पुणे. - युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा जाज्वल्य इतिहास आणि अलौकिक पराक्रमाची साक्ष देणारा कोल्हापूरातील पावनगड राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऐतिहासिक पन्हाळगडाचा जोड किल्ला असलेल्या या पावनगडा बरोबरच कोल्हापुर जिल्ह्यातील गगनगड, कलानंदीगड, सामानगड, पारगड या किल्ल्यांचीही राज्य संरक्षित स्मारकाची अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेवर दोन महिन्यांत हरकत घेता येणार आहे.
पावनगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी इसवी सन 17 व्या शतकात बांधला. हा किल्ला आकारमानाने लहान असला, तरी लष्करीद़ृष्ट्या महत्त्वाचा आहे. पन्हाळा किल्लाच्या पूर्व टोकाला असलेला हा किल्ला पन्हाळगडासाठी मोठे संरक्षण होता. कसबा पन्हाळाअंतर्गत भूमापन क्रमांक 29 - सरकारी वन, भूमापन क्रमांक 30 - खासगी व भूमापन क्रमांक 128 - सरकारी मूलकी पड, असे एकूण 16 हेक्टर 24 आर इतके क्षेत्र राज्य स्मारक म्हणून संरक्षित केले जाणार आहे.
राजा भोजाची राजधानी..
शिलाहार राजा भोज याने पन्हाळा राजधानी असताना परिसरात बांधलेल्या 15 किल्ल्यांपैकी एक असणारा गगनगड, देवगिरीचा पाडाव झाल्यानंतर 1310 मध्ये दिल्लीच्या ताब्यात गेला होता. छत्रपती शिवरायांनी 1658 मध्ये तो जिंकून आपल्या ताब्यात घेतला. या गडावरील एकूण 4 हेक्टर 01 आर इतक्या क्षेत्रफळासह गगनगड राज्य संरक्षित स्मारक होणार आहे.
छत्रपती शिवरायांनी 1674 मध्ये जिंकलेला गडहिंग्लज तालुक्यातील सामानगड हा किल्ला त्याच्या 12 हेक्टर 96 आर इतक्या क्षेत्रफळासह, चंदगड तालुक्यातील कलानंदीगड एकूण 304 हेक्टर 12 आर इतक्या क्षेत्रफळासह; तर पोर्तुगीजांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी 1674 मध्ये बांधलेला आणि त्याचा पहिला किल्लेदार म्हणून नरवीर तानाजी मालुसरे यांचे पुत्र रायबा मालुसरे यांचे नाव घेतले जाते तो चंदगड तालुक्यातील पारगडही त्याच्या एकूण 19 हेक्टर 43 आर इतक्या क्षेत्रासह राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले जाणार आहे.
(साभार - एमएसएन न्यूज)