समाजमाध्यमांतून ज्ञानाधारीत देशाभिमान जागवावा.
सुनील आंबेकरांचे कंटेंट क्रिएटर्सला आवाहन; व्हीएसके पुणे फाउंडेशनतर्फे कॉन्क्लेव्ह
पुणे - समाजमाध्यमांमुळे आता माध्यमांचे लोकशाहीकरण झाले आहे. त्यामुळे भारताबद्दलची जागृती वाढली असून, कंटेंट क्रिएटर्सनी समाजमाध्यमांद्वारे ज्ञानाधारीत देशाभिमान जागवावा, असे आवाहन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी केले.
फर्ग्युसन महाविद्यालयाच्या फिरोदिया हॉलमध्ये व्हिएसके पुणे फाउंडेशन आयोजित सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर कॉन्फ्ल्युएन्समध्ये ते बोलत होते. कार्यक्रमाला विश्व संवाद केंद्राचे कार्यवाह नितीन देशपांडे उपस्थित होते.
देशातील एकात्मभाव जागृत करण्यासाठी समाजमाध्यमांचा वापर व्हावा, अशी अपेक्षा आंबेकर यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, "देश, समाज आणि भवतालातील समानता शोधणाऱ्या कथा सांगितल्या पाहिजे. स्वाभाविक सत्याचा शोध घेणारी आपली जीवनपद्धती आणि धर्म नवीन पिढीसमोर पोहचविण्याचे आव्हान आपल्यापुढे आहे. समाजमाध्यमांमुळे हे प्रभावीपणे मांडता येईल." सामाजिक परिवर्तन, समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरणपपूरक जीवनशैली, नागरी कर्तव्ये आणि स्व-जागृतीसाठी समाजमाध्यमांवर कंटेट तयार व्हावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.