"समस्यांच्या निवारणासाठी वेदपरंपरा समजून घेणे गरजेचे" : डॉ. श्रीकांत बहुलकर
प्रा. डॉ. मंगला मिरासदार लिखित 'मंत्रपुष्पम्' पुस्तकाचे सारसबाग येथे प्रकाशन

पुणे, दि. १२ सप्टेंबर : "आजच्या काळातील विविध समस्या सोडवण्यासाठी आपली वेदपरंपरा नीट समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे. मंत्रपुष्पांजलीसारख्या अनेक गूढ व व्यापक अर्थ असणाऱ्या वैदिक रचनांचा अर्थ सततच्या अभ्यासातून आणि संशोधनातून शोधत राहिला पाहिजे. अशा अभ्यासातूनच या रचनांचे नवनवीन आणि कल्याणकारी अन्वयार्थ आपल्यासमोर उलगडत जातात," असे प्रतिपादन ज्येष्ठ संशोधक डॉ. श्रीकांत बहुलकर यांनी केले.
संस्कृतच्या अभ्यासक आणि प्राध्यापिका डॉ. मंगला मिरासदार लिखित 'मंत्रपुष्पम्' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. भारतीय विचार साधना, पुणे आणि श्री देवदेवश्वर संस्थान (पर्वती व कोथरूड) यांच्या वतीने १२ सप्टेंबर रोजी सारसबाग येथील गणेश सभागृहात हा सोहळा पार पडला. व्यष्टी आणि समष्टीच्या कल्याणाची कामना करणाऱ्या मंत्रपुष्पांजलीचा व्यापक अर्थ या पुस्तकात मांडण्यात आला आहे. लेखिका डॉ. मंगला मिरासदार यांनी पुस्तकाची भूमिका विशद करताना सांगितले की, "मंत्रपुष्पांजलीमध्ये 'राष्ट्र' ही संकल्पना अत्यंत स्पष्टपणे मांडली आहे. यामध्ये स्वकर्म, उपासकांची भौतिक समृद्धी आणि राजा व प्रजा यांनी समन्वयाने करायची कल्याणकारी प्रगती याविषयीची धारणा स्पष्ट केली आहे."
श्री देवदेवश्वर संस्थानचे मुख्य विश्वस्त सीए सुधीर पंडित यांनी आपले मनोगत व्यक्त करत सारसबागेत झालेल्या या विशेष ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला भारतीय विचार साधनाचे उपाध्यक्ष चित्तरंजन भागवत यांनी प्रास्ताविक केले. विनिता हिरेमठ यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर अजेय कात्रे यांनी उपस्थितांचे आभार मानले.