संघविचार जगणारा आदर्श कार्यकर्ता गारेकाका: भैय्याजी जोशी
कै. भीमराव गारे स्मृतीग्रंथ प्रकाशन संपन्न

नाशिक प्रतिनिधी २९ ऑगस्ट २०२६:"संघविचार जगणारे गारेकाकांसारखे कार्यकर्ते हीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची खरी संपत्ती आहे," असे गौरवोद्गार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैय्याजी जोशी यांनी काढले. ते कै. भीमराव गारे स्मृतीग्रंथ प्रकाशन समारंभात बोलत होते.
ते पुढे म्हणाले, "संघाने व्यक्तिनिर्माणाची जी व्यवस्था निर्माण केली आहे, त्यातून असे कार्यकर्ते तयार होतात. संघकार्यामध्ये योगदान देणाऱ्यांमध्ये भीमराव गारे यांचे नाव अधोरेखित झालेले आहे. भीमरावांनी ज्या भावनेने आणि उद्देशाने आपल्या आयुष्याची रचना केली, ती सर्व कार्यकर्त्यांसाठी शिकण्यासारखी आहे. गारेकाका हे प्रश्न सोडवणारे कार्यकर्ते होते. अंतर्बाह्य शुद्धता असलेले आणि या समाजाच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी समाजाप्रती योगदान देण्यासाठी धडपडणारी मानसिकता असलेले ते कार्यकर्ते होते. त्यांचा आदर्श प्रत्येक कार्यकर्त्याने घ्यावा."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याशी समर्पित राहून असंख्य कार्यकर्त्यांना घडवणारे आणि आपल्या कार्यशैलीतून अनेकांना दिशा देणारे कै. भीमराव गारे यांच्या जीवनकार्याचा व आठवणींचा मागोवा घेणाऱ्या "व्रतस्थ पाथेय" या स्मृतीग्रंथाचे प्रकाशन इंदिरानगर येथे करण्यात आले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नानासाहेब जाधव यांनी गारेकाकांनी संघाच्या ग्रामविकासाचे कार्य तळागाळापर्यंत कसे पोहोचवले, याविषयी विशेष उल्लेख केला.
"कै. भीमराव गारेकाका हे संघकार्याशी समर्पित असलेले आणि असंख्य कार्यकर्त्यांना घडवणारे एक प्रेरणास्थान होते. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील संघसमर्पण, विचारांची स्पष्टता, कार्यकर्त्यांप्रती आत्मीयता, व्यवस्थापन कौशल्य आणि समाजकार्याची तळमळ आजही अनेकांच्या स्मरणात आहे. या आठवणी पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचाव्यात या भावनेतून, गारेकाकांच्या सहकारी कार्यकर्त्यांच्या अनुभवांना आणि आठवणींना शब्दरूप देऊन हा स्मृतीग्रंथ प्रकाशित करण्यात येत आहे," असे प्रास्ताविक करताना 'गो-विज्ञान सेवाभावी संस्थे'चे अध्यक्ष श्री. प्रभुजी पाठक यांनी सांगितले.
"आज प्रकाशित झालेला हा स्मृतीग्रंथ केवळ आठवणींचे संकलन नसून गारेकाकांच्या जीवनकार्याचा दस्तऐवज आहे. त्यांच्या सहवासात आलेल्या असंख्य कार्यकर्त्यांनी आपल्या आठवणी, अनुभव आणि भावभावना या ग्रंथाच्या माध्यमातून शब्दबद्ध केल्या आहेत. या लेखनातून गारेकाकांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू समोर येतील," असे ग्रंथाविषयी मनोगत व्यक्त करताना विजय काळुंखे यांनी सांगितले.
याप्रसंगी कै. गारेकाकांची कन्या सौ. प्राची शिंदे, सुरगाणा येथील महादू भोये आणि प्रांत ग्रामविकास मंडळ सदस्या सौ. योगिनी चंद्रात्रे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
व्यासपीठावर श्रीमती जयश्री भीमराव गारे, पश्चिम नाशिक विभाग संघचालक कैलास साळुंखे व नाशिक शहर जिल्हा संघचालक डॉ. विजय मालपाठक उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत ‘कै. भीमराव गारे स्मृतीग्रंथा’चे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमप्रसंगी शेखर बेंद्रे यांनी वैयक्तिक गीत सादर केले. आभार प्रदर्शन रवी करंबेळकर यांनी केले, तर सौ. येवला यांनी पसायदान सादर केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. पंकज नागमोती यांनी केले