पवना आणी मुळा नदी प्लास्टिक मुक्ती अभियान -१२ हजार किलो कचरा गोळा
पिंपरी चिंचवड - पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या सौजन्याने सेवा विभाग आणि पर्यावरण संवर्धन गतिविधीच्या वतीने विविध सामाजिक संघटनांच्या सहयोगाने पवना आणि मुळा नदीच्या ४ घाटांवर स्वच्छता अभियान करण्यात आले. नूतनवर्षाची सुरूवात सेवासंस्काराने, सेवाउत्सवाने करण्यात आली.
पवना आणि मुळा नदीच्या घाटांवर सातत्याने अस्वच्छतेचे साम्राज्य आहे. मानव प्राणी तो कचरा करण्यास कारणीभूत ठरत असून त्याची स्वच्छता राखणे आपली नैतिक जबाबदारी आहे हे ओळखून पर्यावरण संतुलन राखण्यास अनेक हात पुढे आले. आपल्या संस्कृतीमध्ये नदीला दैवी महत्व आहे. कारण पापनाशिनी आणि जीवनदायिनी अशी आपली नदी मागील अनेक वर्षांपासून प्लास्टिक आणि अस्वच्छतेच्या विळख्यात सापडली आहे. सणासुदीनंतर नदीच्या चार घाटांवर संपूर्ण प्लास्टिक मुक्तीचा संकल्प झाला. विविध संस्थांचे कार्यकर्ते इंजिनिअर्स युथ फोरम, टाटा टेकनॉलॉजीज ,इन्फीकेयर ( इन्फोसीस ), मोरया मित्र मंडळ, जय गगनगिरी महाराज मित्र मंडळ आणि इतर अनेक पर्यावरण प्रेमी संस्था आणि निसर्गप्रेमी नागरिक मिळून एकाच वेळी पवना आणि मुळा नदीच्या ४ घाटांवर स्वच्छता अभियान करण्यात आले.
महापालिका आयुक्त शेखर सिंग,जिल्हा कार्यवाह महेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त अजिंक्य येळे यांच्या सहकार्याने जाधव घाट वाल्हेकरवाडी , म्हातोबा मंदिर घाट वाकड , राममंदिर पुनावळे घाट , पवना दशक्रिया घाट चिंचवड येथे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली.
जे साहित्य हातात येईल त्याला घेऊन समर्पित सेवा भावनेने नदीमाईच्या स्वच्छतेसाठी सर्वानी स्वतःला झोकून दिले. रावेत, पुनावळे, चिंचवड आकुर्डी, किवळे, थेरगाव, वाकड, हिंजेवाडी आणि परिसरातील ६०० पेक्षा जास्त पर्यावरणप्रेमी सेवासाधना भावनेने सहभागी झाले.
यावेळी एकूण १२ ट्रक म्हणजेच जवळपास १२ हजार किलो प्लास्टिक, जलपर्णी आणि इतर कचरा गोळा झाला. महापालिका स्वच्छता विभागाच्या मदतीने तो पुढे विल्हेवाट करण्यास सुपूर्द करण्यात आला.
पवनादूत भूमिकेतून सर्वांना प्रबोधन आणि सेवाकार्य करण्यासाठी यावेळी आवाहन करण्यात आले.