा भरपूर जनसंपर्क असणाऱ्या पर्यावरण रक्षणासाठी झटणाऱ्या लताताई हिरेमठ यांच्या कार्याविषयी...
त्यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकॉम या विषयात उच्च शिक्षण घेतले आहे. निसर्ग संवर्धन आणि नैसर्गिक संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन या विषयात पदव्युत्तर पदविका मिळविली आहे. माझे गाव,माझा परिसर पर्यायाने माझे पुणे,माझा महाराष्ट्र,माझा देश स्वच्छ राहिला पाहिजे हा त्यांचा मूलमंत्र.
घरातील ओला कचरा यापासून उत्तम बाग तयार करता येते यावरील सौ.निर्मला राठी यांचा लेख त्यांनी वाचला आणि निर्मला ताईंच्याच मार्गदर्शनात आपल्या घराच्या छतावर छोटीशी सुंदर बाग तयार केली,त्यांच्या कामाचा झपाटा एवढा होता की त्या सुंदर,सुवासिक आरोग्यदायी फुला फळांनी त्यांना अक्षरशः वेड लावले,मनात एकच ध्यास होता,अजून काय करता येईल...आणि छतावरील त्या बागेतील फुलांनीच त्यांचा उत्साह वाढवला. सोबत विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते असलेले त्यांचे पती राजेंद्र हिरेमठ यांची साथ होतीच,घरातील सर्वांचा पाठिंबा मिळाला.
हळूहळू आजूबाजूच्या घरातून झाडांचा पाला पाचोळा,ओला कचरा त्यांनी आपल्या कडे आणून देण्याचे लोकांना आवाहन केले. निर्माल्य,खरकटे,नखे,केस, नारळाच्या शेंड्या ,भाजीपाला,चहाचा गाळ असे खूप काही ओल्या कचऱ्यात जमा होऊ लागले आणि छोट्या बागेचे मोठ्या जंगलात रूपांतरण झाले.
आपल्या घरावरील २ टेरेस असंख्य फुला- फळांनी बहरले होते, वडगाव शेरी मधील अनेक लोक हे वारकरी संप्रदायाचे आहेत,त्या सर्वांनी ताईंना खूप सहकार्य केले,त्यांनीही प्रेरणा घेऊन ओला कचरा घरीच साठवून त्यापासून कंपोस्ट खत तयार तयार करायला सुरुवात केली. ई - कचरा संकलन केंद्र सुरू केले.
या ई कचऱ्यात रिसायकल होणाऱ्या सर्व वस्तू संकलित केल्या जातात विशेष उल्लेखनीय म्हणजे स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत त्यांच्या ग्रुपला कचरा वर्गीकरण या विषयातील वॉल पेंटिंगला प्रथम पारितोषिक मिळाले आणि त्या संदर्भातील गाण्याला तृतीय पारितोषिक मिळाले.
यातूनच अनेक नवनवीन कल्पना साकार होऊ लागल्या. घरी रेन वॉटर हार्वेस्टिंग केले,स्वयंपाक घरातील पाणी झाडांसाठी,वॉशिंग मशीन मधील वेस्ट पाणी अंगणात टाकण्यासाठी वापरले जाऊ लागले. पाण्याची बचत सुरू झाली.तसेच विजेची सुद्धा बचत सुरू झाली,आवश्यक तेव्हाच आणि आवश्यक तेवढाच विजेच्या उपकरणाचा उपयोग सुरू केला.
घरातील सर्व सण पर्यावरणपूरक साजरे होऊ लागले.शाडूचा गणपती घरीच तयार होऊ लागला,तो घरीच पाण्यात विसर्जन होऊ लागला. पुढील वर्षी त्याच मातीचा गणपती तयार होऊ लागला.
कुणाला भेटवस्तू देताना प्लॅस्टिकच्या वस्तूंचा उपयोग पूर्णतः बंद झाला.कापडी पिशव्यांचा वापर वाढला,दिवसेंदिवस काम वाढल्यामुळे त्यांची जबाबदारी सुद्धा वाढली....कम्पोस्टिंग आणि संबंधित विषयांच्या कार्यशाळा त्या घेतात. ई - वेस्ट कचरा त्यांच्या केंद्रावर जमा होतो. त्यांच्या घरी सुद्धा रेन वॉटर हार्वेस्टिंग,सोलर वॉटर हीटर,सोलर लाईट असे करवून घेतल्यामुळे महानगरपालिकेने प्रॉपर्टी टॅक्समध्ये त्यांना सवलत दिली आहे.
म्हणतात ना विवाह झाल्यावर महिला २ घरांना ,परीवरांना जोडते पण लता ताई इथेच थांबल्या नाहीत तर माहेर कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज असल्याने त्या गावातील लोकांना सुद्धा पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. आपला विविध संस्थांशी असलेला संपर्क त्यांनी असा उपयोगात आणला... सेवावर्धिनी या संस्थेसोबत कोल्हापूर मधील बसर्गे या गावात जलदुत म्हणून त्या काम पाहतात तसेच शेती, जलसंधारण,ग्रामविकास,शिक्षण,आरोग्य,महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात त्यांचे या माध्यमातून काम सुरू आहे.राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत स्वच्छ गाव अभियान सुरू आहे.
ताईंच्या कार्यास शुभेच्छा.
वैशाली देशपांडे