
12 मार्च हा वीर बाबुराव शेडमाके यांचा जन्मदिन. या निमित्ताने या अपरिचित स्वातंत्र्य सैनिकांच्या पराक्रमाचे स्मरण करूया.
भारतात जवळजवळ सातशे अनुसूचित जमाती राहतात आणि त्यांचे सर्वात महत्वाचे वैशिष्ट्य आहे स्वातंत्र्यप्रियता. रामायण काळापासून भारताच्या वन क्षेत्रात अनेक राजांनी राज्य केले आहे आणि त्यांनी नागरी राजांना मदत देखील केली आहे. भारतावर चालून आलेल्या प्रत्येक आक्रमकाशी त्यांचा संघर्ष होणे ही देखील स्वाभाविकच गोष्ट ठरली आहे.
भारताच्या मध्य क्षेत्रातील राज्यकर्ते म्हणजे गोंड. त्यांना राजगोंड नावाने देखील ओळखले जाते. मध्य भारतात त्यांची अनेक छोटी राज्ये होती. त्यामध्ये जबलपूर सारखे मोठा नागरी भाग असणारे राज्य होते तसेच चंद्रपूर सारखे अत्यंत दुर्गम राज्य देखील होते. गोंड स्वतःला बडादेव म्हणजे शंकर आणि धरतीमाता म्हणजे पार्वती यांचे पुत्र समजतात. काली, दन्तेश्वरी अशा विविध नावांनी मातेची पूजा करतात. गोंड जमतीकडे स्वतःची भाषा आहे, नाच आहे, विश्वाची निर्मिती कशी झाली याची कथा आहे, दैवते आहेत, इतिहास आहे, धर्मपरंपरा आहेत.
आपण युवक छत्रसाल छत्रपती शिवाजी महाराजांना भेटायला आले ही कथा इतिहासात वाचतो. महाराजांना भेटायला येण्यापूर्वी युवक छत्रसाल दिलेर खानासह याच चंद्रपूर राज्याच्या स्वारीवर गेले होते. कधी मुगलांचा पराभव करीत, कधी त्यांच्याशी तह करीत हे गोंड राज्य इंग्रज येईपर्यंत टिकून राहिले. त्यांनी या काळात नागपूरच्या भोसले घराण्याशी वेळोवेळी सहकार्य देखील केले. इंग्रज मात्र अन्य सर्व आक्रमकांपेक्षा वेगळे ठरले. त्यांनी भारतातील भोसले, शिंदे, होळकर अशा सर्व राज्यकर्त्यांना गुंडाळून ठेवले आणि देशभर स्वतःची सत्ता प्रस्थापित केली. गोंड राजे सुद्धा त्यांचे अंकित बनले. जनजाती क्षेत्रात त्यांनी कर गोळा करण्याची जमीनदारी पद्धत सुरु केली. अनेक गोंड सरदार इंग्रज सरकारचे जमीनदार बनले. त्यांना ही गुलामी पसंत नसली तरी इतक्या बलाढ्य शत्रू विरुद्ध लढणे त्यांना शक्य नव्हते.
अहेरी तालुक्यातील किश्तपूर गावाचे जमीनदार होते पुल्लेसूर शेडमाके. त्यांचा सर्वात मोठा मुलगा म्हणजे 13 मार्च 1833 या दिवशी जन्मलेला आपला कथा नायक बाबुराव. बांबूराब शेडमाके यांचे सुरवातीचे शिक्षण गावातच झाले आणि नंतर त्यांना रायपुरला शिक्षणासाठी पाठवले गेले. त्यांना देश गुलामीत आहे म्हणजे काय याची जाणीव तेथे झाली. ही गुलामी पसंत नसली तरी त्याविरुद्ध काही करण्याची शक्यता मात्र त्या काळात नव्हती. इंग्रज सरकार विरुद्ध उठाव करण्याची त्यांची इच्छा या काळात त्यांना दाबून ठेवावी लागली. पुढे संधी मिळताच ती इच्छा कृतीत प्रकट झाली.
1857 सालचा स्वतंत्रता संग्राम पेटला आणि त्याने बाबुराव सारख्या असंख्य तरुणांना सुद्धा पेटवले. यावेळी बाबुराव त्यांच्या गावी होते. त्यांनी 500 तरुणांजंगोम नावाची सेना बनवली आणि परिसरातील इंग्रज सैन्यावर हल्ले सुरु केले. पोस्ट, तारखाते, सैनिक ठाणी यांवर हल्ले करीत पुढे जाण्याचा क्रम त्यांनी सुरु ठेवला. त्यांच्या आक्रमणापुढे शत्रू टिकू शकला नाही आणि संपूर्ण अहेरी परगणा इंग्रजमुक्त झाला. क्रिस्तन नावाच्या इंग्रज सेनानी विरुद्ध नंदगाव, सगनापूर आणि बामनपेठ इथे झालेल्या तीन मुख्य लढाया त्यांनी जिंकल्या.
समोरासमोर होत असलेल्या लढायांमध्ये विजय मिळत नसल्याने क्रिस्तन ने आमिष आणि फितुरी चा वापर करायचे ठरवले. बाबुराव शेडमाके यांना पकडून दिल्यास एक हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे त्याने जाहीर केले. त्याची ही युक्ती दुर्दैवाने कामी आली. एका महिलेने बाबुराव शेडमाके यांना फसवून इंग्रजांच्या ताब्यात दिले. त्यांना चंद्रपूर येथील तुरुंगात ठेवून कोर्टात खटला चालवण्याचे नाटक केले गेले. शेवटी निकाल लावून एका पिंपळाच्या झाडाला टांगून फाशी देण्यात आले. इंग्रज सरकार उलथून लावू पाहणारा एक महान योद्धा फितुरीमुळे हुतात्मा झाला.
बाबुराव शेडमाके यांच्या बलिदानामुळे असंख्य भारतीय युवकांना देशासाठी लढण्याची प्रेरणा मिळाली आणि हा संघर्ष 15 ऑगस्ट 1947 या दिवशी स्वातंत्र्य मिळेपर्यंत सतत सुरूच राहिला.
भारताच्या सुदूर वनांमध्ये असे असंख्य वीर होऊन गेले आहेत आणि त्यांची चरित्रे शोधण्याचे काम आजही पूर्ण झालेले नाही.
डॉ नरेंद्र पेंडसे