•  18 Apr 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

दुर्गातांडव सादरीकरण अन् मेघालय-आसाम प्रवास वृत्तांत

विश्व संवाद केंद्र - पुणे 8 days ago
पर्यटन   संस्कृती  

दुर्गातांडव सादरीकरण अन् मेघालय-आसाम प्रवास वृत्तांत

कला, भक्ती आणि निसर्ग यांचा त्रिवेणी संगम म्हणजे आमचा हा ईशान्य भारत प्रवास. 'फाउंडेशन ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंट'च्या माध्यमातून गुवाहाटीतील ब्रह्मपुत्रेच्या तीरावर साडेसातशे माता-भगिनींनी सादर केलेले भव्य 'दुर्गातांडव' हा केवळ एक कार्यक्रम नसून, ती त्या भूमीला अर्पण केलेली एक सकारात्मक ऊर्जा होती. या आध्यात्मिक अनुभवा सोबतीला मेघालयातील स्वच्छ नद्या, काझीरंगाचा निसर्ग आणि कामाख्या देवीच्या दर्शनाने समृद्ध झालेला हा १० दिवसांचा हृदयस्पर्शी प्रवास वृत्तांत...

- डॉ. शिल्पा शिवभक्त

गेल्या वर्षापासून 'Foundation of Holistic Development' या मातृशक्ती जागरणासाठी माधुरीताई सहस्रबुद्धे यांनी स्थापन केलेल्या संस्थेशी, नाशिकमधील मंगलाताई दात्ये यांच्या संपर्कातून तांडव सादरीकरणासाठी मी जोडले गेले. गेल्या वर्षी जानेवारी २०२५ मध्ये केरळमधील कोची येथील कृष्णमंदिरात मातृशक्तीने 'कृष्णतांडव' सादर केले होते. तेव्हापासून २०२६ मध्ये कोणते तांडव होणार, याची उत्सुकता होती. संस्कृतमधील दुर्गातांडव 'अयिगिरिनंदिनी...' शिकायला मिळणार आणि सादरही होणार, यामुळे विशेष आनंद झाला.

ऑनलाइन मीटच्या माध्यमातून सहभागी मातृशक्तीला तांडव शिकवून संस्थेतील ताईंनी छान सराव घेतला आणि ३१ जानेवारी २०२६ रोजी आसाममधील गुवाहाटी येथे ब्रह्मपुत्रा नदीच्या तीरावर मातृशक्तीकडून दुर्गातांडव सादरीकरण करण्याचे ठरले. यामधून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा त्या भूमीत समर्पित करावी, असे मातृशक्तीला सांगितले जाते.

तांडव सादरीकरण कार्यक्रम दोन दिवसांचाच असतो; मात्र नवीन भागात जायचे तर तो भागही पाहता येईल, म्हणून मेघालय-आसामचा शक्य तेवढा भाग पाहण्याचे ठरवले. यामध्ये शिलाँग, चेरापुंजी, काझीरंगा आणि गुवाहाटी परिसर पाहायचा होता. तांडव सादरीकरण गुवाहाटीत होते, त्यामुळे तीन दिवस आम्ही गुवाहाटीतच होतो. 'Travel Beat' च्या संचालिका आणि नाशिकच्याच स्थायिक सई वैद्य आमच्यासोबत होत्या. दात्येताई दिल्लीहून गुवाहाटीला येणार होत्या. गुवाहाटीपर्यंतच्या प्रवासात आम्ही एकूण १४ जण होतो. आम्ही १३ जणी आणि एक बंधू अशा चौदा जणांनी २५ जानेवारीला पहाटे मुंबईहून साडेपाचच्या फ्लाईटने गुवाहाटीकडे प्रस्थान केले. परतीच्या प्रवासासाठी २ फेब्रुवारीला गुवाहाटीहून सकाळी ९ ची फ्लाईट होती. त्या दिवशी रात्री ८ वाजता सर्वजण नाशिकला पोहोचलो.

हा ९-१० दिवसांचा प्रवास वृत्तांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक विकासजी फडके, ज्यांना आम्ही 'नाना' म्हणतो, त्यांच्या सूचनेमुळे लिहीत आहे. जाताना प्रवासात नोट्स लिहाव्यात म्हणून छोटी डायरीही घेतली होती; पण प्रवासात फार काही लिहिले गेले नाही.

रविवार, दिनांक २५ जानेवारी २०२६: पहाटे साडेपाचला निघून आम्ही साडेआठ वाजता गुवाहाटी विमानतळावर पोहोचलो. तिथे नाश्ता-चहापाणी करून शिलाँगच्या दिशेने निघालो. साधारण १०० किलोमीटरचा प्रवास होता. प्रवासात येणारी निसर्गरम्य ठिकाणे पाहत, थांबत थांबत प्रवास केला. प्रवासात सकाळी 'गणपती अथर्वशीर्ष' म्हणत असू आणि संध्याकाळी 'रामरक्षा' म्हणून मग 'दुर्गातांडव'चा दोन वेळा सराव करीत असू. प्रवासातच प्रजासत्ताक दिन, दासबोध जयंती आणि ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची जयंती होती. त्या त्या दिवशी वंदे मातरम्, समर्थ वंदन - समर्थांचे मनाचे श्लोक, उत्तमपुरुषनिरूपण समास वाचन आणि महाराजांची 'नमस्कार त्रयोदशी' यांचे पठण केले.

सोमवार, २६ जानेवारी २०२६: शिलाँगहून चेरापुंजीला निघताना सर्वांनी मिळून 'वंदे मातरम्' म्हणून भारतमातेला वंदन आणि जयजयकार केला. शिलाँगला 'एअर फोर्स म्युझियम' पाहिले, तिथे सर्वांनी छान फोटो काढले. वास्तविक चेरापुंजी म्हणजे अधिक पाऊस असलेले ठिकाण, मात्र त्यावेळी तिथे अजिबात पाऊस नव्हता; उन्हाळ्यासारखे ऊन होते. मेघालयात ठिकठिकाणी सुंदर धबधबे आहेत. मात्र आम्ही गेलो होतो तेव्हा पाऊस नसल्याने बहुतेक ठिकाणी फक्त धबधब्यांच्या जागा पाहून आलो. तिथला 'सेव्हन सिस्टर्स फॉल' विशेष प्रसिद्ध आहे; मात्र तिथे पोहोचेपर्यंत अंधार पडला होता. तिथे संध्याकाळी साडेपाचपर्यंतच खूप अंधार होतो. त्याअगोदर 'Mawsmai' नावाच्या गुहेत जाण्याचा आणि तिथून बाहेर पडण्याचा अनुभव छान होता. आमच्यासोबत बऱ्याच जणी साठ वर्षांच्या पुढच्या होत्या, मात्र त्यांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. अगदीच ज्यांना शक्य नव्हते अशा तिघी-चौघी गुहेत आल्या नाहीत; बाकी सर्वांनी तिथल्या चढ-उतार असलेल्या खडकाळ भागातून आणि काही ठिकाणी खूप कमी जागेतून बसूनच पलीकडे जावे लागत असतानाही गुहा पार केली.

मंगळवार, २७ जानेवारी: चेरापुंजीहून शिलाँगला जाताना उमंगॉट (दावकी) नदीत बोटिंगचा आनंद घेतला. इथे नदीचा तळ दिसतो इतके पाणी स्वच्छ आहे. प्रवासात भारत–बांगलादेश सीमा आहे, तिथे उतरून फोटो घेतले.

बुधवार, २८ जानेवारी: शिलाँग ते काझीरंगा असा २५० किमीचा प्रवास होता. काझीरंगाला पोहोचण्याअगोदर काही किमी अंतरावर नगाव येथे एका शिवमंदिरात गेलो होतो. मात्र संध्याकाळ झाल्याने मंदिर बंद झाले होते. तिथे १२६ फूट उंचीचे सुंदर शिवलिंग तयार केले आहे. तिथे सर्वांनी 'शिवतांडव स्तोत्रा'चे पठण केले. त्यानंतर काझीरंगाला पोहोचलो.

गुरुवार, २९ जानेवारी: काझीरंगा येथे सकाळी ६.३० वाजताच बाहेर पडलो. सकाळचे आल्हाददायक वातावरण आणि निसर्गरम्य परिसर पाहत आमची 'ओपन जीप सफारी' सुरू होती. काझीरंगा नॅशनल पार्कच्या 'बागोरी' परिसरात जीपमधून एकशिंगी गेंडा, हरीण, घुबड इत्यादी प्राणी पाहिले. त्यानंतर काझीरंगामध्येच 'National Orchid & Biodiversity Park' ला भेट दिली. तिथे बांबूचे वन, विविध प्रकारच्या वनौषधी आणि तिथल्या सांस्कृतिक कार्यक्रमांचा आनंद घेतला.

शुक्रवार, ३० जानेवारी: काझीरंगाहून सकाळी निघून दुपारी १२ वाजता गुवाहाटीत पोहोचलो. त्या दिवशी गिरीजानंद चौधरी विद्यापीठात दुर्गातांडवाचा सराव चार वेळा झाला. तिथे विद्यापीठातील इतिहास विषयाच्या प्राध्यापिका डॉ. सुदेष्णा यांनी गुवाहाटीविषयी माहिती देऊन मातृशक्तीचे विशेष अभिनंदन केले.

शनिवार, ३१ जानेवारी: पहाटे साडेपाच वाजता कामाख्या मंदिरात दर्शनासाठी पोहोचलो. रांगेत उभे राहून दर्शनासाठी ८-१० तासांहून अधिक वेळ लागणार होता आणि आम्हाला १२ वाजेपर्यंत परत हॉटेलवर तांडव समापन तयारीसाठी पोहोचणे आवश्यक होते. म्हणून तिथे मुखदर्शन घेतले. त्यानंतर दुपारी ब्रह्मपुत्रेच्या तीरावर, जिथे साडेसातशे भगिनींच्या उपस्थितीत अतिशय पवित्र वातावरणात 'दुर्गातांडव समापन' झाले. समापनानंतर तासभर क्रूझर बोटीतून ब्रह्मपुत्रा दर्शन घेतले.

रविवार, १ फेब्रुवारी: संस्थेतर्फे गुवाहाटी दर्शनासाठी बसेसची सोय केली होती; मात्र गर्दीमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी स्वतंत्र गाडी करून ब्रह्मपुत्रेतील बेटावर असलेले 'उमानंद मंदिर' पाहिले. तिथे शिवस्तुती पठण केले. हे बेट जगातील ०.००१६ चौकिमीचे सर्वात छोटे बेट मानले जाते. या बेटाला ब्रिटीश लोक बेटाच्या आकारामुळे 'मोर बेट' (Peacock Island) असेही म्हणत. हे बेट भस्माचल टेकडीवर आहे. ब्रह्मपुत्रेच्या मध्यभागी असलेल्या या बेटावर शिव उमेसोबत आनंदात राहतात, म्हणून याला 'उमानंद बेट' म्हणतात. त्याच दिवशी वसिष्ठ मुनींच्या आश्रमाला आणि अरुंधती मातेच्या निवासाच्या ठिकाणीही भेट दिली.

सोमवार, २ फेब्रुवारी: सकाळी ९ च्या फ्लाईटने निघून मुंबईला दुपारी दोन वाजता परतलो आणि नाशिकला रात्री ८ वाजता पोहोचलो. अशा प्रकारे हा भक्ती आणि निसर्गाने नटलेला प्रवास संपन्न झाला.

- डॉ. शिल्पा शिवभक्त 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • पूर्वांचल
  • प्रवास
Share With Friends

अभिप्राय

शिल्पाताई खूप छान लिहिलेस पुन्हा एकदा सर्व प्रसंग डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहिले .तुझं लिखाण खूप छान असतं याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.तुझीअभ्यासूवृत्ती, निरीक्षण क्षमता, लेखन कौशल्य खरच खूप छान आहे असं छान छान लिहीत जा.
मंगला दात्ये 11 Apr 2026 21:58

प्रिय सखी शिल्पा खूप सुंदर लेख लिहिला आहेस. या लेखामुळे परत एकदा छान सफर झाली. या दहा दिवसात आपण दोघी रुम पार्टनर होतो. तुझ्या सारखी छान सखी मला मिळाली. आपल्या दोघींचे आराध्यदैवत गोंदवलेकर महाराज यामुळे तर जरा जास्तच घट्ट मैत्री झाली. तुझा शांत स्वभाव, अध्यात्मिक अनुसंधान, घर सांभाळून तू संत वाड़मयात केलेली पी.एच.डी. राष्ट्र सेवा समितीत तू करत असलेलं योगदान खरच कौतुकास्पद आहे. तुझ्या पुढील उज्ज्वल आयुष्यासाठी आभाळभर शुभाशीर्वाद सखी.हे ऋणानुबंध असेच कायम सोबत असतील यात शंकाच नाही.धन्यवाद.
माधवी प्रियदर्शन गर्गे 11 Apr 2026 17:56


अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.