प्रचारकांच्या माता
चंदाताई साठे (राष्ट्र सेविका समिती)
मी गोव्याच्या शिबिरात असताना आमच्या बाबांच्या निधनाची बातमी समजली. मी तेंव्हा घरी १४ दिवस रहायला होते. बाबांचा चौदावा दिवस झाल्यावर मी आईपाशी गेले. पुढे काय करावे सुचत नव्हते. आईला तेव्हा २४ तास प्राणवायू चालू होता. आईला विचारले काय करू? आई दुसऱ्या क्षणी म्हणाली " तू जा तुझ्या कामाला! बाबांचं काम तुला पुढे चालवायचं आहे. घरी थांबू नकोस”. असं होतं त्यांचं परस्परपूरक आयुष्य! धन्य ती माऊली!
राजमाता जिजाबाई यांचे एका गीतात वर्णन केले आहे. "वो न माता थी केवल शिवा बाल की, चिंता करती थी मन में सभी राष्ट्र की । हम भी मातृत्व सुविशाल ऐसा करे, देश कार्यार्थ जीवन समर्पण करे।।"
वरील गीतातील वर्णन सार्थक ठरवणाऱ्या जिजाबाईंप्रमाणे माझ्या आईच्या प्रेरक अनुभवांचे स्मरण माझ्या कामाला परत एकदा उर्जा देईल असं वाटतं. आपल्या आईबद्दल लिहायला सांगितलं की प्रत्येक जण पुस्तक लिहू शकतो एवढ्या आठवणी, शिकवण असते प्रत्येकाजवळ. सर्वात प्रथम म्हणजे इतकी वर्ष समितीचे प्रचारिका म्हणून मला काम करायला मिळत आहे याचे खूप मोठे श्रेय आईला आहे. माझ्या दोघी बहिणीही काही काळ प्रचारिका होत्या. आपल्या तीन मुलींना समाजकार्यासाठी प्रचारिका म्हणून घरातून बाहेर पाठवणे यातच आई - बाबांचे मोठेपण आहे. या कामासाठी समितीतर्फे सध्याच्या वंदनीय प्रमुख संचालिका मा. शांताक्का यांच्या हस्ते 'आदर्श माता' म्हणून आईचा सत्कार झाला होता. सत्कार करताना त्या आईला म्हणाल्या “आपने बहुत बडा काम किया हैं”| त्यावर आईचं उत्तर होतं " मैने कुछ नहीं किया है, बेटियों की इच्छा थी इसलिए उन्होंने काम किया।" असं सहज, निरहंकारी व्यक्तिमत्व तिचं होतं. माझ्या मोठ्या ताईचा मुलगा पण पाच वर्षं प्रचारक होता. तो घरातून प्रचारक म्हणून बाहेर पडल्यावर ताई म्हणाली... “एक मुलगा बाहेर पडला तरी वाईट वाटतंय, आईने आपल्या तिघींना कसं पाठवलं असेल !”
आईने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीचं शिक्षण घेतलं. मोठेपणी तिने दासबोधावरील परीक्षा दिल्या. तिला वाचनाची खूप आवड होती. रोजचं वर्तमानपत्र, रामायण-महाभारताचे खंड, क्रांतीकारक कथामाला ते सुधा मूर्ती अशी अनेक प्रकारची पुस्तके आईने वाचली होती. तिच्या शेवटच्या गंभीर आजारपणात आईला २४ तास प्राणवायू द्यायला लागायचा. त्याही अवस्थेत तिने २३-२४पुस्तकं वाचली होती.
वाचनासोबत आईला लिखाणा-ची पण आवड होती. तिचं अक्षर सुरेख होतं. कुठल्याही प्रवासातून आल्यावर आई सुंदर वर्णन करून पत्र लिहायची. नवीन नवीन पदार्थाच्या पाककृती, वाचनात आलेला चांगला मजकूर डायरीमध्ये लिहून ठेवायची. तिने निवडणुकांच्या काळात हजारो स्लीप लिहील्या असतील. आई अनेक व्याख्याने, कार्यक्रम ऐकायला आवर्जून जायची.
तिचे घड्याळाचे काटे कधीही चुकले नाहीत. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आईचं सर्व काम अतिशय वक्तशीर ! नव्हे, वेळेपूर्वीच झालेले असायचे. सकाळी लवकर उठणं, फिरायला जाणं , नियमित व्यायाम करणं हे चुकायचं नाही. दिलेली वेळ न पाळणं , उशीर करणं आईला अजिबात आवडायचं नाही. आजारपणात पण नाश्ता, जेवण अगदी वेळेवर करायची. कोणी सवाष्ण, पाहुणे घरी जेवायला येणार असतील तर सगळं आवरून बाहेर खुर्चीत येऊन बसायची. सकाळपासून रात्रीपर्यंत आकाशवाणीसुद्धा वेळेवरच लागायची. आईच्या या स्वभावामुळे बाबांना ऑफिस, शाखा, उत्सव, कार्यक्रम, मोतीबाग, अन्य सामाजिक उपक्रम येथे जायला कधीच उशीर झाला नाही.
स्वच्छता आणि व्यवस्थितपणा हे पण आईचे जिव्हाळ्याचे विषय होते. आज संघटनेत काम करताना मला या गुणांचा खूप उपयोग होतो. कोणी मला याबद्दल विचारले तर मी म्हणते आमची आई तशी होती म्हणून आम्ही तसे झालो. शाखेचा गणवेश असो किंवा कुठलेही भाषण द्यायचे असो ते सर्व व्यवस्थितच झाले पाहिजे यासाठी ती प्रोत्साहन द्यायची.
बाबांचे संघकार्य, सामाजिक उपक्रम, मोठे कुटुंब, असंख्य पाहुणे, आम्हा चौघी बहिणींचे शिक्षण, या सर्वात आई बाबांची एकमेकांना खूप साथ होती. एकत्र कुटुंब, नगरचा मोठा वाडा, आमच्या मैत्रिणी, नातेवाईक यांचे आदरातिथ्य याचे सर्व श्रेय आईच्या शांत, मनमिळाऊ आणि कष्टाळू स्वभावाला आहे. नगरला असताना सार्वजनिक गणेशोत्सवात खिरापत करून देणे, शाखेत गोकुळाष्टमीला काला करून देणे, संक्रांतीला बाबांना ऑफिस, शाखा, नातेवाईक, सोसायटी येथे वाटायला भरपूर तीळगूळ करून देणे हे सर्व ती आनंदाने करायची. बाबांच्या शाखेत धुंधुरमासाच्या कार्यक्रमात गुळाच्या पोळ्या, स्वयंपाक करणे यात आईचा मोठा वाटा असायचा. घरातील सर्व सणवार खूप उत्साहाने आणि साग्रसंगीत करायची. बाबा कायमच आईला स्वयंपाकघर ते बाहेरचे काम अशा सर्व कामात मदत करायचे. आई अतिशय सुगरण होती, त्यामुळे 'अतिथी देवो भव' आणि 'अतिथी सुखी भव' असं व्हायचे! घरात स्वयंपाक करायला, अन्य काम करायला येणाऱ्या मावशींची पण खूप काळजी घ्यायची.
मी गोव्याच्या शिबिरात असताना आमच्या बाबांच्या निधनाची बातमी समजली. मी तेव्हा घरी १४ दिवस रहायला होते. बाबांचा चौदावा दिवस झाल्यावर मी आईपाशी गेले. पुढे काय करावे सुचत नव्हते. आईला तेव्हा २४ तास प्राणवायू चालू होता. आईला विचारले काय करू? आई दुसऱ्या क्षणी म्हणाली " तू जा तुझ्या कामाला! बाबांचं काम तुला पुढे चालवायचं आहे. घरी थांबू नकोस”. असं होतं त्यांचं परस्परपूरक आयुष्य! धन्य ती माऊली!
लग्नानंतर बाबांमुळे आई शाखेत जायला लागली. नगरला असताना तिच्याकडे समितीची जबाबदारी पण होती. अनेक वेळा वर्गावर, शिबिरात व्यवस्थेत पण जायची. आईनी आम्हा चौघी बहिणींना शिक्षणात, खेळाच्या स्पर्धात , इतर अनेक गोष्टी शिकायला कायम प्रोत्साहन दिलं. आम्ही बहिणी शिकत असताना समिती प्रवास, अनेक वर्गांवर शिक्षिका, परप्रांतात शिक्षिका, कारसेवा अशा सर्व ठिकाणी आईनी आम्हाला सहज पाठवलं. आता या सर्व गोष्टी आठवल्या की आश्चर्य वाटतं ! पुण्याला दाक्षायणी शाखेत आई जायची. एकदा आईची तब्येत खूप खालावलेली होती, तिला प्राणवायू चालू होता. तेव्हा एक दिवस शाखेतील तिघीजणी आईला भेटायला आल्या, तिला झोप लागली होती. थोड्यावेळाने जेव्हा तिला उठवलं तेव्हा आई फक्त दोन मिनिटं त्यांच्याशी बोलली आणि तिला परत झोप लागली. त्या तिघी दुसऱ्या खोलीत जाऊन बसल्या. दहा मिनिटांनी आई परत उठली आणि म्हणाली “माझी या वर्षीची गुरूदक्षिणा वहायची राहिली आहे. त्यांना पाकिटात घालून दे”. अशा अवस्थेतसुद्धा तिला आपल्या कर्तव्याची जाणीव आणि असलेला समर्पणभाव बघून आम्ही अवाक् झालो.
आईचा स्वभाव अतिशय विनम्र होता. कोणीही भेटले तरी दोन्ही हात जोडून नमस्कार करायची. आई जाण्यापूर्वी डॉक्टर तपासायला आले होते. अंगात अजिबात ताकद नव्हती , खूप दम लागला होता त्यावेळीसुद्धा डॉक्टरांना दोन्ही हात जोडून मान उचलत नमस्कार केला. जणू इतके वर्ष केलेल्या उपचाराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आईचा प्रेमळ स्वभाव, हसतमुख चेहरा, वेळोवेळी मिळालेली शाबासकी आणि समितीकार्य करण्यासाठी दिलेली प्रेरणा या सर्वासाठी तिला पुनश्चः वंदन.
माझ्या आईप्रमाणेच इतर अनेक प्रचारकांच्या माताही अशाच महान आहेत ज्यांचा उल्लेख इथे करावासा वाटतो.
आम्हा तीन बहिणींना पूर्णवेळ काम करण्यासाठी जसे आमच्या आई-बाबांनी प्रोत्साहन दिले तसे तीन सख्खे भाऊ - बहिणी प्रचारक आहेत असे जोशी कुटुंब, चौथाईवाले कुटुंब, घाटे कुटुंब या कुटुंबातील माता भगिनींचे पण खूप विशेष आहे. त्यांच्या आईला पण साष्टांग नमस्कार. असेच एक प्रचारक,सौमित्रजी गोखले, जे विश्व विभागात काम करतात. त्यांच्या आईचा एक प्रसंग - पुण्यात मुख्य चौकात वाहतूक कोंडी झाली. दुचाकी वाहने पादचारी मार्गावरून जायला लागली. त्यावेळी त्या पादचारी मार्गावर उभ्या राहिल्या आणि रस्ता अडवून आणि म्हणाल्या, 'माझ्या अंगावरून वाहने न्या पण मी इथून हलणार नाही.' लोक आपोआप खालच्या रस्त्यावरून जायला लागले. चालणाऱ्या लोकांना रस्ता मिळण्यासाठी त्यांचे सजग नागरिक म्हणून तिने केलेले कर्तव्य खचितच कौतुकास्पद होते.
असेच डॉ. मनमोहनजी वैद्य आणि डॉ. रामजी वैद्य दोघे भाऊ प्रचारक आहेत. ती आठ भावंडे आहेत. आठ मुलं झाल्यानंतर त्यांच्या आईने ६३ व्या वर्षी एम.ए ही पदवी प्राप्त केली! कोणा प्रचारकांची आई आणीबाणीत कारागृहात होती तर कोणी भूमिगत असलेल्या अनेक कार्यकर्त्यांची 'आई' झाल्या. राष्ट्र सेविका समितीच्या द्वितीय प्रमुख संचालिका वंदनीय ताई आपटे जेव्हा गेल्या तेंव्हा दुसऱ्या दिवशी वर्तमान पत्रात अग्रलेख आला. "हिंदुत्वाचे मातृह्रदय हरपले!" त्यांनीही अनेक संघटनांच्या पूर्णवेळ कार्यकर्त्यांची आजारपणात, अन्य वेळेस खूप सेवा केली, काळजी घेतली. नुकत्याच झालेल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत बैठकीत दोन सख्खे भाऊ एकाच दिवशी प्रचारक निघाले त्या विदार मावशींना ही नमन!
देशविरोधी लोकांनी मुलाची हत्या केल्यानंतर गुरूदक्षिणा उत्सवात त्याने साठवलेली गंगाजळी आणि गुरूदक्षिणा शाखेवर घेऊन येणाऱ्या आईचं हृदय कुठल्या रक्ताचं बनलं असेल हे समजणं आपल्या बुद्धीपलीकडचं आहे! अशी देशभर अनेक उदाहरणे असतील. आपल्या देशाची परंपरा, इतिहास असाच प्रेरणादायी आहे ज्याचे आपण पाईक आहोत. गुरू गोविंदसिंग यांच्या चार पुत्रांच्या बलिदानानंतर माता गुजरी देवी म्हणतात. “चार गए तो क्या हुआ, बाकी कई हजार!” अशा थोर मातृहृदय असणाऱ्या वीरमातांचे आपण वंशज आहोत.
मातृ देवो भव!
साभार सांस्कृतिक वार्तापत्र मातृप्रेरणा विशेषांक २०२४