प्रकृती वंदन म्हणजेच काय ?
विविध झाडे, प्राणी, नदी, तळे, पाण्याचे स्रोत इत्यादी सगळयांना पूजनीय मानण्याची, सन्मान देण्याची भारतातील पूर्वापार चालत आलेली परंपरा. प्रकृतीच्या विविध संसाधनांना मनुष्यासमान दर्जा देऊन, पशू पक्षी वनस्पती यांच्यात देवस्वरूप बघून, त्यांच्या अधिकारांचे जतन करण्याची परंपरा, पद्धती आपल्याला ज्ञात आहे.
गेल्या काही दशकांमध्ये मात्र आपले आणि पर्यावरणाचे नाते दुरावू लागले. प्रकृतीवर असलेल्या मनुष्याच्या अवलंबितेचा जणू आपल्याला विसरच पडला. आपण वापरत असलेल्या संसाधनांचा म्हणजे सोप्या भाषेत सांगायचे तर वह्या, पुस्तकं, पेन, रिफिल्स, सौदर्य प्रसाधनं, कपडे, खाद्य पदार्थ, लॅपटॉप, सीडी, बल्ब, ट्यूब, चार्जर, बॅटरी या सगळ्या वस्तू आणि त्याच्या खरेदीतून, वापरातून किंवा पॅकिंग मधून निर्माण होणारा भरमसाठ पॉलिथिन कचरा याचा निसर्गावर रोज दुष्परिणाम होतो हे आपल्याला दिसतच नाही. दिसत नाही म्हणून जाणवत नाही. जाणवत नाही म्हणून आपल्या वागणुकीत काहीही बदल घडत नाही.
प्रकृतीशी आपला असलेला संबंध, प्रकृतीशी आपली जुळलेली नाळ आणि आपल्या वागण्यामुळे आपणच आपल्या जीवनदायी प्रकृतीचा करत असलेला नाश या सगळ्याची जाणीव आपल्याला असायला हवी, पुढे मग याच जाणिवेची परिणती विचार आणि वागणूक बदलण्यात व्हावी हा प्रकृती वंदन या उपक्रमाचा मुख्य हेतू. त्यासाठी आपल्याच पूर्वजांनी आपल्यासमोर घालून दिलेली उदाहरणे पुन्हा अभ्यासावी लागतील. आपल्या पूर्वजांनी विविध कारणास्तव प्रकृतीला कधी देव, कधी रक्षक तर कधी अपत्य मानताना मनुष्याइतकेच महत्त्व देण्याचे धडे दिले.
त्यातूनच मग ‘माता भूमि:, पुत्रो अहं पृथिव्या’ संकल्पनेचा जन्म झाला. जर मी म्हणजेच प्रत्येक व्यक्ती या पृथ्वीचे अपत्य असेल तर पृथ्वीवरील सर्व सजीव हे आपले सहोदर झाले, आणि त्यांचे संरक्षण करणे हे माझे रक्षण करण्याइतकेच महत्वाचे आहे हा विचार समाजामध्ये पसरला. या विचारांचे तंतोतंत पालन आणि त्याप्रमाणे जीवनात प्रत्यक्ष आचरण करण्याची, प्रसंगी बलिदान करण्याची परंपराच उदयास आली. प्रकृती वंदन मध्ये अंतर्भूत निसर्गाप्रती असलेल्या जबाबदारीची, आदराची आणि समर्पणाची भूमिका पुन्हा प्रस्थापित करणे आवश्यक आहे. प्रकृतीची म्हणजे वडाची, नागाची, हरितालिकेची पूजा केवळ औपचारिकता म्हणून न करता त्यामागील निसर्गाप्रती असलेली भावना आणि शास्त्र दोन्ही समजून घेऊन, निसर्ग पूजेचे काळानुरूप आवश्यक स्वरूप आत्मसात करणे म्हणजे खऱ्या अर्थाने प्रकृती वंदन.
------
सहभाग आणि अभिप्रायासाठी इमेल करा - environwarriorswestmah@gmail.com