
पुणे: पाश्चात्त्य विचारांच्या प्रभावामुळे आपण आपल्या संस्कृतीची उपेक्षा करत आहोत आणि प्रत्येक गोष्ट पाश्चात्त्य दृष्टीने पाहण्याची सवय आपल्याला लागली आहे, असे महत्त्वपूर्ण मत बनारस हिंदू विश्व विद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. चंद्रकला पाडिया यांनी व्यक्त केले. सुनीला सोवनी लिखित 'हिंदुत्वाच्या प्रकाशात स्त्री चिंतन' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यानिमित्त आयोजित 'भारतीय परंपरेतील स्त्री चिंतन' या अभ्याससत्रात त्या बोलत होत्या.
'दृष्टी स्त्री अध्ययन प्रबोधन केंद्र', 'बाया कर्वे स्त्री अभ्यास व संशोधन केंद्र' आणि 'भारतीय विचार साधना पुणे प्रकाशन' यांच्या संयुक्त विद्यमाने हे सत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी डॉ. पाडिया यांनी पाश्चात्त्य तत्त्वज्ञ आणि प्राचीन भारतीय दार्शनिक यांच्या विचारांमधील फरक स्पष्ट केला. त्यांनी सांगितले की, “हिंदू धर्मात स्त्रीला जे मानाचे स्थान आहे, ते इतर कोणत्याही संस्कृतीमध्ये नाही. आदि शंकराचार्यांनी म्हटल्याप्रमाणे, 'शिव हा शक्तीशिवाय शव आहे', हेच याचे द्योतक आहे.”
दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ६ वाजता 'भाविसा' सभागृहात झालेल्या या प्रकाशन सोहळ्यास प्रमुख पाहुण्या म्हणून राज्यसभा खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या. या प्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या की, “संपूर्ण जगातील सर्वात प्राचीन तरीही नित्यनूतन असा हिंदू धर्म आहे. स्त्री-पुरुष समानतेचा विचार करताना पुरुषांशी स्पर्धा करण्याऐवजी प्रत्येकाने आपल्यामधील क्षमतेचा उच्चांक गाठावा.”

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात डॉ. चंद्रकला पाडिया यांनी, “विद्वान त्या व्यक्तीला म्हणतात, ज्याला आपल्या अज्ञानाचे ज्ञान असते,” असे सांगत अलीकडे सुरू झालेल्या भारतीय ज्ञान परंपरेच्या अभ्यासाचे कौतुक केले. या प्रसंगी लेखिका सुनीला सोवनी यांनी मनोगत व्यक्त केले, तर ‘भाविसा’चे अध्यक्ष डॉ. गिरीश आफळे यांनी प्रास्ताविक केले. समृद्धी पानसे यांनी सूत्रसंचालन केले. अनेक अभ्यासक आणि वाचक या सोहळ्याला उपस्थित होते.