आजपासून श्रीगणेशोत्सव प्रारंभ होत आहे. घराघरात गणरायाचे आगमन होणार आहे.आपल्या लाडक्या बप्पाच्या आगमनाने वातावरण चैतन्याने भारुन जाते. पावित्र्य आणि सात्विकतेचा सुगंध घराघरात दरवळतांना दिसतो.
श्रीगणेश ही बुध्दीची देवता. श्रीगणेश उपासनेची परंपरा आपल्या देशात खूप प्राचीन आहे. साधुसंताच्या वाड्मयातदेखील श्रीगणेशाचा उल्लेख आढळतो. संत ज्ञानेश्वर माऊलींनी भावार्थदीपिकेत 'देवा तुचि गणेशु l सकलमतिप्रकाशु' असे गणरायाचे वर्णन केले आहे.
कसबे पुणे या गावात सुलतानांनी गाढवाचा नांगर फिरवला. पुण्याची मसनवट केली ,पण जेव्हा जिजाऊ आऊसाहेब आणि शिवबा पुण्यात आले तेव्हा पुण्याचे भाग्य उजळले. पुण्याच्या जिर्णोध्दाराचा प्रारंभ झाला तो गणरायाच्या स्थापनेनेच ! कसबा गणपतीचे मंदिर बांधले गेले . त्याच्या पुजा-नैवैद्य आणि नंदादीपाची व्यवस्था आऊसाहेबांनी केली. पुणे आणि हळुहळू हिंदवी स्वराज्यही बाळसे धरु लागले. हिंदवी स्वराज्यातील अनेक किल्ल्यांवर आपल्याला गणपतीबप्पा विराजमान झालेले दिसतात. रायगडावरील दरवाजावर आपल्याला गणेशपट्टी दिसते तर जगदीश्वर मंदिराजवळील शिलालेखाचा प्रारंभच 'श्रीगणपतये नम:' असा झाला आहे. अशा प्रकारे मराठेशाहीच्या काळात श्रीगणेशाबद्दलचा आदर आणि भक्तीभाव आपल्याला दिसुन येतो.
छत्रपति शिवरायांचे सुपुत्र छत्रपति शंभुराजे हे आपल्या आजोबांप्रमाणे प्रकांड संस्कृत पंडीत होते. छत्रपति शंभुराजे यांचे एक नाव चिंतामणी असल्याचा उल्लेख संकर्षण सकळकळे यांच्या शिवकाव्यात सापडतो. चिंतामणी हे श्रीगणेशाचेच एक नाव आहे.
शंभुराजे हे समरधुरंधर सेनानी होते, त्याचप्रमाणे विद्वत्तेच्या क्षेत्रातही त्यांची बुध्दी लीलया संचार करत होती. बुधभूषण हा राजनीतीपर ग्रंथ म्हणजे त्यांच्या व्यासंगाचे उत्तम उदाहरण आहे. बुधभूषणच्या प्रारंभी शंभुराजे भगवान श्रीगणेशाला मनोभावे वंदन करतात
शंभुराजे लिहितात,
देवदानवकृतस्तुतिभागं हेलया विजितदर्पितनागम् ।
भक्तविघ्नहनने धृतर(य) त्नं तं नमामि भवबालकरत्नम् ।।
अर्थ –
"ज्याची स्तुती करण्यामध्ये देव आणि दानव दोघेही स्वतःला भाग्यवान समजतात; मत्त हत्तीला ज्याने लीलया वठणीवर आणले, जो भक्तांची संकटे दूर करण्यासाठी (सतत) प्रयत्नशील असतो, श्री शंकराचा रत्नांसारखा तेजस्वी असा 'गणपती' नामक पुत्र, त्यास मी (शंभुराजे) वंदन करतो."
अशाप्रकारे श्रीगणेशाला वंदन करुन शंभुराजे आपल्या ग्रंथलेखनाला प्रारंभ करतात. बुधभूषण हा ग्रंथ म्हणजे भारताच्या राजनीतीविश्वातील अमोल विचारधन आहे. पुढे या ग्रंथात शंभुराजे भगवान शंकर,माता पार्वती , श्री भवानी, भगवान श्रीराम,श्रीकृष्ण आदींना वंदन करतात. आणि आपल्या आदर्श राजनीतीचे दर्शन वाचकांना घडवतात.
केशवपंडीत यांनी शंभुराजांसाठी धर्मकल्पलता हा ग्रंथ लिहीला. त्यातील दंडनीतिप्रकरण हे शंभुराजकृतनीतिमंजिरी दंडप्रकरणम या शिर्षकाखाली अाहे. 1682 साली श्यामजी पुंडे नाईक यांनी तंजावरला याची प्रत तयार केली होती. या काव्याची सुरुवातदेखील श्रीगणेशाला वंदन करुनच झाली आहे. शंभुराजांच्या 'सातसतक' या हिंदी काव्यात 100 छंद असून त्यात गणपती,सीता,श्रीराम आदींंची स्तुती केली आहे. यावरुन त्यांची श्रीगणेशासह हिंदु देवीदेवतांवरील श्रध्दाच व्यक्त झाली आहे.
शंभुराजे आपल्या 'नखशिख' या काव्यात श्रीगणेशाची स्तुती करतांना लिहितात
शंभुराजे कृत नखशिख मधील निवडक श्लोक
श्री गणजूलिखिते संभूकृत नखशिख
पद पद पत्र सम चरण जंघ जिमी कनक कर मकर ॥
नाभी ललित गभीर, उदर लंबित विसाल वर॥
उर दीरघ अति मंजु चारि कर, देत चारि फल॥
एक दंत अरू सुंड लषत, हरि जात सकल मल॥
अति नैन चारू ढाली फलक श्रवन सीस छविसों मढत ॥
ग्यान होत अग्यान के सो गननायक गुन पढत ॥
अर्थ -
"श्रीगणेशाचे पाय हे कमलपात्राप्रमाणे समचरण , जांघ सोनेरी माशांची बनविलेली असून,नाभी खोल तर पोट लांब आहे.गणेशाची छाती अत्यंत विशाल असून चार हात धर्म,अर्थ,काम व मोक्ष आहेत.एक दात आणि सोंड ही सगळ्या पापाचे हरण करीत आहेत.अत्यंत सुंदर डोळे,मोकळे कान व शीर्ष सौंदर्याने नटवलेले आहे.गणेशाचे गुणगान केल्यामुळे अज्ञानी मनुष्यही ज्ञानी होतो."
अशाप्रकारे छत्रपति शंभुराजांची गणेशभक्ती त्यांच्या काव्यातुन व्यक्त झाली आहे.
छत्रपति शिवराय,छत्रपति शंभुराजे आणि संबंध मराठेशाहीच हिंदुत्वाचा अभिमान बाळगणारी होती.हिंदु देवीदेवतांना मानणारी होती हाच वास्तव इतिहास आहे.
संदर्भ
1) बुधभूषण
2) ज्वलज्वलनतेजस संभाजीराजा - डाॅ.सदाशिव शिवदे
3) महाराज
4) संतवाड्मय