'वसुधैव कुटुंबकम्'ची संकल्पना संपूर्ण जगाला दिशा देईल — सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
कॅनडात ग्लोबल हिंदुत्वाचा हुंकार

टोरांटो (कॅनडा):
"सर्व राष्ट्रे समृद्ध व्हावीत, बहरावीत आणि मानवी प्रगतीत प्रत्येकाने योगदान द्यावे, हेच हिंदूंचे स्वप्न आहे. 'वसुधैव कुटुंबकम्' हा प्राचीन हिंदू विचार केवळ संदेश नसून, संपूर्ण जगाला एकत्र आणणारी जीवनशैली आहे. भारत कधीही महासत्ता बनला नाही, तर तो एक गौरवशाली देश बनला. भारत हा आपल्या उदात्त चरित्राच्या बळावर 'विश्वगुरू' झाला आहे. त्यामुळे भारताचा उदय म्हणजेच अधिक एकजुट आणि अधिक मुक्त मानवता होय," असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले.
कॅनडामधील 'कॅनेडियन हिंदूज फॉर आऊटरीच, रिलेशन्स अँड डायलॉग' (CHORD) या संस्थेच्या वतीने आयोजित ‘हिंदू विश्व बंधू: एम्ब्रेस द वर्ल्ड इन फ्रेंडशिप’ (मैत्रीत विश्वाला सामावून घ्या) या विशेष परिषदेत ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. कॅनडातील १० प्रांतांमधून आलेले २,००० हून अधिक प्रतिनिधी आणि १७५ पेक्षा जास्त सामाजिक व सांस्कृतिक संस्थांच्या सहभागाने हा ऐतिहासिक सोहळा टोरांटो येथे संपन्न झाला.

- सरसंघचालकांच्या भाषणातील प्रमुख मुद्दे:
१) समाज जोडण्याचे आवाहन: कॅनडासारख्या बहुसांस्कृतिक देशात राहताना भारतीय समुदायाने स्वतःच्या ओळखीचा व संस्कृतीचा अभिमान बाळगावा. यासोबतच स्थानिक समाजाच्या प्रगतीत योगदान देणे आणि संवाद वाढवणे ही आपली जबाबदारी आहे. चारित्र्यनिर्मिती, सामाजिक समरसता आणि निस्वार्थ सेवाभाव या मूल्यांच्या माध्यमातून आपण जगासमोर आदर्श निर्माण केला पाहिजे.
२) भारताचा मूळ स्वभाव (DNA): भारत ही भेदभावरहित मदतीची परंपरा जपणारी भूमी आहे. मुस्लिम, ख्रिश्चन, ज्यू आणि पारसी समुदायांनी भारतात विनाभय आश्रय घेतला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात पोलंडच्या निर्वासितांना जामनगरच्या राजपुत्राने दिलेला आश्रय असो, किंवा मध्य-पूर्वेतील युद्धाच्या वेळी सात देशांतील नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचे भारताचे कार्य असो—संकटाच्या वेळी मागणी न करताही मदतीचा हात पुढे करणे हाच भारताचा डीएनए आहे.
३) एकतेची विविधता : आपली संस्कृती केवळ 'विविधतेत एकता' शिकवत नाही, तर 'एकतेची विविधता'ही मांडते. सर्व विविधता या एकाच तत्त्वाची अभिव्यक्ती आहेत. भारतात अनेक भाषा, पंथ आणि जाती आहेत; परंतु या सर्व भिन्नतेच्या मुळाशी एकच तत्त्व आहे.
४) सभ्यता आणि मूल्यांचा प्रसार: आपल्या पूर्वजांनी मेक्सिकोपासून सायबेरियापर्यंत आणि चीनपासून आग्नेय आशियापर्यंत प्रवास केला. त्यांनी कुठेही धर्मांतर केले नाही किंवा कुणावर आक्रमण केले नाही. त्यांनी जगाला गणित, ज्योतिष, आयुर्वेद आणि जीवनमूल्ये दिली.
५) 'हिंदू' संकल्पनेची व्यापकता: 'हिंदू' ही संकल्पना कोणत्याही एका विशिष्ट भाषेशी किंवा पूजापद्धतीशी बांधलेली नाही. हिंदू सर्वांचा आदर करतात आणि सर्वांना स्वीकारतात. हिंदू समाजाने आपल्या आचरणातून जगासमोर आदर्शाचा वस्तुपाठ ठेवावा, हीच काळाची गरज आहे.

- कॅनडा-भारत संबंध आणि आंतरराष्ट्रीय मान्यवरांची उपस्थिती:
१) जॅसन केनी (माजी संरक्षण मंत्री, कॅनडा): कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून कॅनडाच्या केंद्र सरकारचे माजी मंत्री जॅसन केनी यांनी कॅनडाच्या सामाजिक व आर्थिक विकासातील हिंदू समुदायाचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत भारत-कॅनडा संबंधांवर भर दिला. द्विपक्षीय संबंधांना नवी गती मिळत असल्याचे पाहून आनंद होत असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आगामी कॅनडा दौऱ्यामुळे हे संबंध अधिक दृढ होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
२) काश्मीर सिंह धालीवाल (विशेष अतिथी, खालसा दिवाण सोसायटी): ऐतिहासिक रॉस स्ट्रीट गुरुद्वारा व खालसा दिवाण सोसायटीचे प्रतिनिधी श्री काश्मीर सिंह धालीवाल यांच्या उपस्थितीने कॅनडामधील हिंदू आणि शीख समुदायातील पारंपरिक व घट्ट स्नेहाचे दर्शन घडवले. हिंदू आणि शीख यांच्यात भाषा, अन्न, संगीत, कौटुंबिक परंपरा आणि सेवाभावाची सामाईक संस्कृती आहे. जगातील सर्वात प्राचीन बहुसांस्कृतिक देश असलेल्या भारतात आपला जन्म झाला आणि सर्वात तरुण बहुसांस्कृतिक देश कॅनडात आपण राहतो, याचा आम्हाला अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.