डॉ.बाबासाहेब आंबेडकर - भारताला मानणारे राष्ट्रपुरुष
डॉ.बाबासाहेब आंबेडकर - भारताला मानणारे राष्ट्रपुरुष
भारतात सामाजिक स्वातंत्र्य निर्माण करण्यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेबांनी या देशाला आधुनिक कालखंडामध्ये पुढे घेऊन जाण्याचे मोठे कार्य त्यांच्या विचार व कृतीतून केले आहे. या देशातील अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या एका मोठ्या समाज घटकाला स्वाभिमानाने उभा करून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणण्याचे महत्कार्य बाबासाहेबांनी केले आहे. एका विशिष्ट दृष्टीकोनातून बाबासाहेबांकडे पाहण्याची सवय समाजाला लागल्यामुळे दुर्दैवाने बाबासाहेबांच्या विचार व कार्याची उंची अनेकजण मान्य करत नाहीत, परंतु बाबासाहेब हे राष्ट्रपुरुष आहेत.
बाबासाहेब प्रेरणास्त्रोत
बाबासाहेब ज्या समाजात जन्मले - वाढले व उपेक्षित असण्याच्या वेदना सहन केल्या, त्या समाजाला जर सन्मान मिळवून द्यायचा असेल व या समाजाचं स्वत्व जागृत करायचं असेल तर त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे हे बाबासाहेबांनी जाणलं होतं. त्यामुळेच बाबासाहेबांनी स्वतः अत्यंत परिश्रम घेऊन उच्च शिक्षण पूर्ण केलं. ते एम.ए., पीएच.डी., एम.एस्सी.,बॅरिस्टर ऑफ लॉ., अशा अनेक पदव्या त्यांनी मिळवल्या होत्या. समाजशास्त्र, इतिहास, कायदा, अर्थशास्त्र अशा विषयांमध्ये त्यांनी अभ्यास केला होता. त्यामुळेच आपल्या समाजाला शिक्षण घ्या असं सांगण्याचा त्यांना अधिकार प्राप्त झाला होता. बाबासाहेबांकडे पाहूनच अनेक जण शिक्षणासाठी तयार झाले. जी गोष्ट शिक्षणाची तीच गोष्ट संघर्षाची. बाबासाहेबांनी भेदाभेद, अस्पृश्यता, जातीयता याविरुद्ध जो संघर्ष केला, त्या संघर्षामधूनच प्रेरणा घेऊन याविरुद्ध लढण्यासाठी अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या समाजातील शेवटचा घटकही उभा राहिला, म्हणजेच बाबासाहेब एक प्रेरणास्त्रोत होते.
देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच सामाजिक स्वातंत्र्य महत्वाचे
बाबासाहेबांनी कोणत्याही स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतला नाही, त्यामुळे ते कधीही तुरुंगात गेले नाहीत. सन १९४२ चे आंदोलन चालू असताना ते व्हाईसरॉयच्या कौन्सिलमध्ये गेले आणि मजूर मंत्री झाले, चले जाव चळवळीस त्यांनी विरोध केला आणि अस्पृश्य बांधवांनी त्यापासून दूर राहावे असा त्यांनी सल्ला दिला असे बाबासाहेबांवर आरोप केले जातात. साहजिकच या सर्व गोष्टी सत्य आहेत. बाबासाहेब त्या काळात असे का वागले? याचा मात्र आरोप करणारे विचार करत नाहीत. भारतामध्ये इंग्रजांच्या गुलामगिरीविरुद्ध आंदोलन सुरू होते परंतु असे आंदोलन करणारे सवर्ण म्हणविणारे लोक मात्र एका मोठ्या समाज घटकाला आपल्या गुलामीत ठेवून होते. याचाच अर्थ स्वतःवरची गुलामगिरी संपविण्यासाठी प्रयत्न करणारे लोक स्वतः मात्र इतरांवर गुलामगिरी लादत होते अशी परिस्थिती असल्यामुळेच बाबासाहेबांनी देशाच्या स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याला अधिक महत्त्व दिले. बाबासाहेबांनी समाजातील तळागाळातील पिचलेल्या समाज घटकाला जागे करण्याचे व स्वतःच्या हक्कासाठी सक्षम करण्याचे कार्य केले. अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या समाज बांधवांना ताठ मानेने जगण्यासाठी प्रेरणादिली, त्यामुळेच देशाच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात बाबासाहेबांनी जरी भाग घेतला नसला तरी याच भारत भूमितील एका मोठ्या समाज घटकाला एका वेगळ्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी त्यांनी दिलेला मानवतेचा लढा महत्त्वाचा होता.
खऱ्या अर्थाने अहिंसक असणारे बाबासाहेब
बाबासाहेबांनी सामाजिक स्वातंत्र्य लढा मोठ्या निर्धाराने लढला. सवर्ण समजल्या जाणाऱ्या समाजाने अडचणी निर्माण केल्या, अडथळे आणले, प्रसंगी संघर्षही निर्माण झाला. परंतु बाबासाहेबांनी कधीही रक्तरंजित संघर्ष होऊ दिला नाही. कारण बाबासाहेब ज्या विचार व परंपरेला मानत होते, त्या भगवान गौतम बुद्धांचा आदर्श त्यांच्यासमोर होता. त्यामुळेच बाबासाहेबांनी या देशात घडवून आणलेली ही अहिंसक सामाजिक क्रांती होती. स्वातंत्र्य, समता व बंधुता या गोष्टी निर्माण करण्यासाठी जगभरामध्ये अनेक लढे उभारले गेले व यातील बहुतांश लढे हे रक्तरंजित ठरले. फ्रान्समध्ये राज्यक्रांती झाली, या राज्यक्रांतीमध्ये ४० हजार लोक मारले गेले. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता मिळवण्यासाठी एवढी प्रचंड किंमत त्यांना द्यावी लागली. अमेरिकेमध्ये अशीच गुलामगिरी संपवण्यासाठी दक्षिण विरुद्ध उत्तर असे गृहयुद्ध झाले. या युद्धामध्ये सहा लाख वीस हजार अमेरिकन सैनिक मारले गेले तर तेवढेच जखमी झाले असावेत. गुलामाला सामाजिक स्वातंत्र्य देण्यासाठी अमेरिकन समाजाला अशी अफाट किंमत मोजावी लागली. रशियात देखील साम्यवादी क्रांती झाली. ही क्रांती गरिबांना स्वातंत्र्य, न्याय आणि आर्थिक समता मिळवून देण्यासाठी झाली. लेनिनच्या काळात जवळपास ६० लाख नागरीक ठार झाले तर स्टॅलिनच्या काळात जवळजवळ तीन ते साडेतीन कोटी नागरीक ठार झाले. रशियात समतेचे राज्य आणण्यासाठी आणि शेतमजूर, शेतीवर गुलाम म्हणून राबणाऱ्यांना मुक्त करण्यासाठी एवढ्या प्रचंड संख्येने लोकांना आपले प्राण गमवावे लागले. परंतु भारतामधील अशा प्रकारची अस्पृश्यता - जातीयता नष्ट करण्यासाठी बाबासाहेबांनी जी क्रांती घडवून आणली, ती पूर्णता अहिंसक अशीच होती. अनेक प्रसंगांमध्ये सवर्ण समजल्या जाणाऱ्या समाजाने हल्ले करून देखील अस्पृश्य गणल्या जाणाऱ्या व बाबासाहेबांनी नेतृत्व केलेल्या समाज घटकांनी कधीही हिंसेचा वापर केला नाही म्हणूनच अशा प्रकारची भारतात सामाजिक क्रांती अहिंसेच्या मार्गाने घडवून आणणारे बाबासाहेब हे थोर महापुरुष आहेत.
धम्म मानणारे विवेकशील बाबासाहेब
बाबासाहेब हे धर्म मानत नव्हते, धर्माला अफुची गोळी समजायचे असे अलीकडच्या काळात रुजविले जाते. परंतु बाबासाहेब हे धर्म मानत होते, कदाचित त्यांची धर्माची कल्पना वेगळी असली पाहिजे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्या देशात बहुसंख्यांकाने हिंदू धर्मीय राहतात हे बाबासाहेब जाणून होते, आपण ज्या समाजाचे नेतृत्व करतो तो समाजही याच धर्माचा घटक आहे. परंतु त्याच धर्मातील आपल्याच लोकांनी या घटकाला अस्पृश्य म्हणून दूर ठेवले आहे ही वास्तविकता लक्षात घेऊन बाबासाहेबांनी अनेक - अनेक वेळा धर्मातील कर्मठांना साद घातली व माणूस म्हणून सर्वांना समान वागणूक देण्याचे आवाहन केले, प्रसंगी संघर्षही केला. परंतु पुन्हा - पुन्हा यामध्ये अपयश येत असल्याचे व कर्मटांकडून कोणताही प्रतिसाद लाभत नसल्याचे लक्षात घेऊन सन १९३५ मध्ये बाबासाहेबांनी मी हिंदू धर्मात जरी जन्मलो असलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही अशी प्रतिज्ञा करून एक प्रकारे धर्म बदलणार असल्याचे जाहिर केले. सन १९३५ मध्ये त्यांनी हे सुतोवाच केले व प्रत्यक्षात सन १९५६ मध्ये धर्म परिवर्तन केले, तेवढ्या मोठ्या कालखंडात देखील बाबासाहेब व त्यांच्या बरोबरच्या समाजाला दुर्दैवाने आपण सन्मानाने सामावून घेऊ शकलो नाही. बाबासाहेब जर धर्मच मानत नसते तर त्यांनी धर्मामध्ये सन्मानाची वागणूक मिळवण्यासाठीचा हा संघर्ष केला नसता. हिंदू धर्मामध्ये सन्मान मिळत नाही म्हणून बाबासाहेबांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला, याचाच अर्थ कोणत्यातरी धम्माचाच त्यांनी आधार घेतला. धर्माची माणसाला भाकरी इतकी आवश्यकता आहे, कारण धर्म माणसाला आशावादी बनवतो. असे दीक्षाभूमीच्या भाषणात बाबासाहेब म्हणाले. याचाच अर्थ बाबासाहेब धर्म मानत नव्हते असे नाही तर त्यांची धर्माकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती. बाबासाहेबांनी आपल्या भारतभूमीतील धर्म व संस्कृतीचा अत्यंत चिकित्सतेने अभ्यास केलेला होता, त्यामुळेच त्यांनी धर्म परिवर्तन करण्याचा निर्णय घेतल्यानंतर देखील या भारतातील सांस्कृतिक ऐक्य कायम टिकविण्यासाठी याच भूमीतील - याच संस्कारातील परंतु एका वेगळ्या उपासना पद्धतीचा अवलंब करणाऱ्या बौद्ध धम्माचा स्वीकार केला हे देखील बाबासाहेबांचे आपल्या देशावरील उपकारच आहेत. बौद्ध धम्म हा याच संस्कृतीचा एक घटक असल्याचे बाबासाहेबांनी अनेकदा मान्य केले आहे. हिंदू कोड बिलाच्या अनुषंगाने घटना समितीमध्ये मत मांडतानाही त्यांनी हीच भावना अधोरेखित केली आहे. याचाच अर्थ बाबासाहेबांना हिंदू धर्म संस्कृती व भारतातील परंपरा यांचा निश्चितच आदर होता.
राष्ट्रपुरुष बाबासाहेब
बाबासाहेबांनी भारतातील एका मोठ्या समाज घटकाला एक प्रकारे पुनर्जन्म देऊन राष्ट्रीय प्रवाहात आणले याचा परिणाम म्हणून भारताची सांस्कृतिक ऐक्यता निर्माण झाली. या अर्थाने बाबासाहेब राष्ट्रपुरुष ठरतात. घटना समितीतील त्यांनी केलेले काम, मसुदा समितीचे अध्यक्ष या नात्याने त्यांनी घेतलेले कष्ट, फाळणीच्या प्रसंगी त्यांनी व्यक्त केलेली मते आणि भारताच्या जडणघडणीमध्ये बाबासाहेबांचे योगदान लक्षात घेता ते खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष आहेत हे लक्षात येते. घटना समिती अथवा मसुदा समितीमध्ये काम करताना त्यांनी केवळ अनुसूचित जातीतील समाज घटकांना न्याय देण्यासाठी संविधान निर्माण केले नाही. संविधानाची निर्मिती करत असताना अठरा - अठरा तास जी प्रचंड मेहनत त्यांनी घेतली ती या देशातील संस्कृती व परंपरा यांचा अंगीकार करणाऱ्या संपूर्ण देशवासीयांच्या मनाचा विचार करून संविधान कसे निर्माण करता येईल यासाठी घेतली. बाबासाहेबांनी शिक्षणाचे महत्त्व समाजाला करून दिले व या समाजाच्या उन्नतीसाठी आयुष्यभर कष्ट घेतले. हे करत असताना या समाजाच्या मनात या भारत भूमीबद्दलचा - देशभक्तीचा भाव निर्माण केला याचाच अर्थ बाबासाहेबांनी येथील चुकीच्या रूढी - परंपरा विरुद्ध बंडखोरी केली, परंतु देशातील संस्कृती, परंपरा, येथील नागरीक व देश यांच्याविरुद्ध कधीही बंडखोरी केली नाही म्हणूनच बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने राष्ट्रपुरुष आहेत, अशा बाबासाहेबांच्या विचारांचे पाईक बनून आधुनिक भारत घडविण्यासाठी येथील धर्म, संस्कृती, परंपरा, उपासना पद्धती व येथील समाज या सर्वांचा आदर करून पुढे चालत राहिले पाहिजे. हीच बाबासाहेबांना खऱ्या अर्थाने आदरांजली ठरेल.
डॉ सचिन वसंतराव लादे, पंढरपूर