
ज्ञानभाषा संस्कृतम्
संस्कृत ही ज्ञानभाषा आहे हे सगळ्यांना मान्य आहे, माहित पण आहे. नवीन पिढीला हे कळावे म्हणून नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या आग्रहामुळे भाषा सोडून प्रत्येक विषयाच्या पुस्तकात पहिला पाठ ‘भारतीय ज्ञान परंपरेवर’ राहणार आहे.
संस्कृत भाषा ही भारतीय ज्ञानासाठी अनिवार्य भाषा असल्या कारणाने ती शिकविण्याची व्यवस्था सगळ्या शैक्षणिक संस्थांमध्ये रहावी असा आग्रह सुरु झाला आहे. त्यामुळे आय.आय.टी. मुम्बई, आय.आय.टी. खड्गपुर, आय.आय.टी. कानपुर, एन.आय.टी. नागपुर, रामदेव बाबा अभियंत्रण महाविद्यालय, नागपुर (DeemedUniversity) इत्यादि उच्चशिक्षण देणार्या संस्थांमध्ये प्राध्यापक नियुक्त आहेत.
आय.आय.एम. इंदोर सारख्या संस्थेत auditcourse रूपानी संस्कृत शिकविल्या जाते. ‘भारतीय ज्ञान परंपरा’ नावाचा विभाग जवळपास ३५ विश्वविद्यालयांमध्येउघडल्या गेला आहे. तेथे संस्कृत ग्रंथांवर अनुसंधान होत असते. नवीन पिढी हे करण्यासाठी अहमहमिकेने पुढे येते आहे, ही समाधानाची गोष्ट आहे.
समाजशिक्षण -
पण ज्यांचे शिक्षण समाप्त झाले आहे अश्या सगळ्यांना शिकविण्यासाठी संस्कृतभारतीने कंबर कसली आहे. समाजशिक्षण हा विषय महत्वाचा आहे. कारण वर्तमानकाळी हिंदीसकट संविधान मान्य २१ भाषा प्रादेशिक भाषा आहेत. त्याला अपवाद फक्त इंग्रजी व संस्कृत आहेत. म्हणून भारतात जेंव्हा अखिल भारतीय कार्यक्रम असतो तेंव्हा इंग्रजी माध्यम वापरल्या जाते.विदेशी भाषेचे माध्यम स्वातंत्र्यानन्तर किती वर्ष वापरायचे?भारताला स्वातंत्र्य मिळून ७७ वर्ष झालीत. अजूनही भारतीयांचास्वभाषेत संवाद होऊ नये ही शोकांतिका आहे. इंग्रजीचे स्थान संस्कृतच घेऊ शकते, कारण संस्कृत प्रादेशिक भाषा नाही. प्रादेशिक भाषा नसल्यामुळे संस्कृत सर्व प्रांतातस्वीकार्य आहे. म्हणूनच डा. बाबासाहेब आंबेडकरांनीसंविधान सभेत संस्कृत भारताची संपर्क भाषा व्हावी असा प्रस्ताव आणला होता. दुर्दैवाने तो मान्य झाला नाही. पण ते अपूर्ण राहिलेले काम डा. बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायींनाकरावे लागेल. तेंव्हा कोठे भारत मानसिक दासतेतून मुक्त झाला असे म्हणता येईल. हे काम केवळ संस्कृतभारतीचे नाही. तर ते आधुनिक भगीरथांना करावे लागेल. एका मराठी कवितेच्या या ओळी हेच सुचवितात -
भारताचिया महारथा या सारे मिळुनी ओढू या |
पायी गति अन् हाती शक्ती हृदयी भक्ती जोडू या ||
हे भगीरथ कसे तयार होतील?
केवळ संकल्प सोडून हे होणारे काम नाही. कसे होईल हे मार्गनिर्देशन पण करावे लागेल. भारताचे पूर्व राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी पण भारतासमोर२०२० हे लक्ष्य ठेवले होते.यावर्षी भारत महाशक्ती बनावा ही त्यांची इच्छा होती. पण कसा बनेल हे काही त्यांनी सांगितले नाही. त्यामुळे भारत महाशक्ती होऊ शकला नाही.
संस्कृत जनाभाषा करण्यासाठी, संस्कृत माध्यमातून शिकवू शकतात असे शिक्षक तयार करणे प्रथम आवश्यक आहे. ते साधण्यासाठी वसती-वसतीत संस्कृत संभाषण वर्ग आयोजित करणे उपयोगी आहे. जेथे संस्कृत शिकण्यास इच्छुक, काही नागरिक एकत्र येतील तेथे शिक्षण सुरू करावे. जवळ-पास जो संस्कृत शिक्षक उपलब्ध असेल तो शिकवेल. संस्कृतभारतीतर्फे असे १६०९ वर्ग भारतभर सुरु आहेत.ज्यात ३९,४२९ नागरिक शिकतात.
रूची वाढल्याने ते नागरिक सुटीच्या दिवशी अधिक वेळ देऊ शकतील. तेवढाच संस्कृत शिकण्याचा कालावधी वाढेल.
जेंव्हा विद्यालयांना अथवा महाविद्यालयांना दीर्घ सुट्या असतात त्या काळात स्थानाची उपलब्धता व शिक्षकांची उपलब्धता असल्याने सात दिवसांचा आवासी वर्ग होऊ शकतो, ज्यात केवळ भाषा शिक्षण व्हावे.
एकदा तोंडात भाषा आली की त्या नागरिकांना कसे सोप्या पद्धतीने संस्कृत शिकवायचे हे शिकवणे आवश्यक असते. त्यासाठी १२ दिवसांचा आवासी वर्ग आवश्यक असतो. गत वर्षी असे आवासी प्रशिक्षण घेतलेल्यांची संख्या भारतात ४५१० आहे. दरवर्षी हे आयोजन होत असल्याने तेव्हडी संख्या प्रतिवर्षी वाढते. परिणाम स्वरूप तेव्हडे संस्कृत शिक्षणाचे वर्ग वाढतात.
प्रशिक्षणात “संस्कृतचित्ता भारतभक्ता राष्ट्रनवोदयकाङ्क्षिणः|
सुदृढमनस्का……………राष्ट्रं जागरयाम वयम् ||”अशी गीते गायली जातात. त्याने ‘संस्कृत एक साधन आहे, साध्य नाही’ हे स्पष्ट होते. राष्ट्राच्या उत्कर्षासाठी संस्कृत, विश्वाच्या कल्याणासाठी संस्कृत हे ध्येय निश्चित होते. या ध्येययज्ञात माझी आहुती पडावी ही भावना प्रबळ होते.
अश्या ध्येयवादी मनुष्यांचे संघटन बांधले जाते. त्या संघटनेचे नाव आहे – “संस्कृतभारती”. हे संघटन भारतातल्या ७२% जिल्ह्यात व ३४% विकास खंडात सक्रीय आहे. ह्यासारखी अनेक कामे वाढली की भारताची जनभाषा संस्कृत होण्यास वेळ लागणार नाही. संस्कृत दिनाच्या निमित्ताने सगळ्या संस्कृत प्रेमींनी हा संकल्प करावा व भारत स्वभाषेच्या बळावर उन्नती करतो आहे हे जगाला दाखवून द्यावे. त्यानेच भारताची जगात प्रतिष्ठा अजून वाढेल.
जय हिंद
!
श्रीश देवपुजारी,
अखिल भारतीय संपर्क प्रमुख, संस्कृतभारती.
shreeshdeopujari@gmail.com