
प्रवास भगीरथ प्रयत्नांचा...!
यंदाच्या विजयादशमीला 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघ' या संघटनेच्या स्थापनेला ९९ वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्त संघाच्या वाटचालीवर प्रकाश टाकणारा सुनील देशपांडे यांचा लेख -
विजयादशमी हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस. १९२५ च्या विजयादशमीच्या दिवशी डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. आज ही संघटना ९९ वर्षे पूर्ण करीत आहे. अशी संघटना, ज्या संघटनेला स्वतः ची ज्युबिली साजरी करण्यात काहीही रस नाही. ‘याची देही याची डोळा’ कार्य पूर्ण करण्यासाठी जी धडपडत आहे, अशा संघटनेचा हा जन्मदिवस आहे.त्यामुळे या एकमेवाद्वितीय संघटनेचा, कार्यपद्धतीचा प्रवास, विकासाचे टप्पे, समजून घ्यायला सर्वच भारतीयांना खूप उत्सुकता वाटत असेल. ही एकमेवाद्वितीय संघटना असल्याने तुलनात्मक अभ्यास करून हा प्रवास, हा विकास समजावून घेण्याचा सोपा मार्ग उपलब्ध नाही. त्यामुळे रा. स्व. संघाचा विकास समजून घ्यायचा असेल तर फक्त ही संघटनाच समजावून घ्यावी लागेल.
एका धगधगत्या क्रांतिकारकाने तो लखलखत्या विद्युलतेचा मार्ग सोडून, डोळे दिपवून टाकणारा मार्ग त्यागून, मिणमिणत्या शांत पणतीचा प्रकाश बनण्याचे ध्येय वयाच्या ३५ व्या वर्षी निवडले, ती व्यक्ती म्हणजे डॉ. हेडगेवार व तो मार्ग म्हणजे रा. स्व. संघ. या बदलाची व दीर्घदृष्टीची तुलना कदाचित योगी अरविंद यांच्या प्रवास वळणाशी होऊ शकेल.
असा हा स्थापन झालेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्याचा प्रवास व त्याच्या विकास प्रक्रियेतील परिवर्तने अचंबित करणारी आहेत. स्थापना झाली ती, हिंदू समाज संघटित करून देश स्वतंत्र करण्यासाठी! म्हणजे, देश स्वतंत्र करण्याची पूर्व अट होती ती हिंदू समाज संघटित करण्याची. त्यामुळे हिंदू ही अभिमानास्पद ओळख हिंदू समाजाला करून देणे व ही ओळख घेऊन देश स्वतंत्र करणे, कारण स्वतंत्र देश ताठ मानेने तेंव्हाच उभा राहू शकतो ज्या वेळी तेथील राष्ट्रीय समाज हा स्वयंप्रेरणेने कार्यरत असतो. या उद्देशाने कार्यपद्धती आखली गेली. रोज एक तास निःस्वार्थ बुद्धीने समाजाने समाजासाठी, देशासाठी काढायचा. म्हणून शाखा ही कार्यपद्धती आली. माझ्या देशाचे काम मी ‘प्रथम पुरुषी एकवचनी’ पद्धतीने करीन हे शिकण्याचे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ म्हणून शाखा सुरू झाली व अव्याहतपणे चालू आहे. अन्य विचार नाहीत, फक्त ‘एषा पंथा’. अर्जुनाला दिसणारा पोपटाचा डोळा. संघ म्हणजे शाखा व शाखा म्हणजे कार्यक्रम आणि उद्दिष्ट काय तर, लाखो संघटित, स्वयंप्रेरित तरूणांनी कोट्यवधींच्या समाजाला बरोबर घेऊन स्वतः च बलवान, स्वाभिमानी राष्ट्राची पुर्नउभारणी करावयाची. डॉ. हेडगेवार यांनी त्यासाठी आवश्यक अशा सर्व रचना स्वतः निर्माण केल्या. स्वाभिमान जागृती व आत्मपरीक्षण या दोन चाकांवर हिंदू समाजाच्या संघटनेची रचना लावली. या मुलभूत चिंतनाला व कार्यपद्धतीला कालबाह्यतेचा कोणताही दोष न लागण्यासाठी, ती कालोचित ठेवण्यासाठी, योग्य वेळी, योग्य विकासाचे पुढचे पाऊल टाकले गेले. संघटन व काळाची मागणी यातील शर्यत कालोचित ठेवण्यासाठी स्वयंसेवकांसमोर विकासाचे एक-एक पैलू उलगडत जाऊ लागले.
स्वयंसेवक घडवत असताना आता समाजात संपर्क करण्याची निकड स्वयंसेवकांना जाणवू लागली, खंडीत स्वातंत्र्याचा परिणाम विकृत वैचारिक स्खलनात होत होता. म्हणून, शाखेबरोबर समाज संपर्कासाठी गोरक्षा अभियान आले, फाळणीतील विस्थापितांचे पुनर्वसन आले. अर्वाचीन भारतातील सांस्कृतिक मानदंड असलेल्या स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त जनसंपर्क व त्यातून राष्ट्रीय एकात्मतेतील नाजूक कडी असलेल्या पूर्वांचलात सेवेच्या माध्यमातून संपर्क सुरू झाला. स्वातंत्र्योत्तर भारताच्या अपेक्षा व गरजा लक्षात घेऊन रा. स्व. संघ शाखेसह, समाज संपर्कासाठी स्वतः मध्ये अत्यंतिक यशस्वी परिवर्तन करत होता. हा किंचित वळणाचा कालावधी सामान्यपणे सन १९४६-४७ पासून सुरू झाला. परंतु या सर्व परिवर्तनाचे वा वळणाचे वा बदलाचे स्वरूप बाह्य दडपण न रहाता, संघाच्या सुयोग्य वाढीनंतर स्वयंप्रेरणेने घेतलेले निर्णय असेच राहिले. हा बदल शक्ती संचयामुळे स्वयंसेवकांना तसा स्वाभाविक वाटला. पण या नंतरचा स्वाभाविक वळसा हा सोपा नव्हता. संपर्क हे शक्तीला आवाहन होते, म्हणून ते सहज स्वाभाविक होते. पण या पुढील वळण हे आत्मपरीक्षणाचे होते. त्या वेळचे नूतन सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांनी पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत ‘सामाजिक समता व हिंदू संघटन’ या विषयावर व्याख्यान दिले. आता संचित शक्तीला आत्मपरीक्षण करावयाचे होते. आतापर्यंत पूर्वजांच्या महानतेचा वारसा मिरवायचा होता पण आता, चुका स्विकारायच्या होत्या. “If untouchability is not wrong, nothing under sun is wrong. If it's going, let it go, log stock & barrel.” ‘का पुरुषा पिबन्ति.’ बापजाद्यांची विहीर म्हणून खारट पाणी पिणे हे का पुरूषाचे लक्षण आहे. या भूमिकांमधून संघाचा सामाजिक आशय व परिवर्तन प्रक्रियेची कार्यपद्धती बनू लागली. हिंदू समाज संघटित करणे म्हणजे समतायुक्त व स्वाभिमानी हिंदू संघटित करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू झाले. या प्रक्रियेत कुणाला दोष देण्याएवढे सोपे नव्हते तर, आरशासमोर उभे रहायचे होते. पण स्वयंसेवकांनी हे आव्हानही स्वीकारले व 'नम्रपणाने विद्रोहाला शमवू या' ही प्रक्रिया सुरू झाली. व संघ स्वयंसेवकांचा स्वाभाविक सेवाभाव हा हिमालयाएवढे सेवा प्रकल्प उभे करू लागला. ज्या जगाने फक्त दंडातील स्वयंसेवक छायाचित्रात पाहिलेले होते, ते आता चिखल-राड्यात जनसेवा करताना दिसू लागले. Militant Hindu बरोबरीने Selfless, Dedicated Social Organisation हे पण चित्र दिसू लागले. नेतृत्व, स्वयंसेवकांची मानसिकता व ध्येयवाद हे एकरूप झाले की अशी अवघड घाटदार वळणेही सहजपणे स्वीकारली जातात.
असेच एक वळण संघ समाजरूप होण्यासाठी घेणे बाकी होते व ते सामान्यपणे १९७५ पासून सुरू झाले. सामाजिक, सांस्कृतिक संघर्ष तसेच नागरीक शास्त्रीय जबाबदाऱ्यांचे नेतृत्व करण्यासाठी संघ तयार झाला होता. यातील ब्रीद व वेगळेपण होते ते म्हणजे, समाजासह समाजामध्ये जागृती, संघर्ष, व तरीही नैतिक मर्यांदांसह सहभाग. यातील पहिली नागरीक शास्त्रीय जबाबदारी आली ती आणिबाणी विरोधात जनमत जागृती व संघर्ष घडवण्याची. सामान्य माणसाला क्रियाशील बनवण्याच्या तपश्चर्येची कसोटी लागली व संघाचे स्वयंसेवक १00% खरे ठरले. सामान्य माणूस प्रथमच स्वतंत्र भारतात भाकरी शिवायच्या आंदोलनात लाखांनी सहभागी झाला. आंदोलन जिंकले. पण ह्यात अंतर्विरोध नव्हता. संघर्ष स्पष्टपणे कळणाऱ्या वाईटाविरूद्धचा होता. पण १९८0 सालानंतर विषय आला तो अयोध्येचा. यात सरकार, एक समाज, वैचारिक विश्वावर अधिराज्य करणारे पंचमस्तंभी, हे विरोधात तर चौकटीबाहेरील विषयामुळे सामान्य चळवळे लांब रहात होते. अशा वेळी सांस्कृतिक पुनर्जागरणासाठी संघाने सामान्य हिंदूला साद घातली व अहो आश्चर्यम, ‘घेता किती घेशील दो कराने’ अशी स्वयंसेवकांची अवस्था समाजाने करून ठेवली व संघाचा वैचारिक ठेवा, सांस्कृतिक राष्ट्रवाद हा भारतीय सर्वस्पर्शी जीवनप्रवाहाच्या केंद्रस्थानी आला. याचा स्वाभाविक परिणाम म्हणजे राजकारणापासून प्रत्येक क्षेत्र हे संघ विचाराचे कर्ते हात बनले. हे परिवर्तन स्वीकारून आज सामान्य स्वयंसेवक, हिंदू सद्भाभावापासून पर्यावरणापर्यंत समाजाच्या सर्व गरजांमध्ये सहभाग देण्यासाठी सिद्ध झाला आहे!
- सुनील देशपांडे, पुणे