पुणे ः भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी रक्तदान शिबीराचे आयोजन केले होते. भारतीय संस्कृती संवर्धक संस्था आणि संघाचा कसबा भागाच्या वतीने पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यालय असलेल्या मोतीबागेत हे शिबीर पार पडले. ज्यात १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
शिबिराचे हे नववे वर्ष होते. प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानदीप अकॅडमी चे संचालक महेश शिंदे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाचे कार्यवाह राहुल पुंडे, मोतीबाग नगर कार्यवाह प्रमोद वसगडेकर, भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी व कार्यवाह प्रसाद खेडकर यांची मुख्य उपस्थिती होती. शिबीर संयोजक सागर दरेकर यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. भारतीय संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी यांनी महेश शिंदे यांचे भारतमातेची प्रतिमा देऊन स्वागत केले.
रक्तदान शिबीर यशस्वितेसाठी जनकल्याण रक्तकेंद्राचे डॉ. रमेश कांबळे, जनसंपर्क अधिकारी संतोष अनगोळकर,आरती वैद्य, प्राची माने, सारिका नंदकर, गणेश शिंदे, प्राची देशपांडे, किशोर पुट्टेवार,किरण जांभळे, संगीता दळवी,सुनंदा पवार,विश्वनाथ गायकवाड आदींचे सहकार्य लाभले. ज्ञानदीप अकॅडमीचे संचालक महेश शिंदे म्हणाले, "शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा घोष आजही अमूल्य आहे. शिका म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण नव्हे,तर विचारशक्ती आणि तर्कशक्ती वाढवणे. 'संघटित व्हा' म्हणजे एकत्र येऊन सामूहिक शक्ती साधणे. परंतु 'संघर्ष करा' याचा अर्थ अनेकजण चुकीचा घेतात. संघर्ष म्हणजे हातात शस्त्र घेऊन झुंजणे नव्हे,संघर्ष म्हणजे स्वतःमधील उणीवा ओळखून, त्या भरून काढण्यासाठी केलेला सातत्यपूर्ण प्रयत्न होय."
कौशल्यांची गरज व्यक्त करताना शिंदे म्हणाले, "जगात टिकून राहण्यासाठी आणि मोठे होण्यासाठी प्रत्येकाला नवनवीन कौशल्यांची गरज असते. हे कौशल्य मिळवण्यासाठी स्वतःशीच झगडावे लागते, शिकावे लागते, प्रयत्न करावे लागतात. बोलणे, वागणे, निर्णय घेणे, संघटित होणे या प्रत्येक गोष्टीत कौशल्य विकसित करावे लागते. एक पिढी जर योग्य कौशल्यांनी सज्ज झाली, तरच ती पुढच्या पिढीला योग्य दिशादर्शन करू शकते. म्हणूनच भारताला खऱ्या अर्थाने महान बनवायचे असेल, तर प्रत्येकाने संघर्ष करून नवे कौशल्य मिळवले पाहिजे. संघटन ही केवळ संख्येवर नव्हे, तर तर्कशक्तीवर आणि कौशल्यावर अवलंबून असते."
-------------
मोतीबाग, शनिवार पेठ ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे मोतीबाग येथे आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन करतांना महेश शिंदे,राहुल पुंडे, प्रमोद वसगडेकर ,राजीव जोशी रक्तदान करतांना रक्तदाते.