थोर लेखक गंगाधर गोपाळ गाडगीळ यांचा जन्म २५ ऑगस्ट १९२३ चा. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगतेनिमित्त लिहायचे म्हणून बसलो, आणि मन एकदम चाळीस वर्षे मागे गेलं. मी त्यावेळी सोळा वर्षाचा होतो. माझी आई एकदा मला म्हणाली, “आपल्या घराजवळ मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय आहे. आज तिथे संध्याकाळी गंगाधर गाडगीळ यांचा षष्ट्यब्दी समारंभ आहे. त्याला तू जा आणि घरी येऊन मला सांग, कोण कोण आलं ... काय काय घडलं.” मी तोवर पाठ्यपुस्तकातूनच गाडगीळ यांचं नाव वाचलं होतं. म्हटलं बघू तरी, लेखक तो दिसतो कसा प्रत्यक्षी !
तो दिवस होता २७ ऑगस्ट १९८३. कार्यक्रमाला गुलाबदास ब्रोकर, समीक्षिका सुधा जोशी, अर्थतज्ज्ञ द. रा. पेंडसे, कवी रमेश तेंडुलकर असे लोक उपस्थित होते, आणि ते गाडगीळांच्या गौरवपर बोलले. या प्रसंगी गाडगीळ जे बोलले त्यातून त्यांचा मिश्किल स्वभाव आणि परखड वाणी या दोहोंचेही दर्शन घडले. ते म्हणाले, "हे लोक माझ्याबद्दल एवढे चांगले बोलले आहेत की मला वाटू लागले आहे की मी खरोखरच एवढा हुशार माणूस आहे की काय!!" पुढे ते म्हणाले, "मी आता साठ वर्षांचा झालो म्हणजे मी आता तरुणांना संदेश वगैरे द्यावा, अशी अपेक्षा केली जाईल, तेव्हा दोन गोष्टी सांगतो. जीवनाच्या कुठल्याही इतर क्षेत्राप्रमाणे लेखनाच्याही बाबतीत तुमचे नाव पुढे यावे म्हणून काही करायला जाऊ नका. तुमचं कामच बोलेल. दुसरं म्हणजे आता 'अनुदानप्रधानसंस्कृती' बोकाळत आहे, तिच्यापासून सावध राहा."
त्यादिवशी माझ्या मनात या माणसाबद्दल कुतूहल निर्माण झालं. मी त्यांचं लेखन वाचू लागलो. ते ज्या कार्यक्रमांना असतील तिथे शक्य असेल तेव्हा जाऊ लागलो. गाडगीळ एक व्यक्ती म्हणून, एक लेखक म्हणून समजून घेण्याची माझी ही प्रक्रिया आजही सुरूच आहे.
सगळ्याच गोष्टी काही एकदम समजत नाहीत, पण म्हणून ते विषय सोडून देऊ नयेत. उदाहरणार्थ, एका मराठी लेखकाच्या षष्ट्यब्दीला गुजराती भाषक कसे काय आवर्जून उपस्थित राहतात, गुलाबदास ब्रोकर हे तिथे वक्ते म्हणून कसे, हे मला तेव्हा पडलेले प्रश्न होते. नंतर त्यांचा हळूहळू उलगडा झाला. मी कॉलेजजीवन संपवून नोकरीला लागलो, आणि मग थोडा वेळ मिळू लागल्यावर त्यांचं आत्मकथन वाचनात आलं. तेव्हा मला कळलं की, गाडगीळ हे काही फक्त लेखक नव्हते. ते विविध उद्योगांना अर्थविषयक सल्ला देत असत. शिवाय नरसी मोनजी, सिडेनहॅम अशा, अमराठी भाषकांचे प्राबल्य असलेल्या ठिकाणी त्यांनी प्राध्यापक म्हणून आणि प्राचार्य म्हणून काम केलं आहे. एवढेच नव्हे तर ते साहित्य अकादमीवर आधी सदस्य म्हणून आणि नंतर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. .
आधुनिक मराठी कथेचे जनक म्हणून ज्या बिनीच्या चार-पाच लेखकांची नावे आपण घेतो, त्यात गाडगीळ यांचं नाव अगत्यानं घेतलं जातं. या नवकथाकारांची मांडणीच निराळी होती. ती घटनाप्रधान कथा नव्हती. तिला ना. सी. फडक्यांच्या कथेप्रमाणे "आरंभ, मध्य आणि शेवट" असा नव्हता. प्रामुख्याने १९४२ ते १९६० हा तो कालखंड आहे. काळानुरूप समाजात बदल घडत होते, आणि ते होत असताना माणसं त्याला कशी सामोरी जात होती ? सुखद प्रसंगांना आणि दुःखद प्रसंगांनाही, याचं लेखक म्हणून तटस्थ चित्रण, ही कथाकार मंडळी करत होती. यात कुठेही बोधपर सल्ले नव्हते, की नुसतीच कल्पनारम्यताही नव्हती. त्यामुळे, या कथांवर अनेक आक्षेप घेण्यात आले.
नाटककार विद्याधर गोखले म्हणायचे, “एकदा मी नाटक लिहून सादरकर्त्यांच्या हातात दिलं, की ते प्रेक्षकांचं होतं. मी त्यावर माझी बाजू मांडत बसत नाही. ‘ठुकरा दो, या प्यार करो’ अशी माझी भूमिका असते. मी दुसऱ्या लेखनाकडे वळतो.” आता, दृष्टिकोन म्हणून हे चुकीचे नाही. पण गाडगीळ यांनी मात्र त्यांच्या लेखनावरच्या आक्षेपांना लेख लिहून उत्तर द्यायला सुरुवात केली तेव्हा ’स्वत:ची बाजू मांडणारा’ अशी नव्हे, तर ‘वादांची खुमखुमी असलेला लेखक’ अशी त्यांची प्रतिमा होऊ लागली. गाडगीळ अर्थातच डगमगले नाहीत. त्यांनी ’दोन द्यावेत आणि दोन घ्यावेत’ या वृत्तीने, पण संयमाने आणि उमदेपणाने, या क्षेत्रात पाय रोवले.
वादपटू म्हणून प्रतिमा असलेले गाडगीळ त्यांच्या आत्मकथेमध्ये मात्र एका ठिकाणी विलक्षण बचावात्मक पवित्र्यात मला आढळले, आणि आश्चर्य वाटलं. स्वराज्य दृष्टिपथात आलेलं असताना पंडित नेहरू चौपाटीवरच्या सभेत तरुणांना उद्देशून म्हणाले होते, "स्वराज्य आम्ही मिळवणार आहोत. आता नव्या भारताची उभारणी करण्याची तयारी तुम्ही करा." गाडगीळ म्हणतात, "त्यांचं हे बोलणं ऐकून मी स्वतःशीच कडवटपणाने हसलो. स्वराज्य मिळवण्यासाठी मी काही केलं नव्हतं, आणि आता नव्या भारताची उभारणी करण्यासाठी काही करण्याची कुवतही माझ्या अंगात नव्हती. जगात एवढी उलथापालथ घडत होती, आणि मी पोटापाण्याच्या विवंचनेतच गुरफटलेला होतो."
देशावरील प्रेमापोटी ते असं लिहून गेले असतील. पण स्वातंत्र्य मिळालं तेव्हा खरं तर गंगाधरराव अवघे २४ वर्षांचे होते. त्यांच्यावर बहिणींच्या लग्नाची आणि चार भावांच्या शिक्षणाची - म्हणजे त्यासाठी पैसे उभारण्याची - जबाबदारी होती. हे सगळे सोडून एखाद्या क्रांतिकारकाप्रमाणे त्यांनी फासावर जायला हवं होतं, की, आंदोलनांमध्ये सहभागी होऊन देहदंड भोगायला हवा होता? हा माझ्या मते एक नैतिक पेचच होता.
मात्र, स्वराज्य मिळाल्यानंतर ते सुराज्यात रूपांतरित व्हावं म्हणून गाडगीळांनी आपला वाटा उचलला. ते ‘मुंबई ग्राहक पंचायत’चे २५ हून अधिक वर्ष अध्यक्ष होते. अर्थशास्त्राचे ज्ञाते असल्यामुळे, त्यांना या ग्राहक पंचायतीच्या कामाला एक वेगळं वळण देता आलं.
आपल्या मिळकतीतील काही रक्कम त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे ट्रस्ट स्थापन करून तिकडे दिली. साहित्याचे विद्यार्थी, ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते, आणि मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयासारख्या संस्था यांना त्या रकमेतून दरवर्षी काही पुरस्कार सुरू केले.
गाडगीळ कथाकार म्हणून जेवढे स्मरणात आहेत त्या मानाने त्यांच्या इतर लेखनाकडे आपले दुर्लक्ष तर झाले नाही ना, हा प्रश्न आपण सर्वांनी मनाला विचारण्यासारखा आहे. त्यांचे हे लेखन वाचले नाही तर आपण एका आनंदाला, किंवा असं म्हणू की जीवनदर्शनाला, मुकणार आहोत.
२३ जुलैला लोकमान्यांची जयंती असते आणि एक ऑगस्टला पुण्यतिथी. गाडगीळांनी लोकमान्य टिळकांवर लिहिलेल्या 'दुर्दम्य' या कादंबरीचा निदान काही भाग तरी वाचला जाईल असा प्रयत्न या कालावधीत दर वर्षी आपण करूया. ही कादंबरी लिहिण्यापूर्वी गाडगीळ अनेक लोकांना भेटले, मुलाखती घेतल्या, टिपण काढत होते. या लेखनात ते इतके गुंतले की त्यांची धाकटी मुलगी चित्रलेखाला वाटू लागलं की, टिळक हे बहुधा आपले नातेवाईक असावेत!
आपल्या शहरावर या गृहस्थाचं खूप प्रेम होतं. त्यामुळे त्यांनी मुंबईवर ‘प्रारंभ’ ही कादंबरी लिहिली. ही कादंबरी लिहीत असताना त्या काळातली कितीतरी मोठी व्यक्तिमत्व त्यांना खुणावू लागली. म्हणून न्यायमूर्ती रानडे, दादाभाई नवरोजी, डॉक्टर भाऊ दाजी यांच्या जीवनावरही त्यांनी कादंबऱ्या लिहिल्या आहेत.
सरतेशेवटी सांगायचं तर गंगाधर गाडगीळ यांना पूर्ण समजून घ्यायचं असेल तर त्यांचं "एका मुंगीचे महाभारत" हे आत्मकथन आणि "आठवणींच्या गंधरेखा" हे व्यक्तिचित्रपर पुस्तक जरूर जरूर वाचा आणि हो, याला पूरक वाचन म्हणून एक पुस्तक आणखी सुचवतो: त्यांच्या पत्नीने म्हणजे वासंतीबाई गाडगीळांनी लिहिलेलं ‘रांगोळीचे ठिपके’.
जन्मशताब्दीवर्षानिमित्त, या उमद्या व्यक्तिमत्त्वाला, उत्तम लेखकाला आणि त्याच्या स्मृतींना माझं वंदन !!
=====
-- आनंद द. गाडगीळ
(anandaditee@gmail.com | ८८७९९७०३०९)
औचित्य साधून छान लिहिलं आहे. भाषा सहज, सोपी , ओघवती आहे. वाचनाचा आनंद मिळाला .
गीता दिवाण
12 Aug 2023 15:07
छान लिहिले आहे गाडगीळ यांचे लिखाण फार वाचले नसले तरी हे वाचल्यानंतर नक्कीच वाचन करेन
पद्माकर न शिधये
10 Aug 2023 08:14
लेख आवडला.
नितीन देशपांडे
09 Aug 2023 15:54
लेख छानच आहे. ओघवत्या शैलीमुळे वाचायलाही आनंद मिळतो. आपले अभिनंदन.
पण (इतुके लिहिल्याउपरही) या लेखातून गंगाधरराव 'पुरेसे' दिसत नाहीत.
गंगाधररावांच्या भारदस्त चेहऱ्यामागचा अवखळ, मिश्कील माणूस अनेकांनी बघितलाच नाही.
प्रस्तुत लेखकमहोदयांंना (पक्षी आनंदरावांना) विनंती आहे की त्यांनी एखादी लेखमाला लिहून प्राध्यापक गाडगीळ, अर्थशास्त्री गाडगीळ, प्रवासी गाडगीळ, नाटककार गाडगीळ, जागृत ग्राहक गाडगीळ (व इतर) अशा गंगाधररावांच्या विविध प्रकारच्या लेखनाबद्दलही लिहावे.
मोहन लेले
09 Aug 2023 15:22