पुण्याची सामाजिक व सांस्कृतिक चेतना : मानाचे पाच गणपती
पुण्याचा गणेशोत्सव हा केवळ धार्मिक नव्हे, तर हिंदू समाजाची संघटित शक्ती, सांस्कृतिक अस्मिता आणि राष्ट्रचेता जागवणारा एक ऐतिहासिक उत्सव आहे. पराधीनतेच्या काळात लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाला राष्ट्रीय स्वरूप दिले. या उत्सवाच्या माध्यमातून हिंदू समाजाला एकत्र आणणे, राष्ट्रधर्म जागवणे आणि सामाजिक प्रबोधनाला गती देणे हाच मुख्य उद्देश होता. पुण्यातील पाच मानाच्या गणपतींची परंपरा म्हणजे या सांस्कृतिक वारशाचा आणि धर्मनिष्ठेचा मुख्य पाठीचा कणा आहे. विसर्जन मिरवणुकीत या मानाच्या गणपतींच्या क्रमाने दिलेला मान हे पुण्याच्या अनुशासित परंपरेचे प्रतीक आहे.
१. श्री कसबा गणपती (प्रथम मान)

पुण्याचे ग्रामदैवत मानले जाणारे श्री कसबा गणपती हे मानाच्या गणपतींमध्ये अग्रस्थानी आहेत. छत्रपती शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक कसबा पेठेत हे स्थान आहे. इ.स. १६३० मध्ये जिजाऊ बाल शिवाजींसह पुण्यात आल्या असता, त्यांना या ठिकाणी स्वयंभू मूर्ती सापडली. जिजाऊंनी ही घटना अत्यंत शुभ मानून येथे मंदिराची उभारणी केली. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्यानंतर श्री कसबा गणपतींना विसर्जन मिरवणुकीत पहिला मान देण्याची परंपरा सुरू झाली.
२. तांबडी जोगेश्वरी गणपती (दुसरा मान)

पुण्याची ग्रामदेवता म्हणून पूजल्या जाणाऱ्या तांबडी जोगेश्वरी देवीच्या प्रांगणात हा गणपती विराजमान होतो. तांबडी जोगेश्वरी मंदिर हे पुण्यातील प्राचीन आणि अत्यंत पवित्र शक्तिपीठ मानले जाते. धार्मिक श्रद्धा आणि सामाजिक एकात्मता यांचा मिलाफ या गणपतीच्या उत्सवात पाहायला मिळतो. स्थापना व विसर्जन मिरवणुकीत तांबडी जोगेश्वरी गणपतीला दुसऱ्या क्रमांकाचा मान दिला जातो.
३. गुरुजी तालीम गणपती (तिसरा मान)

गुरुजी तालीम मंडळाची स्थापना १८८७ मध्ये झाली. म्हणजेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक उत्सव सुरू करण्यापूर्वीपासूनच ही परंपरा अखंडपणे सुरू आहे. सामाजिक सलोखा आणि परस्पर विश्वासाचे प्रतीक म्हणून या गणपतीकडे पाहिले जाते. गणेशोत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रसंघटन आणि समाजहित साधण्याचा संदेश हे मंडळ सातत्याने देत आले आहे. विसर्जन मिरवणुकीत या गणपतीला तिसरा मान मिळतो.
४. तुळशीबाग गणपती (चौथा मान)

पुण्याच्या मध्यवर्ती व्यापारी पेठेत स्थित तुळशीबाग गणपतीची मूर्ती तिच्या भव्य, विलोभनीय आणि तेजस्वी स्वरूपासाठी प्रसिद्ध आहे. ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या तुळशीबाग परिसरात या उत्सवाच्या काळात लाखो भाविकांची आणि धर्मप्रेमींची गर्दी जमते. धार्मिक परंपरेसोबतच लोकजागरणाचा वसा जपणारा हा गणपती मिरवणुकीत चौथ्या स्थानावर असतो.
५. केसरीवाडा गणपती (पाचवा मान)

केसरीवाडा गणपती हा थेट लोकमान्य टिळकांच्या विचारांशी आणि स्वातंत्र्यलढ्याच्या संघर्षाशी जोडलेला गणपती आहे. १८९३ मध्ये सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात करून टिळकांनी याच भूमीतून राष्ट्रजागरणाची मशाल पेटवली. स्वधर्म, स्वदेशी आणि स्वराज्याचा संदेश देणारे हे केंद्र आजही हिंदू संस्कृती आणि राष्ट्रवादाची प्रेरणा देत उभे आहे. विसर्जन मिरवणुकीत केसरीवाडा गणपतीला पाचवा मान दिला जातो.
पुण्यातील मानाच्या पाच गणपतींची ही गौरवशाली परंपरा म्हणजे केवळ श्रद्धेचा विषय नसून, हिंदू समाजाला संघटित आणि जागृत ठेवणाऱ्या एका महान राष्ट्रयज्ञाचे प्रतीक आहे.
- ऋता पाटील