•  25 Jan 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

नामदेवराव घाडगे ः श्रमिक, दलितोद्धारासाठी समर्पित जीवन

विश्व संवाद केंद्र - पुणे 3 days ago
भाष्य  

नामदेवराव घाडगे : श्रमिक, दलितोद्धारासाठी समर्पित जीवन 

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मचक्र परिवर्तनाच्या कालखंडात नामदेवरावांच्या कुटुंबातील सर्व मंडळींनी बौद्ध धम्म स्वीकारला, पण त्याच वेळी नामदेवराव घाडगे मात्र प्रबळ हिंदू संघटनेच्या कार्यासाठी, हिंदू समाजात शिरलेले दोष काढून टाकण्यासाठी घरादाराचा त्याग करून ‘संघम् शरणम गच्छामि’ म्हणत संघाचे प्रचारक म्हणून बाहेर पडले.

नामदेवरावांचा निर्णय कठोर होता, पण अचूक होता. पू. श्रीगुरुजींच्या दैवी स्पर्शाने त्यांच्या हृदयाची तार छेडली आणि ते शेवटपर्यंत प्रचारक राहिले. १९२४ साली मुंबईतच त्यांचा जन्म झाला. वरळी ही नामदेवरावांची कर्मभूमी. दलित चळवळीचे उगमस्थान. दलितांवर होणारा अन्याय-अत्याचार त्यांनी जवळून पाहिला होता. अनेक वेळा मानसिक संघर्षालाही तोंड द्यावे लागले, पण ते आपल्या ध्येयापासून कधीच डगमगले नाहीत. वरळीत संघ रुजवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी त्यांनी कठोर मेहनत घेतली.

नामदेवरावांच्या व्यक्तिगत व्यवहाराने त्यांच्या वाट्याला अपार प्रेम आणि जिव्हाळा आला आणि त्याच शिदोरीवर ते अखेरपर्यंत समाधानाने जगले. त्यांचे संबंध घरापर्यंत, घरातील अबालवृद्धांशी असायचे. एकदा का घरात प्रवेश केला की आपल्या स्वभावाने ते घर आपलेसे करून टाकत. जिथे समाज अस्पृश्यांच्या स्पर्शाला आणि सावलीलाही घाबरत असे, तिथे देवघरातच नव्हे, तर चुलीवरदेखील ताबा मिळवण्याची किमया नामदेवरावांनी संपादन केली होती. नामदेवराव घरी येणे म्हणजे कुणाला मित्र, वडीलधारा भाऊ आल्याचा आनंद होई. कोणाची नोकरी, कोणाचे व्यसन तर कोणाचा विक्षिप्तपणा हाताळून नामदेवराव त्यांना संघाकार्याशी जोडत. प्रसंगी कोणावर रागावले, तरी त्यांनी कोणाचा कधीच द्वेष केला नाही.

१९६२ साली त्यांच्यावर भारतीय मजदूर संघाची जबाबदारी देण्यात आली. मुंबईत कापड उद्योगाच्या संघटनांमध्ये त्यांनी कामाला सुरुवात केली. काही काळ सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे या क्षेत्रांत ते भारतीय मजदूर संघाचे कार्यकर्ते होते. आणीबाणीनंतर ‘एक उद्योग - एक युनियन’ हा विचार कामगार संघटनांच्या क्षेत्रात सुरू झाला. त्या वेळी गिरणी कामगार सभा या टेक्सटाईल विषयामध्ये जी मोठी युनियन स्थापन झाली, त्यात नामदेवराव घाडगेदेखील होते. दत्तोपंत ठेंगडी हे त्यांचे मार्गदर्शक होते. १९६२ ते १९८२ हा कालखंड त्यांनी श्रमिक क्षेत्रामध्ये व्यतीत केला. संघातील एक प्रचारक सहजपणे श्रमिक क्षेत्रात जातो आणि त्या क्षेत्रासाठी मोठे काम करतो, हे नामदेवरावांनी आपल्या व्यवहारातून दाखवून दिले.

१९८३-८४ मध्ये विश्व हिंदू परिषदेच्या वतीने भारतमाता-गंगामाता यात्रेची मुंबई महानगराची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली. ही यात्राही त्यांनी यशस्वी करून दाखवली. १९८४ पासून सामाजिक समरसता मंचाचे काम आले. समरसता मंचाची भूमिका सुस्पष्टपणे ते सर्वांसमोर मांडत. अधूनमधून नांदोशीला ते घरी जात असले, तरी प्रचारक म्हणूनच त्यांचा व्यवहार सुरू होता. गावी राहणे गरजेचे झाल्यामुळे ‘दलित मागासवर्गीय विकास परिषद, नांदोशी’ या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. बुद्ध मंदिर बांधले, पाणीपुरवठा, वृक्षारोपण या कामांना सुरुवात केली. दलित वस्तीबरोबरच आपले संपूर्ण गाव आदर्श व्हावे म्हणून शिक्षण, वृक्षारोपण, रोजगार या आधाराने गावाचा सर्वांगीण विकास केला.

खेड्यापाड्यात निरलसपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना त्यांच्याच गावात आर्थिक पाठबळाबरोबर नैतिक पाठबळ देण्यावर त्यांचा भर होता. दलित, सामाजिक समरसता अशा शब्दांचा वापर जपूनच करावा, अन्यथा ते शब्द गुळगुळीत होतील, त्यांचा भावात्मक परिणाम कमी होईल आणि वेगळेपणा मात्र कायम राहील याचे नामदेवरावांना भय होते. याविषयीचे आपले मत ते निःसंकोचपणे व्यक्त करीत. दलित समस्येचा इतका मूलगामी विचार करणारा कार्यकर्ता दुर्मीळच.

नामदेवराव घाडगे यांनी आपल्या जीवनाची समिधा डॉ. हेडगेवार आणि श्रीगुरुजी यांनी हाती घेतलेल्या राष्ट्र उभारणीच्या यज्ञात जाणीवपूर्वक समर्पित केली. घरात आणि बाहेर वेळोवेळी घडणाऱ्या घटनांना समर्थपणे तोंड देत हिंदुत्वाची, सामाजिक समरसतेची, राष्ट्रवादाची पताका सदैव डौलाने मिरवत आपल्या गंभीर आवाजाने, विलक्षण ध्येयवादाने व सभोवतालच्या सर्व सहकाऱ्यांना सोबत घेऊन नामदेवराव वाटचाल करीत राहिले. संघाचा एक आदर्श स्वयंसेवक म्हणून त्यांनी जीवनाची वाटचाल यशस्वी केली.

संघ ही विचारधारा आहेच, तशीच ती एक जीवनपद्धतीही आहे, असे त्यांचे मत होते. प्रचारक प्रथम संघटक असतो, याची त्यांना जाणीव असल्याने संघटनेला तडा जाईल असे त्यांच्या हातून कधीच घडले नाही. उपेक्षितांना बळ देण्यासाठी, धीर देण्यासाठी ते शेवटपर्यंत सक्रिय राहिले. भेटीगाठी हा त्यांचा धर्म आणि प्रेम ही पुंजी होती, याच मूल्यांवर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत केले.

आपल्या ५० वर्षांच्या सार्वजनिक आयुष्यात कशाचीही, कोणाचीही पर्वा न करता नामदेवरावांनी आपले आयुष्य संघकार्यासाठी वाहिले आणि आपल्या प्रेमळ स्वभावाने प्रत्येक घर आपलेसे केले, यासाठी त्यांच्या पंच्याहत्तरीनिमित्त १६ जानेवारी १९९९ रोजी त्यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला ते मनापासून तयार नव्हतेच, मात्र मुकुंदराव पणशीकर आणि त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या स्वयंसेवकांच्या आग्रहाखातर आणि प्रेमाखातर त्यांनी हा सत्कार स्वीकारला. पण सत्काराच्या आधी ‘मी आणखी जगावे आणि थोडेफार काम करावे, अशी तुमची इच्छा असेल तर माझा सत्कार करू नका.’ अशी सूचना त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना आधीच दिली होती, जणू काही आपले मरण त्यांना कळले होते. आणि झालेही तसेच. १६ जानेवारीला त्यांचा सत्कार झाला आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ज्यांचे पाय डगमगले नाहीत, असे नामदेवराव २३ जानेवारी १९९९ ला अंधारात पाय घसरून पडले आणि मृत्यूने त्यांना आपल्या कवेत घेतले. एका देवदुर्लभ कार्यकर्त्याच्या राष्ट्र उभारणीच्या यज्ञातील समिधा शांत झाल्या.

- शीतल खोत

(साभार - साप्ताहिक विवेक) 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • नामदेवराव घा़डगे
  • संघ प्रचारक
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (36), संस्कृती (34), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.