•  01 May 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

इथे घडतात कार्यकर्ते... (भाग १)

विश्व संवाद केंद्र - पुणे 16 days ago
भाष्य  

 

                                                   राष्ट्रीय स्वयंसेवक संघ   -   संघ शिक्षा वर्ग

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीमध्ये कार्यकर्त्याचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. म्हणूनच

'कार्यकर्ता प्रशिक्षण' हा मुख्य हेतू समोर ठेवून संघातर्फे गेली ९८ वर्षे उन्हाळ्यामध्ये प्रशिक्षण वर्गांचे आयोजन केले जात आहे. प्रशिक्षण वर्गांच्या प्रवासाची धावती ओळख करून देणाऱ्या लेखमालिकेचा हा पहिला भाग...

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यपद्धतीची जी वैशिष्ट्ये आहेत, त्यातील 'संघ शिक्षा वर्ग' हे एक ठळक वैशिष्ट्य. या वर्गांना गेली अनेक वर्षे म्हणजे साधारण सत्तर वर्षांहून अधिक काळ 'संघ शिक्षा वर्ग' असे म्हटले गेले. गेल्या वर्षीपासून या वर्गांना 'कार्यकर्ता विकास वर्ग' असे म्हटले जात आहे. संघाच्या एकूण प्रवासात या वर्गांचे विशेष असे महत्त्व राहिले आहे. 
 
'संघ शिक्षणा'चा पहिला वर्ग
संघाची स्थापना १९२५ साली डॉ. हेडगेवार यांनी नागपुरात केली आणि पुढे दोन वर्षांनी म्हणजे १९२७ च्या उन्हाळ्यामध्ये १७ निवडक तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले. १५ एप्रिल ते १५ जून १९२७ या कालावधीत हा वर्ग झाला. हाच या वर्गांचा प्रारंभ होय. त्यानंतरची काही वर्षे या वर्गांना 'संघ शिक्षणाचे वर्ग', ' उन्हाळ्यातील विशेष वर्ग' असे म्हटले जात होते. डॉ. हेडगेवार यांच्या तत्कालीन पत्रव्यवहारातही हा उल्लेख वाचायला मिळतो. पुण्यात १९३५ साली पहिला 'अधिकारी शिक्षण वर्ग' झाला. या वर्गाचे उद्घाटन २२ एप्रिल १९३५ या दिवशी डॉ. हेडगेवार यांनी केले होते.

संघकार्याच्या वाढीसाठी, विस्तारासाठी आणि संघाचे विविध स्वरूपात सुरू असलेले कार्य समाजात सर्वदूर पोहोचवण्यासाठी आवश्यकता असते कार्यकर्त्यांची. संघाची योग्य समज प्राप्त केलेले, संघ विचारांची पक्की बैठक असलेले आणि संघाची कार्यपद्धती समजून घेतलेले, प्रशिक्षित कार्यकर्ते समाजात जाऊन संघाचे कार्य उत्तमरीतीने करू शकतील, या विचाराने 'कार्यकर्ता प्रशिक्षण' हा मुख्य हेतू समोर ठेवून गेली ९८ वर्षे हे वर्ग आयोजित केले जात आहेत. 
 

स्वरूपात झालेले बदल
सुरुवातीला प्रथम, द्वितीय आणि तृतीय वर्ष अशी या वर्गांची रचना होती. प्रथम आणि द्वितीय वर्षाचे वर्ग प्रत्येक प्रांतांमध्ये म्हणजे राज्यांमध्ये आयोजित केले जात असत, तर तृतीय वर्षाचा वर्ग नागपुरात अशी रचना होती. या वर्गांचे स्वरूप गेल्या वर्षीपासून (२०२४) प्रारंभिक वर्ग, प्राथमिक वर्ग, संघ शिक्षा वर्ग - सामान्य, संघ शिक्षा वर्ग - विशेष, कार्यकर्ता विकास वर्ग - १ आणि कार्यकर्ता विकास वर्ग - २ असे आहे. यातील कार्यकर्ता विकास वर्ग - १ हा दोन-तीन वा चार प्रांतांचा (राज्यांचा) एकत्र होतो आणि कार्यकर्ता विकास वर्ग - २ सर्वांचा एकत्रित नागपुरात होतो.


काय शिकवले जाते वर्गांमध्ये... ? 
गेली अनेक वर्षे संघ शिक्षा वर्गांमध्ये दिले जाणारे प्रशिक्षण प्रामुख्याने शारीरिक आणि बौद्धिक अशा दोन स्वरूपांचे होते. सकाळी आणि सायंकाळी प्रत्यक्ष मैदानावर विविध विषयांचे, खेळांचे, शाखेतील दैनंदिन कार्यक्रम, संचलन, घोष आदीचे प्रशिक्षण दिले जाते, तर उर्वरित वेळात निवासस्थानामध्ये चर्चा, पाठांतर, बौद्धिक वर्ग, रात्रीचा प्रबोधनपर कार्यक्रम आदींचे आयोजन केले जाते. या विषयांना गेल्या काही वर्षांमध्ये अनेक नव्या विषयांची जोड देण्यात आली आहे. त्यात मुख्यतः जागरण श्रेणीत येणारे सेवा, प्रचार आणि संपर्क हे विषय अभ्यासक्रमात नव्याने समाविष्ट करण्यात आले आहेत. तसेच गतिविधीमध्ये येणारे ग्रामविकास, धर्मजागरण, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण, सदभाव, गोसेवा आणि समरसता असे विषयही प्रशिक्षणात समाविष्ट करण्यात आले आहेत.

 

सेवाकार्य, समाजमाध्यमांचा जागरूकतेने वापर, वृत्तपत्रीय लेखन, श्रमसंस्कार, आपत्कालीन कार्य, संस्कृत संभाषण, वक्ता प्रशिक्षण अशा अनेक नव्या विषयांचा समावेश या वर्गांच्या अभ्यासक्रमात झालेला आहे. संगणकाचा उपयोग करून प्रशिक्षण आणि सादरीकरण, तसेच प्रत्यक्ष एखादे सेवाकार्य करणे अशा नव्या विषयांची ओळखही शिक्षार्थ्यांना या वर्गांमधून होते. या सर्व प्रशिक्षणाचा मुख्य हेतू समाजात जाऊन कार्य करण्यासाठी उत्तम कार्यकर्ता घडावा हाच असतो.

 
काही विशेष गोष्टी
संघाच्या कार्यपद्धतीमध्ये अनेक गोष्टी अशा आहेत की, स्वयंसेवक त्या गोष्टींमधून आपोआप काही ना काही शिकत असतो. नकळत होणारा तो संस्कार असतो. या वर्गांमध्येही अशा अनेक गोष्टी शिक्षार्थी नकळत शिकत असतात, अंगीकारत असतात तेही सहजपणे. वर्गासाठीचा प्रवास, गणवेश, वर्गाचे शुल्क यासाठीचा खर्च प्रत्येक शिक्षार्थी स्वतः करतो. नोकरदार मंडळी नोकरीतून रजा काढून आणि व्यावसायिक मंडळी त्यांचा व्यवसाय अन्य कोणावर तरी सोपवून या वर्गात सहभागी होतात. स्वतःचे कपडे, ताट, वाटी स्वतः धुणे अशा शिस्तीतून स्वावलंबनाचा संस्कार या वर्गांमध्ये होतो.
 
वर्गाचा उद्देश आणि उपयुक्तता
संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार या वर्गांच्या आयोजनात किती बारकाईने लक्ष देत होते हे तत्कालीन पत्रकांमधून दिसते. सन १९३३ च्या उन्हाळ्यात होणाऱ्या वर्गासंबंधी डॉक्टरांनी काढलेल्या सूचनांच्या पत्रकात हे बारकावे वाचायला मिळतात. डॉक्टरांनी या वर्गाचा उद्देश आणि उपयुक्तता या पत्रकातून स्पष्ट केली आहे. 
 
 
या २४ मार्च १९३३ च्या पत्रकात डॉ. हेडगेवार म्हणतात, ''प्रतिवर्षाप्रमाणे यंदाहि उन्हाळ्यांतील 'संघ शिक्षणाचे वर्ग' ता. १ मेपासून ता. १० जूनपर्यंत चालू राहतील. निरनिराळ्या संघ शाखांस भासणारी शिक्षक व कार्यकर्ते यांची उणीव दूर करणें हा ह्या वर्गांचा मुख्य उद्देश आहे, व ज्या शाखा या विशेष वर्गाकरितां स्वयंसेवक पाठवितात त्यांचें कार्य व्यवस्थित चालतें असा अनुभव येत असल्यामुळें प्रत्येक शाखेने या वर्गांचा अवश्य उपयोग करून घेतला पाहिजे."
 
या वर्गांच्या आयोजनामागील डॉक्टरांचा विचार किती व्यापक होता, हे या पत्रकातून सहजच उमजते. या वर्गांमध्ये नकळत होणारे संस्कार आणि वर्गांच्या रचनेत क्रमाक्रमाने होत गेलेले बदल याबद्दल माहिती घेऊ या पुढील भागात...
----
----
छायाचित्र - युगप्रवर्तक डॉ. हेडगेवार (संपादक - डॉ. श्रीरंग गोडबोले) या 'सांस्कृतिक वार्तापत्र'च्या विशेषांकातून साभार.                     

- विश्व संवाद केंद्र - पुणे

  • इथे घडतात कार्यकर्ते... (भाग १)
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र - पुणे

विश्व संवाद केंद्र - पुणे

 इतिहास (56), सामाजिक (101), माध्यमे (21), रा. स्व. संघ आणि परिवार (38), संस्कृती (37), जनजाती (17), महिला (14), उद्योग (4), शिक्षण (10), विज्ञान (4), हिंदुत्व (25), कम्युनिझम (5), राष्ट्रीय संरक्षण (14), इस्लाम (12), कला (4), राजकारण (12), सेवा (16), साहित्य (9), कृषी (4), पर्यावरण (12), क्रीडा (3), ख्रिस्ती पंथ (2), मनोरंजन (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.