|| भारतीय संस्कृतीचा रेशमी बंध : श्रीगुरु नानकदेवजी ||

सिख्ख धर्माचे संस्थापक , आद्य गुरु श्रीनानकदेव यांचा प्रकाश दिन म्हणजेच ५५६ वी जयंती आहे.
' इक ओंकार सतिनामु ' या मंत्राद्वारे निर्गुण परब्रह्माची एकनिष्ठ उपासना करणाऱ्या तसेच विशुद्ध आचरणाला , सहभोजन आणि सहकाराला, श्रमांना प्रतिष्ठा देणारे संत म्हणून आद्य शीख गुरु श्री नानकदेवजी प्रसिद्ध आहेत . आपल्या उपासनेत, जीवनात धार्मिक व आध्यात्मिक त्याग, विरक्ती यांना महत्त्वाचे स्थान असले तरी ऐहिक कर्तव्य व शौर्य यांचा समतोल साधणे महत्त्वाचे असते हे त्यांनी आपल्या शिष्यांच्या मनावर दृढपणे ठसविले. भक्ती आणि शक्तीचा समन्वय साधून भारतीय भक्तीचळवळीला समर्थ बनविले. त्यामुळेच श्रीगुरु नानकदेव हे विश्ववंदनीय बनले आहेत.
पंजाब अर्थात वायव्य भारत ही श्रीगुरू नानकदेवांची जन्मभूमी, कर्मभूमी असली तरी
"नाचू कीर्तनाचे रंगी | ज्ञानदीप लावू जगी " म्हणणाऱ्या संत नामदेवरायांना त्यांनी आदरस्थानी मानले. वस्तुतः या उभयतांमध्ये 200 वर्षांचे अंतर आहे. परंतु नामदेव बानीचा आणि त्यांच्या कार्याचा प्रभाव पंजाबच्या मातीत मुरल्यामुळेच त्यांच्याप्रमाणेच समाजप्रबोधनासाठी आणि समाजसंघटनासाठी श्रीगुरु नानकदेव घराबाहेर पडले. त्यांनी आपल्या चार *उदासीं*च्या म्हणजे धर्मयात्रांच्या निमित्ताने केवळ अखंड हिंदुस्तानच नव्हे तर मक्का -मदिना, जेरुसलेम ,तुर्कस्तान , दमास्कस, बगदाद ,इराण आदी देशांबरोबरच श्रीलंका,नेपाळ ,चीन ,भूतान ,कैलास, मानसरोवरापर्यंतचा भूभाग पायी फिरून अनुभवला. त्यावेळी त्यांच्याबरोबर ' मरदाना ' हा एकमेव शिष्य होता. या धर्मयात्रांमध्ये नानकदेवांनी अखंड हिंदुस्तानाचे बारकाईने निरीक्षण केले. केवळ धर्मक्षेत्रातील नव्हे तर समकालीन राजकीय, सामाजिक घडामोडींबाबतही ते जागृत होते .एखाद्या दक्ष इतिहासकारासारखे त्यांचे लक्ष सभोवताली होते ,याची साक्ष त्यांच्या 'जनमसाखीं ' मधून मिळते.
आपल्या धर्मयात्रांच्या काळात श्रीगुरु नानकदेवांनी शूरवीर परंतु आपापसांतील मतभेद जपणारे स्वार्थग्रस्त राजे पाहिले. अंधश्रद्धा आणि भ्रामक जातीभेदांनी पोखरलेला हिंदू समाज पाहिला. आपली तेजस्वी परंपरा , ज्ञान विसरलेले 'आत्मविस्मृत 'पढिक पंडित पाहिले. दीन - दुबळा आणि अन्यायाला बळी पडणारा जनसामान्य पाहिला. बाबरच्या आक्रमणाने उध्वस्त केलेली भारतीय संस्कृती, भारतीय गावे पाहिली. इस्लामी राज्यशासकांकडून होणारे अत्याचार, मानवी क्रौर्याचा अतिरेक अनुभवला.
युद्धग्रस्तांच्या छावणीमध्ये सेवाकार्य करीत असताना स्त्रियांची दु: स्थिती त्यांनी पाहिली.
ज्या माता - भगिनींच्या भाळी कुंकुम - तिलक असायचा, केसांच्या भांगपट्टीत सौभाग्यरंग चमकायचा ,त्यांची झालेली दुर्दशा श्रीगुरू नानकदेवांनी कोणाचीही भीडभाड न बाळगता आपल्या भजनांमधून मांडली. सिख्ख धर्मीयांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या श्रीगुरुग्रंथसाहिब मधील 'आसारागु ', ' तिलंगरागु 'इत्यादी पदरचनांमधून तत्कालीन स्त्रियांच्या अत्याचारग्रस्त दुर्दैवी जीवनाचे चित्र आढळते. श्रीगुरू नानकदेवांनी इस्लामी कायद्याची कट्टरता त्यांच्या प्रदेशातच जाऊन अनुभवली. तिथे जाऊन धाडसाने, निर्भयपणे आपली व्यापक तत्वे परखडपणे परंतु सौम्य वाणीने विशद केली. सामान्य लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण केला. अध्यात्म क्षेत्रातील असामान्य परंतु उग्र वृत्तीच्या साधकांशी संवाद साधला. आपल्या विवेचक वाणीने, तर्कनिष्ठ बुद्धीने त्यांच्यामध्ये राष्ट्रसंरक्षणाचे बीज पेरले. दहशत, अतिरेकाच्या मार्गाने समाजात स्थान मिळवून पाहणाऱ्यांना शह दिला.*
' इक ओंकार सतिनामु ' या बीज मंत्रातून श्रीगुरू नानकदेवांनी सहज सुलभ अशा नामस्मरणावर भर दिला. मानवी देहाचे आणि कर्ममार्गाचे, कार्याचे महत्त्व सांगून प्रपंच -परमार्थाचा समन्वय साधला.
" नाम जपहु |कीरत करहु वड्ड खावहु ||" - अर्थात अखंड नामस्मरण करावे. समाजकल्याण करणारी कामे करीत आपले जीवन सार्थक करावे आणि कष्ट- श्रम करीत सन्मानाने भाकरी मिळवून ती सर्वांसह एकत्र खावी .'असे सांगत लंगर या संकल्पनेचा पाया घातला.
श्रीगुरू नानकदेवांच्या या त्रिसूत्रीमुळे कष्टकऱ्यांना सन्मान मिळाला. सहभोजनाच्या रूपाने उच्चनीचता ,गरीब -श्रीमंत असा भेद दूर करीत सामाजिक संघटनाचे सूत्र दृढ झाले.
परिणामतः श्रीगुरु
नानकदेवांभोवती समाजातील सर्व वर्गांतील , धर्मातील सुजन एकवटले.त्यांना घेऊन
श्रीगुरू नानकदेवांनी आपला सिख्ख संप्रदाय उभा केला . मात्र भारतीय परंपरेशी असलेले आपले सुसंवादित्व आणि आंतरिक नाळ कायम राहील याची दक्षता घेतली.
श्रीगुरू नानक देवांची लंगर ही संकल्पना आणि त्याच्या माध्यमातून त्यांनी केलेले सद्भक्तांचे संघटन पाहता 12 व्या शतकातील वीरशैव मतप्रचारक म. बसवेश्वरांच्या 'दासोह 'आणि 'महामने'संकल्पनेची आठवण येते. या संकल्पनांमध्ये प्रत्येक शिवशरणाने,भक्ताने आपल्या कमाईतला काही भाग समाजासाठी अर्पण करणे , जातीपातींचा विचार न करता सर्वांना आपल्या घरामध्ये मुक्त प्रवेश देणे, सहभोजन करणे हे बसवेश्वरांच्या कार्याचे वैशिष्ट्य काळ, प्रदेश आणि भाषा यांच्या सीमा ओलांडून नानक देवांपर्यंत पोहोचली. तर 'अवघे विश्वाची माझे घर ' मानणाऱ्या संत ज्ञानदेवांचे विचार ज्ञानदीप लावू जगी म्हणत पंजाब मध्ये कार्य करणाऱ्या संत नामदेवरायांच्या रूपाने नानक देवांपर्यंत पोहोचले. ' उपमा जातीची देऊ नये ' म्हणत माणसाचा विचार त्याच्या जातीपातीच्या आधारे नव्हे तर त्याच्या कर्तृत्वाच्या आधारे करावा हे आपले सांगणे कृतीत आणून ईश्वरनिष्ठांची मांदियाळी उभारणारे नामदेवराय यांच्या विचारांचा त्रिवेणी संगम एका अर्थाने
श्रीगुरु नानकदेव आणि त्यांच्या सिख्ख(शिष्य ) अनुयायां मध्ये झालेला दिसतो.
श्रीगुरू नानकदेवांनी ' श्रीजपुजी ' या पवित्र , सुबोध ग्रंथामधून अन्य भारतीय संतांप्रमाणेच नरदेहाची दुर्लभता, मनाची चंचलता आणि बाह्याचार यांचा निषेध करीत सामान्यजनांना संतसंगतीचे महत्त्व सांगत कर्मयोगाचा आणि श्रमप्रतिष्ठेचा पुरस्कार केला आहे. परब्रह्मसूचक ओंकारासाठी सत्य ,करता, पुरुष , निर्भय, निर्वेध, अकाल, अनंतकाल अशी विशेषणे वापरली आणि म्हणूनच त्यांनी सांगितलेला "इक ओंकार सतिनामु "हा बीजमंत्र भक्ती- शक्तीचा जागर करणारा महामंत्र ठरला गुरुपद हे वैयक्तिक सुखस्वार्थासाठी नसून ते धर्माच्या उद्धारकार्यासाठी असते. संघटन अखंड राखण्यासाठी आणि लोकसंग्रहाचे धोरण सतत ठेवण्यासाठी असते. 'त्यासाठी जनहिताच्या योजना आखाव्यात .दृष्टी परोपकारी ठेवावी म्हणजे ईश्वर आपला मार्ग प्रशस्त करतो .'हे श्रीगुरु नानकदेवांचे सांगणे सिख्ख परंपरेने अखंड जपले आहे हे त्यांच्या परमवंदनीय दशम गुरूंच्या परंपरेमधून अधोरेखित होते.
धर्म ,समाजकल्याण, संघटन आणि त्यातून राष्ट्र समर्थ बनविणे हे श्रीगुरू नानकदेवांचे सांगणे त्यांच्या शिष्यांप्रमाणेच (सिख्ख बांधवांप्रमाणेच) आपणही शिरोधार्य मानूया. या प्रकाश दिनाच्या निमित्ताने श्रीगुरु नानकदेवजी यांना शतशः प्रणाम.
(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव अध्यासन प्रमुख आहेत)
डॉ.श्यामा घोणसे