आजपासून ३६ वर्षांपूर्वी, चीनमध्ये लोकशाहीसाठी सुरू झालेल्या एका ऐतिहासिक आणि निर्णायक आंदोलनाचा अत्यंत क्रूर अंत घडवून आणण्यात आला. १९८९ साली बीजिंगमधील प्रसिद्ध तियानानमेन चौकात हजारो विद्यार्थी आणि सामान्य नागरिक शांततेच्या मार्गाने राजकीय सुधारणा, भ्रष्टाचारविरोधी उपाययोजना, आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मागणी करत एकवटले होते. मात्र, चीनी सरकारने या शांततापूर्ण आंदोलनाला सैनिकी दडपशाहीच्या मार्गाने चिरडले. जगभर या घटनेचा तीव्र निषेध झाला, आणि ती 'तियानानमेन चौक नरसंहार' या नावाने इतिहासात कोरली गेली.
या अमानवी घटनेमागची पार्श्वभूमी, घटनांचा क्रम, आणि तिचा दीर्घकालीन परिणाम समजून घेण्यासाठी आम्ही तीन भागांची एक विशेष लेखमालिका सादर करत आहोत. या मालिकेचा हा पहिला भाग असून, तो आंदोलनाची सुरूवात, त्यामागील कारणं आणि सुरुवातीचे दिवस यांवर सविस्तर प्रकाश टाकतो.

चीनच्या पोलादी पडद्याआड १९८९ साली मे आणि जून महिन्यामध्ये प्रचंड मोठे आंदोलन झाले. लोकशाही मागण्यांसाठी विद्यापीठांमधील विद्यार्थी रस्त्यावर आले होते. सरकारने हे आंदोलन अक्षरशः निर्दयीपणे चिरडून काढले. हजारो विद्यार्थी आणि नागरीक ठार मारण्यात आले. त्यातील अनेक गोष्टी बाहेर आल्या देखील नाहीत. त्यानंतर गेल्या तीन दशकांमध्ये अनेक बदल झाले आहेत.
तीयानानमेनचे १९८९ या वर्षीचे आंदोलन चीनने चिरडले होते खरे; पण त्या आंदोलनाची झळ चिनी शासन, प्रशासन व्यवस्थेला कायमस्वरुपी स्मरणात राहील, अशी ठरली आहे. या पार्श्वभूमीवर १९८० च्या दशकाच्या मध्यात जे आंदोलन सुरू झाले होते, त्यातले अनेक परदेशात राहून आले होते, यात विद्यार्थी मोठ्या संख्येत होते. या सर्वांनी चांगल्या राहणीमानाचा अनुभव घेतला होता. व्यक्तिगत स्वातंत्र्य काय असतं, ते त्यांनी अनुभवलं होतं.
१९८९ मध्ये या आंदोलनांनी खूपच जोर धरला, अधिक राजकीय स्वातंत्र्य मिळावं अशी मागणी वाढू लागली. त्यानुसार लोकप्रिय हू याओबांग यांनी काही बदल घडवून आणलेही होते. अभिव्यक्तिस्वातंत्र्य मिळावं, सरकारची ‘सेन्सॉरशीप’ कमी व्हावी, अशाही मागण्या आंदोलक करत होते. दोनच वर्षांपूर्वी हू यांना कम्युनिस्ट पक्षातल्या ज्येष्ठ पदावरून हटवण्यात आलं होतं, तेव्हापासूनच बदलाची प्रक्रिया एकदम ठप्प झाली होती आणि आंदोलकांमधला असंतोष वाढता चालला होता.
एप्रिल १५, १९८९ मध्ये बीजिंगच्या तीयानानमेन चौकामध्ये आंदोलक जमत गेले. एका दिवशी तर या चौकात दहा लाख आंदोलक गोळा झाले होते, असे सांगितले जाते. सुरुवातीला सरकारने आंदोलकांच्या विरुद्ध कोणतीही थेट पावलं उचलली नाहीत. या आंदोलनांना नेमकं कसं उत्तर द्यायचं, याबद्दल कम्युनिस्ट पक्षात मतभेद होते. काहींना वाटत होतं की, आंदोलकांना काही प्रमाणात सूट देण्यात यावी, तर कठोर पावलं उचलावीत असं इतर काहींना वाटत होतं.शेवटी कट्टर मतं असणार्यांचं पारडं जड झालं आणि मे महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये बीजिंगमध्ये कडक निर्बंध लावण्यात आले.
एक महिना, दोन आठवडे आणि सहा दिवसांनी, म्हणजे ३ आणि ४ जून १९८९ रोजी ह्या लोकशाही आंदोलनाचा निर्घृणपणे शेवट केला गेला आणि त्या आंदोलनाला चीनव्यतिरिक्त जगात “तीआनमेन चौक नरसंहार ” असं संबोधलं जातं.
ज्या चौकातून माओ ने १ ऑक्टोबर १९४९ ला “पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना” (People's Republic of China) ची घोषणा केली त्याच तीआनमेन चौकाने १९८९ ला आंदोलक विद्यार्थ्यांचा आक्रोश, पीपल्स लिबरेशन आर्मी (People's Liberation Army:-PLA) ने केलेल्या बंदुकीच्या गोळ्यांचा वर्षाव, जखमी आंदोलक आणि भर शहरातून नागरिकांना चिरडत आलेले भले मोठे रणगाडे पाहिले.
खरंतर ही घटना म्हणजे व्यवस्थेविरुद्ध पुकारलेल्या बंडाचं एक आधुनिक उदाहरण होय. याआंदोलनानंतर चिनी सरकार इतकं सावध झालं आहे, की आजतागायत तीआनमेन चौकाच्या या घटनेबद्दल कुणाला चकार शब्दही काढू दिला जात नाही आणि त्याचबरोबर ‘तीआनमेन’ चौकामध्ये लाखो सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवून त्याद्वारे प्रत्येकाच्या हालचालीवर अगदी बारीक लक्ष ठेवलं जातं.
हे आंदोलन नेमकं कशासाठी होतं, कोणी सुरु केलं, सरकारने कशाप्रकारे ते हाताळलं आणि आंदोलनानंतर चीनमध्ये कोणते बदल घडून आले. मुख्य म्हणजे त्या आंदोलकांचं पुढे नेमकं काय झालं? आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करूया ..
१९८० च्या दशकात चीनमध्ये अनेक बदल होत होते. शासन करणाऱ्या कम्युनिस्ट पक्षाने काही खासगी कंपन्यांना आणि परदेशी गुंतवणुकीला परवानगी द्यायला सुरुवात केली होती. यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि राहणीमानाचा दर्जा सुधारेल अशी आशा कम्युनिस्ट नेते डेंग श्याओपिंग यांना होती.पण या बदलांसोबतच भ्रष्टाचारालाही सुरुवात झाली. हे सगळं घडत असतानाच राजकीय बाबींमध्येही पारदर्शकता असावी अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात होत्या. कम्युनिस्ट पक्षातच दोन विचारगट पडले होते. झपाट्याने बदल व्हायला हवेत असं एका गटाला वाटत होतं. तर देशावरचे कडक निर्बंध कायम रहावेत, असं दुसऱ्या कट्टर गटाला वाटत होतं.
आंदोलनाची ठिणगी पडली कशी?
खरंतर चीनमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या (सी.सी.पी ) विरोधात १९८६ पासूनच आग धुमसत होती. अमेरिकेतील प्रिन्स्टन विद्यापीठात शिकून चीनमध्ये परतलेले खगोलशास्त्रज्ञ आणि ‘युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी ऑफ चायना’चे उपाध्यक्ष फांग लिची, जे स्वतः आधी ‘सी.सी.पी’चे सदस्य होते. १९५७ ते १९५८ च्या दरम्यान या शास्त्रज्ञाने ‘सी.सी.पी’कडे पत्रव्यवहार करत सत्तेचं विकेंद्रीकरण, उदारीकरण तसेच चीनमध्ये मोकळी राजकीय-सामाजिक व्यवस्था यावी अशी मागणी केली. अर्थातच या मागणीनंतर त्यांना आणि त्यांच्या पत्नीला ‘सी.सी.पी’ने ‘पुनर्शिक्षणासाठी’ म्हणून हेबेई प्रांतातल्या लेबर-कॅम्पमध्ये पाठवलं.
शिक्षा पूर्ण करून आल्यावर फांग पुन्हा विद्यापीठात रुजू झाले. मात्र त्यांच्यावर सरकारने संशोधन बंदी घातली होती. या माणसाने आपले संशोधन छुप्या रीतीने चालूच ठेवत लोकशाहीप्रेमी विचार कायम ठेवले. १९८६ ला फांग यांच्या विचारांनी प्रेरित होऊन विद्यार्थ्यांनी आनहुई प्रांताच्या राजधानीत म्हणजेच हेफेई येथे निदर्शने केली आणि सत्तेचे विकेंद्रीकरण, आर्थिक आणि सामाजिक सुधारणा, मानवी हक्कांच्या संरक्षणाची मागणी केली. १९८९ ला ‘सी.सी.पी’चे तत्कालीन सर्वोच्च नेते देंग-शाओपिंग यांना पत्र पाठवून पुन्हा त्याच मागण्या केल्या, त्यामुळे देंग-शाओपिंग फांग यांच्यावर बरेच नाराज होते..
हे सगळं घडत असताना १९८६ मध्ये ‘सीसीपी.’चे तत्कालीन महानिर्देशक हू-याओ-बांग यांच्यावर हेफेई मधील विद्यार्थ्यांनी केलेलं आंदोलन हाताळता आलं नाही व त्यांनी या आंदोलनाला सौम्य प्रतिसाद दिला,असा आरोप केला गेला. १९८७ ला या कारणास्तव पार्टीतील कट्टर कम्युनिस्टांनी हू- याओ-बांग यांना राजीनामा देण्यास भाग पाडत त्यांची ‘सीसीपी.’मधून थेट हकालपट्टी केली. त्यानंतर मात्र काही काळाने हेफेई मधील आंदोलन थंड पडत गेलं.
In April 1989, students at top universities in Beijing commemorated the death of the Communist Party chief and political reformer Hu Yaobang at Tiananmen Square, marking the beginning of the pro-democracy.
१५ एप्रिल १९८९ ला अचानक हू याओ-बांग यांचं निधन (हत्या) झालं. काहींच्या मते ‘सी.सी.पी’मध्ये झालेल्या अपमानामुळे हू यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. हू यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून काही विद्यार्थी बीजिंगच्या त्या प्रसिद्ध अशा ‘तीआनमेन’ चौकात एकत्र आले. १७ एप्रिलपर्यंत “पेकिंग विद्यापीठ” आणि “चिंग-व्हा” विद्यापीठातील जवळपास ४००० विद्यार्थी या चौकात जमले आणि संघर्ष सुरु झाला.
साभार - वायुवेग
--------------------------------
संदर्भ :-
https://marathi.thewire.in/tiananmen-square-massacre-1
https://www.theguardian.com/notesandqueries/query/0,5753,-2317,00.html
https://www.youtube.com/watch?v=S3RzKKfNkTk
https://www.youtube.com/watch?v=xgi-jJfuEJM