तरुणांना संवादातून उत्तरे देणे गरजेचे – सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे जी
नव्या पिढीने प्रश्न विचारने ही भारतीय परंपरा

भोपाळ:
"नव्या पिढीने प्रश्न विचारणे ही भारतीय परंपरेचाच एक भाग आहे. त्यामुळे तरुणांच्या प्रश्नांना ऐकणे, समजून घेणे आणि संवादाच्या माध्यमातून योग्य उत्तरे देणे अत्यंत गरजेचे आहे. कोणत्याही तरुणाला त्याच्या केवळ बाह्य रूपावरून किंवा विचारांवरून तोलण्याऐवजी त्याच्यातील संवेदना आणि सकारात्मक शक्ती समजून घेतली पाहिजे," असे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे जी यांनी केले.
'समाज सेवा न्यास'तर्फे आयोजित 'राष्ट्रीय संस्थान छात्र संवाद' या कार्यक्रमात ते बोलत होते. या संवादात सुमारे २५० विद्यार्थी आणि प्राध्यापक सहभागी झाले होते. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे जी यांच्यासोबत मध्यभारत प्रांत संघचालक अशोक पांडे जी आणि भोपाळ विभाग संघचालक सोमकांत उमालकर जी उपस्थित होते. भारतमातेच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्यानंतर 'श्री राम जन्मभूमी संघर्षा'वर आधारित एका लघुपटाचे (डॉक्युमेंट्री) प्रदर्शन करण्यात आले. यानंतर विद्यार्थ्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, प्रशासकीय, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय विषयांवर आपल्या विविध जिज्ञासा मांडल्या.

- प्रश्न विचारणाऱ्या तरुणांशी संवाद हवा :
सोशल मीडिया आणि वैचारिक 'इको चेंबर'च्या आजच्या काळात तरुणांशी जोडले जाण्याविषयी बोलताना ते म्हणाले, "आजच्या पिढ्यांना 'जेन जी' आणि 'जेन अल्फा' अशा नावांनी संबोधले जाते; परंतु स्वामी विवेकानंदांनी तरुणांना 'युवा भारत' म्हटले होते. नरेंद्रच्या रूपात स्वतः स्वामी विवेकानंदांनीही प्रश्न विचारले होते आणि नचिकेताचे प्रश्न विचारणे तर भारतीय परंपरेत प्रसिद्धच आहे. त्यामुळे नवी पिढी सत्ता, समाज किंवा एखाद्या संस्थेला प्रश्न विचारत असेल, तर ते चुकीचे मानता कामा नये."
"तरुणांचे प्रश्न ऐकून त्यांच्याशी संवादात सहभागी झाले पाहिजे. केवळ प्रश्न विचारल्यामुळे कोणाला नाकारण्याऐवजी त्याचे म्हणणे समजून घेण्याचा मनापासून प्रयत्न झाला पाहिजे," असेही ते पुढे म्हणाले. भारत औपनिवेशिक (वसाहतवादी) मानसिकतेतून मुक्त करण्याच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी सांगितले, "देश राजकीयदृष्ट्या स्वतंत्र झाला असला, तरी 'डिकोलोनायझेशन ऑफ माइंड' (मानसिकतेची वसाहतवादमुक्ती) ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे." भारतीय संस्कृतीची मूल्ये, दृष्टिकोन आणि शब्दावलीवर अधिक संशोधनाची गरज असल्याचे सांगत त्यांनी 'धर्म' संकल्पनेचे उदाहरण दिले. भारतीय दृष्टिकोन योग्य प्रकारे समजून घेण्यासाठी इतिहास, पुरातत्व, भाषाशास्त्र आणि समाजशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांत सखोल अभ्यास आवश्यक आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वैचारिक वातावरण बदलण्याच्या उपायांवर बोलताना त्यांनी स्वाध्याय मंडळ, गट चर्चा (Group Discussion) आणि राष्ट्रहिताशी जोडलेल्या रचनात्मक उपक्रमांची सुरुवात करण्याचा सल्ला दिला. बंगळुरूच्या विद्यार्थ्यांच्या 'नमो भारती' कार्यक्रमाचे उदाहरण देत त्यांनी स्पष्ट केले की, लहान-लहान उपक्रमांच्या माध्यमातूनही समाजात सकारात्मक वातावरण निर्माण करता येते.
- तंत्रज्ञान हे साधन बनो, नियंत्रण मानवाच्या हातात राहो :
डिजिटल युगात संघाचे कार्य आणि तंत्रज्ञानाचा वापर याविषयी विचारलेल्या प्रश्नावर सरकार्यवाह जी म्हणाले, "मूळ विचार आणि मूल्ये ही शाश्वत असतात; मात्र काळाच्या ओघात उपलब्ध आधुनिक साधनांचा वापर केलाच पाहिजे. सोशल मीडिया आणि डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर नक्कीच व्हावा; परंतु तेथे काय आणि कोणत्या उद्देशाने प्रसारित केले जात आहे, हे व्यक्तीचे संस्कार आणि विवेक यावर अवलंबून असते. तंत्रज्ञान हे मानवता, राष्ट्र, पर्यावरण आणि इतिहासासाठी फायदेशीर ठरले पाहिजे. माणसाने तंत्रज्ञानाचा गुलाम न बनता ते स्वतःच्या नियंत्रणात ठेवले पाहिजे."
तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणाची गरज व्यक्त करताना ते म्हणाले की, याचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याच वेळी तंत्रज्ञानावरील मानवी नियंत्रण टिकवून ठेवणेही गरजेचे आहे. जर हे नियंत्रण सुटले, तर तंत्रज्ञान व्यक्तीसाठी साधन राहण्याऐवजी त्यालाच नियंत्रित करणारी शक्ती बनेल. वैचारिक संघर्षाच्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले, "जर याला 'वैचारिक युद्ध' (Discourse War) म्हटले जात असेल, तर त्यासाठी प्रभावी साधनेही आवश्यक आहेत. त्यासाठीचे तर्क सत्य आणि अभ्यासावर आधारित असावेत, आपली बाजू मांडताना स्पष्टता असावी, प्रभावी माध्यमांचा योग्य वापर केला जावा आणि यासाठी आवश्यक ते प्रशिक्षणही दिले जावे."
शिक्षणव्यवस्थेत भारतीय दृष्टिकोनाचा समावेश करण्याबाबत ते म्हणाले, "इतिहास, पुरातत्व, भाषाशास्त्र आणि समाजशास्त्राच्या अनेक क्षेत्रांत भारताला दीर्घकाळ पाश्चिमात्य दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न झाला. भारतीय समाजातील कुप्रथा आणि त्रुटी स्वीकारून त्या सुधारण्याचे प्रयत्न गरजेचे आहेतच; पण त्याचबरोबर समाजाच्या सकारात्मक उपलब्धी आणि परंपरांचाही वस्तुनिष्ठ अभ्यास झाला पाहिजे."
भ्रष्टाचाराबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले की, व्यवस्थेत सुधारणा होणे गरजेचे आहेच, पण याची सुरुवात व्यक्तीने स्वतःच्या वैयक्तिक जीवनापासून केली पाहिजे. आधी स्वतः भ्रष्टाचारापासून मुक्त राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि समाजातही याविरोधात व्यापक जागरूकता विकसित केली पाहिजे.
आपल्या मार्गदर्शनात (पाथेय) सरकार्यवाह जी म्हणाले, "विद्यार्थी आणि प्राध्यापक हा समाजातील सुशिक्षित वर्ग आहे, त्यामुळे त्यांची जबाबदारी अधिक आहे. व्यक्तीच्या शिक्षणात समाजाचे मोठे योगदान असते; त्यामुळे शिक्षणाला केवळ वैयक्तिक यशाचे माध्यम न मानता समाजाप्रती असलेल्या कर्तव्याशी जोडले पाहिजे."
वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि समाजाप्रती असलेले कर्तव्य यातील समन्वय म्हणजेच धर्माचे एक महत्त्वाचे स्वरूप आहे. समाजाने आत्मविश्वासाने सामर्थ्यवान बनले पाहिजे; परंतु हे सामर्थ्य मानवता आणि राष्ट्राच्या हितासाठीच वापरले गेले पाहिजे.
शेवटी, समाजाप्रती आपल्या मनात किती खोल संवेदना आहे आणि त्या संवेदनेला प्रत्यक्ष कार्यात बदलण्याची आपली काय योजना आहे, यावर विद्यार्थ्यांनी सखोल विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाची सांगता 'वंदे मातरम्'च्या सामूहिक उद्घोषाने झाली.