राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे 'मी' कडून 'आम्ही' कडे नेणारा प्रवास: प्रमोद बापट

सातारा: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व्यक्तीला स्वतःच्या वैयक्तिक ओळखीपलीकडे जाऊन समाजाशी जोडणारी एक कार्यपद्धती आहे. संघात आल्यावर स्वयंसेवकाचा स्वतःच्या अस्तित्वाकडून (मी) व्यापक समाजहिताकडे (आम्ही) होणारा प्रवास सुरू होतो, असे प्रतिपादन संघाचे क्षेत्र प्रचार प्रमुख प्रमोद बापट यांनी केले.
संघाच्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने साताऱ्यात आयोजित 'शताब्दी मंथन' या वैचारिक कार्यक्रमात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कोल्हापूर विभाग प्रचार प्रमुख विवेक मंद्रूपकर उपस्थित होते. विभाग प्रचार प्रमुख विवेक मंदृपकर उपस्थित होते.
यावेळी बापट यांनी भारताच्या प्राचीन वैभवाचा आणि मध्ययुगीन काळात झालेल्या आक्रमणांचा आढावा घेतला. ते म्हणाले, भारत एकेकाळी सर्वच क्षेत्रात समृद्ध होता. गेल्या दोन हजार वर्षांतील आक्रमणांमुळे इथली समाजव्यवस्था विस्कळीत झाली. प्राचीन काळी अशा आघातांतून सावरण्याची आणि समाजाच्या जखमा शिवण्याची एक आंतरिक व्यवस्था होती. इस्लामी आणि इंग्रजी राजवटीत समाजाचे स्वत्व आणि आत्मविश्वास हरवल्याने समाज न्यूनगंडाच्या गर्तेत गेल्याचेही त्यांनी सांगितले.
१९२५ मध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना का केली, यावर भाष्य करताना बापट म्हणाले की, देशाला निस्वार्थी, सज्जन आणि सक्षम व्यक्तींची गरज आहे हे ओळखून डॉक्टरांनी 'संघ शाखा' ही अनोखी कार्यपद्धती सुरू केली. आज याच प्रेरणेतून ३४ विविध संघटना आणि जगातील ३२ देशांमध्ये संघाचे कार्य विस्तारले असून, संघ आता एक विशाल वटवृक्ष बनला आहे.
विवेक मंदृपकर यांनी 'पंच परिवर्तन' संकल्पनेची सविस्तर माहिती दिली. आगामी काळातकुटुंब प्रबोधन, स्व-बोध (स्वदेशी),सामाजिक समरसता,पर्यावरण संरक्षण,नागरी शिष्टाचारया पाच विषयांवर समाजात प्रत्यक्ष कृती होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक सातारा जिल्हा सहकार्यवाह संदीप आठल्ये यांनी केले. सूत्रसंचालन ॲड. अविनाश सुतार यांनी केले. संघाचे प्रचार विभागाचे प्रांत मंडळ सदस्य रमेश मंत्री, कोल्हापूर विभागाचे संपर्क प्रमुख डॉ. समीर सोहनी, कार्यवाह महेश शिवदे आदि यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता सामूहिक पसायदानाने झाली.