विश्व संवाद केंद्र - पुणे
11 days ago
इथे घडतात कार्यकर्ते... - संघ शिक्षा वर्ग - भाग ४

नागपूरच्या १९४० सालातील 'ओटीसी'ला १ मे रोजी प्रारंभ झाला होता. संघसंस्थापक डॉ. हेडगेवार या वर्गासाठी पुण्यातील वर्गातून निघून १६ मे रोजी नागपुरात पोहोचले. तब्येत बिघडलेल्या स्थितीतही या वर्गातील स्वयंसेवकांपुढे ९ जून रोजी डॉक्टरांनी जे भाषण केले ते अविस्मरणीय होते. स्वयंसेवक आणि कार्यकर्त्यांसाठीचे ते पाथेय आहे.
----
'संघ शिक्षणाचे वर्ग' आयोजित करण्यामागील संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांचा उद्देश अगदी स्पष्ट होता. संघाच्या शाखांना चांगले शिक्षक आणि संघाला चांगले कार्यकर्ते मिळावेत, हाच वर्ग सुरू करण्यामागील उद्देेश. तो वेळोवेळी डॉ. हेडगेवार यांनी पत्रांमधून आणि वर्गासंबंधीची जी पत्रके डॉक्टर स्वतःच्या स्वाक्षरीने काढत असत, त्यातूनही विशद केलेला आहे.
वर्गाचे शुल्क किती होते... ?
डॉक्टरांनी काढलेली या पत्रकांमध्ये अगदी बारीक-सारीक सूचनांचाही समावेश आहे. वर्गाची माहिती देणाऱ्या २४ एप्रिल १९३३ च्या पत्रकातील एक मुद्दा वाचताना वर्गाचे तत्कालीन शुल्क वगैरेची माहिती मिळते. त्यात म्हटले आहे, ''प्रत्येक स्वयंसेवकाला त्यांच्याकरितां उघडलेल्या वसतिगृहांतच रहावें लागेल. वसतिगृहात जेवणाऱ्या स्वयंसेवकाला एकंदर खर्च रु. २० येईल. ज्या स्वयंसेवकाची भोजनाची सोय गावात कोणाकडे होणार असेल त्यानें आगाऊ कळविल्यास त्याला तसें करण्याची परवानगी मिळेल. अशा स्वयंसेवकाला वसतिगृहांत राहण्याबद्दल फक्त रु. २ द्यावे लागतील."
वर्गासाठीच्या तपशीलवार सूचना
वर्गाला येणाऱ्या प्रत्येक स्वयंसेवकाने गणवेष आणि अन्य कोणत्या वस्तू, कपडे बरोबर आणावेत याच्याही स्पष्ट सूचना डॉक्टरांनी या पत्रकांमधून दिल्या आहेत. ''प्रत्येक शाखेजवळ स्वतःचा बँड असणे आवश्यक आहे," असे नमूद करून बिगुल, बासरी, ड्रम वगैरे शिकायचे असेल व त्या वस्तू नसतील तर त्या सामानाची आगाऊ किंमत पाठवल्यास त्या वस्तू मुंबईहून मागवून देऊ, अशीही सूचना या पत्रकात आहे. शिवाय बिगुल दोरीसहित रु. १९, साईड ड्रम स्टीक्स व बेल्टसहित रु. ३१ अशा सर्व वाद्यांच्या किंमती देखील पत्रकात देण्यात आल्या आहेत.
पुण्याच्या वर्गातील डॉक्टरांची चार भाषणे
पुण्यात पहिला 'अधिकारी शिक्षण वर्ग' १९३५ मध्ये झाला. पुण्यात १९४० सालच्या वर्गाला २३ एप्रिल रोजी प्रारंभ झाला. या वर्गात १२६ गावांतील १३२ शाखांमधून ८०२ स्वयंसेवक उपस्थित होते. या वर्गात उपस्थित राहण्यासाठी डॉक्टरांचे आगमन २९ एप्रिल रोजी पुण्यात झाले. पुणे स्थानकावर त्यांचे शेकडो स्वयंसेवकांनी स्वागत केले होते. पुढे डॉक्टर पंधरा दिवस या वर्गात वास्तव्यास होते. रोज दुपारी ते जिल्हावार बैठका घेऊन स्वयंसेवकांना मार्गदर्शन करत होते. संघाची भूमिका विषद करणारी चार भाषणे त्यांनी या वर्गात दिली. त्या भाषणांचे महत्त्व अनन्यसाधारण असेच आहे.
त्यातील एका भाषणात संघाला स्थापनेनंतरच्या पंधरा वर्षात इतरांच्या मानाने जे चांगले यश मिळाले, त्याचे मर्मही त्यांनी विषद केले होते ''आपणाला जे यश मिळाले ते आपणा स्वयंसेवकांच्या चिकाटीच्या प्रयत्नांमुळे मिळाले, वृत्तपत्रीय प्रसिद्धीने हे काम रेटले गेले नसते. कोणतेही तत्त्वज्ञान सिद्ध करावयाचे असेल व ते सत्य आहे असे पटवून द्यावयाचे असेल, तर त्याला शक्तीचे अधिष्ठान पाहिजे. बळ नसेल तर न्यायही दुबळा ठरतो, हे ध्यानात ठेवा," असा विचार त्या भाषणात डॉक्टरांनी मांडला होता.
नागपुरातील वर्गासाठी प्रवास
या वास्तव्यातही डॉक्टरांची तब्येत ठीक नव्हती. तब्येत चांगली नसतानाही या वास्तव्यात ते अखंड कार्यमग्नच होते. या वर्गातून डॉक्टरांनी नागपूरच्या वर्गासाठी प्रवास केला. १६ मे १९४० या दिवशी त्यांचे नागपुरात आगमन झाले. तेथे नील सिटी प्रशालेत 'आॉफिसर्स ट्रेनिंग कँप' १ मे पासून सुरू झाला होता. देशातील बहुतेक सर्व प्रांतांमधून मिळून १,३५० स्वयंसेवक या वर्गासाठी आलेले होते. या वर्गाचा प्रकट समारोप समारंभ ८ जून रोजी झाला. परंतु त्यांची तब्येत पाहून त्यांना तेथे नेण्यात आले नाही.
डॉक्टरांच्या तीव्र इच्छेमुळे या वर्गाच्या खासगी समारोपाला ९ जून रोजी त्यांना नेण्यात आले. देशाच्या विविध प्रांतांमध्ये संघाचे काम सुरू झाले होते. परंतु यावर्षी एवढे स्वयंसेवक पूर्वी कधीच आलेले नव्हते. सीमाप्रांत, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मद्रास, कर्नाटक, गुजरात आणि महाराष्ट्रातून या वर्गासाठी स्वयंसेवक आले होते.
हिंदुराष्ट्राचे छोटे स्वरूप
या कार्यक्रमातील त्यांचे भाषण कार्याची दिशा स्पष्ट करणारे आणि साऱ्या स्वयंसेवकांना कार्यासाठी प्रेरणा देणारे असे झाले. ''संघाच्या दृष्टीने हे वर्ष अत्यंत सद्भाग्याचे आहे. आज माझ्यासमोर हिंदुराष्ट्राचे छोटे स्वरूप मी पाहत आहे," अशी भावना यावेळी डॉक्टरांनी व्यक्त केली होती. ''प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे इतके दिवस नागपुरात राहूनही आपला परिचय करून घेण्याची माझी इच्छा सफल होऊ शकली नाही. आपली सेवा मुळीच करता आली नाही, म्हणून आज आपणा सर्वांच्या दर्शनाकरिता मी मुद्दाम आलो आहे..." डॉक्टर आणि स्वयंसेवकांमधील हृद्य नातेच त्यांच्या या शब्दांतून प्रकट झाले आहे.
''आज तुम्ही आपापल्या स्थानी परत जात आहात. मी तुम्हाला प्रेमाने निरोप देत आहे. जे कार्य करण्याचा कृतनिश्चय करून तुम्ही सारे येथे आला, त्या कार्याच्या पूर्तीस्तवच तुम्ही स्वस्थानी जात आहात. कोणत्याही मोहाने विचलित होऊ नका. 'मी पाच वर्षांपूर्वी संघाचा सदस्य होतो' असले वाक्य उच्चारण्याचा प्रसंग आयुष्यात केव्हाही येऊ देऊ नका. 'आज मजकडून किती काम झाले ?' याची रोज निजतेवेळी आठवण करा" अशा शब्दांतील डॉक्टरांचे हे मार्गदर्शन साऱ्यांसाठीच पाथेय ठरणारे आहे.
कार्याची दिशा स्पष्ट करताना डॉक्टर म्हणाले, ''आसेतुहिमाचाल पसरलेल्या हिंदू समाजाला आपल्याला संघटित करावयाचे आहे. महत्त्वाचे कार्यक्षेत्र संघाबाहेरच आहे. संघ केवळ स्वयंसेवकांपुरता नाही. संघाबाहेरील लोकांसाठीही संघ आहे. राष्ट्रोद्धाराचा खरा मार्ग या लोकांना दाखवून देणे हे आपले कर्तव्य आहे. हिंदू जातीचे अंतिम कल्याण या संघटनेनेच होणार आहे."
शताब्दीपर्यंत पोहोचलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संघसंस्थापक डॉ. हेडगेवार यांनी असे वैचारिक अधिष्ठान दिलेले होते, हे समजून घेतले की, संघ आपोआप समजतो.
- विश्व संवाद केंद्र - पुणे
Share With Friends
अभिप्राय
अभिप्राय लिहा