•  20 Nov 2025
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

पुस्तक परिचय-शाश्वत कृषी संजीवनी - अनुवाद अनिल व्यास

विश्व संवाद केंद्र - पुणे 4 days ago
पुस्तक परिचय  

 

                                              शाश्वत कृषी संजीवनी - पुस्तक प्रकाशन - अनुवाद अनिल व्यास 

इंग्रजांनी आपल्या देशाची कधीही भरून न काढता येणारी लूट केली, या बद्दल कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही. परंतु त्यांनी केलेल्या काही सुधारणा त्यांच्या सोयीसाठी केल्या असल्या तरी आपल्या फायद्याच्या होत्या व त्यातील काही आपल्या जीवनपद्धतीची शाश्वतता सिद्ध करणार्‍याही होत्या. सर अलबर्ट हॉवर्ड या वनस्पती तज्ञाला भारतात नेमणे ही त्यापैकी एक गोष्ट होती.    

सर अलबर्ट हॉवर्ड भारतात 1899 ला आले व चाळीस वर्षे राहून जगातल्या सर्व देशातील शेती पद्धतींचा अभ्यास केला. त्याचप्रमाणे स्वतःच्या स्वतंत्र विचाराच्या आधाराने शेतीवर संशोधन करून एक जैविक खत निर्मीती पद्धत शोधून काढली. त्या पद्धतीलाच इंदूर पद्धत म्हटले जाते. ऍन ऍग्रिकल्चरल टेस्टामेंट हे त्या चाळीस वर्षांच्या संशोधनाचे फलित आहे. त्यातील विषय आज जास्त प्रकर्षाने सर्वांसमोर आणण्याची गरज वाटली. म्हणून त्या पुस्तकाच्या भाषांतराचा प्रपंच.

ऍन ऍग्रिकल्चरल टेस्टामेंट या नावातच एक नकारात्मका आहे. टेस्टामेंट म्हणजे मृत्युपत्र. खर तर या पुस्तकातील विषय हे शेतीला संजीवनी देणारे आहेत व ती संजीवनी शाश्वत आहे, म्हणून या मराठी अनुवादाचे नाव शाश्वत कृषी संजीवनी ठेवावे असे संबंधितांशी चर्चा करून नक्की केले. त्या पुस्तकाचा परिचय.

विषयाचे महत्व लक्षात घेवून या पुस्तकाची प्रस्तावना आणंद विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मदनगोपाल वार्ष्णेय यांनी दिली आहे व केंद्रीय कृषीमंत्री मात्र शिवराजसिंह चौहान व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मात्. देवेंद्रजी फडणवीस यांनी शुभसंदेश दिले आहेत.

  जगातील विविध देशातील शेती संबंधीचे विवेचन करताना हॉवर्ड त्याची विभागणी चार गटात करतात. त्यातील पहिला गट हा जंगल व समुद्रातील नैसर्गिक शेती. त्यात कोणताही मानवी हस्तक्षेप नसल्यामुळे हजारो वर्षे ती चांगल्या पद्धतीने टिकली आहे. दुसरा गट हा सध्या अस्तित्वात नसलेल्या देशांमधील शेती. तिसरा गट युरोप- अमिरिकेतील पाश्चात्य देशातील शेतीव चौथा पूर्वेकडील भारत-चीन-जपान आदि देश. यासर्व गटांच्या शेती पद्धती व त्याचे संतुलित वर्णन पुस्तकात आले आहे.त्यातून त्यांनी हे स्पष्ट केले आहे की, भारत व चीन या दोन देशातील शेतीच शाश्वत आहे.

 ' मातीची सुपिकता ही राष्ट्राची संपत्ती आहे ' हा या पुस्तकातील सर्वात महत्वाचा मुद्दा आहे. गेल्या पन्नास-साठ वर्षात रासायनिक खते व कीडनाशकांमुळे आपल्या जमिनीचा होत असलेला र्‍हास आपण बघतो आहोत. त्यासाठी देशभर भूमी सुपोषण अभियान राबवावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर या पुस्तकाचे महत्व लक्षात घेतले पाहिजे. हॉवर्ड अनेक वेळा या भूमीला मदर लँड म्हणतात. आपणआपले पालनपोषण करणारी म्हणून भूमाता म्हणतो. ही शेतीच आपले भरणपोषण करते, त्यामुळे तिला आपण मातृभूमी मानतो.रासायनिक खते व कीडनाशकांमुळे हेभरण-पोषण होत नाही, उलट ती निकृष्ट होत चालली आहे. तिला पूर्वपदावर आणण्यासाठी सर हॉवर्ड जैविक घटकांवर आधारित खतांचा पुरस्कार करतात. आज त्याची किती गरज आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही.

पुस्तकातला भावलेला दुसरा मुद्दा हा जमिनीतील कर्दम (ह्युमस) हाच पिकासाठीचा महत्वाचा घटक आहे, हा आहे. आपल्या ऋग्वेदातील श्रीसुक्तात अकराव्या श्लोकात असे म्हटले आहे की,

कर्दमेन प्रजा भूता मयि सम्भव कर्दम । श्रियं वासय मे कुले मातरं पद्म मालिनीम् ।।11।।

त्याचा अर्थ असा की, जनतेच्या आरोग्यासाठी चिखल (कर्दम-ह्युमस) हाच आधारभूत आहे. हे इंदिरापुत्र म्हणजेच लक्ष्मीपुत्र कर्दमा तू मजबरोबर रहा. माता लक्ष्मीला माझ्या कुळात स्थापित कर. म्हणजेच मातीत कर्दम-ह्युमस हा महत्वाचा घटक असला पाहीजे. इथे कर्दमाला लक्ष्मीपूत्राची-भूमीपुत्राची उपमा दिली आहे. या कर्दमच्या व्याख्या व स्पष्टीकरणासाठी पुस्तकात तीन पाने खर्ची घातली आहेत. त्यावरून कर्दमचे महत्व लक्षात येईल. कर्दम हा एक सजीव घटक मानला आहे कारण माती, पाणी, कृमी व काही जैविक घटक याचे ते मिश्रण आहे व ते पीक वाढीसाठी महत्वाचे घटक आहेत हे प्रयोगांनी सिद्ध केले आहे.

तिसरा विषय हा जमिनीतील मुळे व कवक-बुरशी यांचा निकटचा सहवास हा जमिनीतील पोषणद्रव्य शोषणाचा मुख्य मार्ग. त्या सहवासामुळे जमीनीत हवा खेळती रहाते व मुळांनी पोषणद्रव्य शोषणाची क्रिया सुलभ होते. त्याचा पीक वाढीसाठी चांगला उपयोग होतो. रासायनिक खते व कीडनाशकांमुळे या प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात व पिकाच्या गुणवत्ततेवर परिणाम होतो. मुळे व कवक-बुरशी यांचा निकटचा सहवास वाढवण्यात कर्दमची भूमिका महत्वाची आहे.

प्राणीजन्य टाकाऊ घटकांच्या प्रक्रियेने सेंद्रीय खत निर्मिती हाच शाश्वत शेतीचा मार्ग आहे. प्राणीजन्य मल-मूत्रादी टाकाऊ घटक ही जैविक रसायने आहेत ही कल्पना मांडली आहे. त्या रसायनांच्या प्रक्रियेने वनस्पतीजन्य घटकांचे विघटन होते व जैविक खत तयार होते. या विषयावरच सेंद्रीय खत निर्मितीची इंदूर पद्धत आधारलेली आहे. हॉवर्ड यांनी ती पद्धत विकसित तर केलीच परंतु ऊस-चहा-कॉफी सारख्या नगदी पिकांपासून भात-गहू-भाज्या व घायपातीसारख्या पिकांवर प्रत्यक्ष प्रयोग करून ती सिद्ध केलेली दिसते. या खताचा वापर केल्यास कीडनाशकांची गरजही लागत नाही इथपर्यंत ते मांडणी करतात व तशी उदाहरणे प्रस्तूत करतात.

हॉवर्ड यांनी एक क्रांतीकारक विचार मांडला आहे. संशोधकांनी कोणत्याही पिकाच्या निर्मितीचा तुकड्या-तुकड्यात विचार न करता एकात्मक पद्धतीने विचार केला पाहिजे. सध्या पिकांच्या निर्मितीतील विविध घटकांवर वेगवेगळे संशोधक काम करत असतात. उदा. बीज निर्मिती, कीड नियंत्रण, पोषण तत्वे देणारे घटक. त्यामुळे त्यांचे मुख्य लक्ष केवळ त्या विषयावरच असते. पिकांचा सर्वांगीण एकात्मिक विचार होत नाही. यावर हॉवर्ड आक्षेप घेतात. आज आपण वापरत असलेली रासायनिक खते, कीड नाशके, तण नाशके यामुळे जमिनीची होत असलेली दुरावस्था व त्याच बरोबर मानव-पशू-पक्ष्यांवरील परिणाम, वाढत असलेली रोगराई अश्या सजीव घटकांसमोरील अनेक समस्या गंभीर रूप धारण करत आहेत. शंभर वर्षानंतरही या विषयाकडे पाहिजे तेवढे लक्ष दिले गेलेले दिसत नाही. विशेषतः कृषी विद्यापीठे व महाविद्यालयांनी या दिशेने नव्याने काही प्रयत्न करता येतील का? याचा विचार करावा असे वाटते व हीच आपल्या भावी शेतीची दिशा असावी.

 सर्वात शेवटी परत एकदाश्रीसुक्ताकडे येवूया, त्यातील अनेक ऋचा या विविध देवतांच्या आराधनेच्या आहेत परंतु शेवटच्या छत्तीसाव्या ऋचेत असे म्हटले आहे की,

ऋण रोगादि दारिद्र्यं पापक्षुत् अपमृत्यवः । भय शोक मनस्तापाः नश्यन्तु मम सर्वदा ।।36।।

माझी(व सर्व प्राणीमात्रांची) कर्ज, रोगराई, इत्यादि दैन्यावस्था, पाप, भूक, अकाली मृत्यु, भिती, दुःख व मनस्ताप सदैव नष्ट होवोत. जर आपण या कर्दमयुक्त नैसर्गिक शेतीची दिशा घेतली तरच हे शक्य होईल.

सर हॉवर्ड पुस्तकाचा शेवट करताना असे भाकित करतात की, सुपिक जमिनीतून तयार झालेले अन्न मिळाले व मानवाने ते ताज्या स्वरूपात घेतले तर, त्याचे अर्धेअधिक आजारपण कमी होईल. श्रीसूक्ताशी ते सुसंगत वाटते. ते आपल्या भविष्याची वाटचाल पर्यावरणपूर्वक शाश्वत जीवन करण्यासाठी महत्वाचे आहे.

 

 

 

 

 


- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • पुस्तक परिचय-शाश्वत कृषी संजीवनी - अनुवाद अनिल व्यास
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (55), सामाजिक (98), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (34), संस्कृती (33), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (22), कम्युनिझम (4), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (2), राजकारण (11), सेवा (15), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (11), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.