
अहिंसा परमो धर्म: - भगवान महावीर : काल, आज आणि उद्या
- सहाव्या शतकाच्या पूर्वार्धात बिहारमधील कुंडलपूर येथे राजा सिद्धार्थ व राणी त्रिशला यांचेपोटी एक तेजस्वी पुत्र जन्माला आला. त्याच्या जन्मानंतर राज्याची होत जाणारी उत्तरोत्तर प्रगती पाहून त्याचे नाव वर्धमान असे ठेवण्यात आले. वयाच्या तिसाव्या वर्षी हा राजकुमार जीवनाचे अंतिम सत्य जाणून घेण्याच्या तृष्णेने व्याकुळ होऊन, ऐहिक संपत्ती, सुखे, संसार व राजपाट त्यागून अध्यात्मिक जागृतीचा प्रसार व आत्मकल्याण करण्यासाठी जैन दीक्षा घेऊन तपस्वी बनला. बारा वर्षांच्या अथक तपस्येनंतर व आत्मध्यान साधनेनंतर त्याला केवलज्ञान (सर्वज्ञता) प्राप्त झाले. सुमारे तीस वर्षांहून अधिक काळ त्याने जैन तत्त्वज्ञानाचा प्रसार व प्रचार केला.
- हाच वर्धमान पुढे जैन धर्माचा चोविसावा तीर्थंकर म्हणून भगवान महावीर, वीर, अतिवीर, सन्मति अशा विविध नावांनी ओळखला जाऊ लागला.
भगवान महावीर यांचे जीवनकार्य आणि तत्त्वज्ञान हे आजच्या अशांत, दहशतवादी, भ्रष्ट आणि हिंसक वातावरणात समाजाला शांततेच्या मार्गावर घेऊन जाण्यास प्रेरक ठरेल असेच आहे.
- अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह, क्षमा, त्याग, संयम, प्रेम, करुणा, नम्रता आणि सदाचार या सर्वांचे सार म्हणजेच महावीरांचे संपूर्ण तत्त्वज्ञान आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. महावीरांची अहिंसा कायिक, वाचिक व मानसिक या तीनही संदर्भाने येते. प्रत्यक्ष शारीरिक यातना किंवा हत्या न करणे, वाणीने एखाद्याचे मन दुखावणे व त्यातून शाब्दिक यातना होतील असे न बोलणे, आणि द्वेष, मत्सर किंवा एखाद्याविषयी ईर्षा बाळगून मनामध्येही त्याविषयी वाईट न चिंतने अशा अनुषंगाने अहिंसेचे व्यापक रूप महावीरांच्या तत्त्वज्ञानातून आपल्याला शिकायला मिळते.
- सत्याविषयी आपले विचार मांडताना भगवान महावीर म्हणतात, "हे मानवा ! तुम्ही सत्यालाच खरे सार मानावे. जो ज्ञानी सत्याचे पालन करतो, तो मृत्यूलाही पोहून पार करतो." अर्थात सत्य हाच मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे असे मत ते मांडतात.
अस्तेय (अचौर्य), अर्थात दुसऱ्याची वस्तू त्याने प्रत्यक्षात आपल्याला न देता स्वीकारणे यालाही चोरी करणे असेच मानले गेले आहे. त्याचसोबत अशापद्धतीचा विचारही मनात येऊ देणे ही देखील चोरीच आहे. तेव्हा अशा कृतीपासून व विचारांपासूनही मनुष्याने दूर रहावे असे महावीर सांगतात.
- ब्रह्मचर्य हे परिपूर्ण तपस्या, नियम, ज्ञान, तत्त्वज्ञान, चारित्र्य, संयम आणि नम्रता यांचे मूळ आहे असे महावीरांचे सांगणे आहे. कोणत्याही तपस्येसाठी अत्यंत आवश्यक जर काही असेल तर तो आहे संयम ! आणि ब्रह्मचर्य पालन केल्याने संयम वृद्धिंगत होण्यास मदत होते. किंबहुना सर्व तापस्यांमध्ये ब्रह्मचर्य पालन हेच सर्वश्रेष्ठ तप आहे असे ते सांगतात. नियम म्हणजेच योगशात्रातील शौच, संतोष, तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान होत. या नियमांच्या पालनाशिवाय मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होत नाही आणि यासाठीच ब्रह्मचर्य पालन अधिक महत्त्वपूर्ण आहे. मुंडुकोपनिषदामध्ये म्हटल्याप्रमाणे ब्रह्मज्ञान हेच एकमेव ज्ञान आहे, बाकी सर्व अज्ञान आहे. त्यामुळे केवलज्ञान प्राप्तीच्या मार्गावरील प्रवास हा ब्रह्मचर्याच्याच पायरीवरून पुढे जातो हेच भगवान महावीरांना यातून सुचवायचे आहे.
- सध्याच्या युगातील आर्थिक विषमता हेच अशांतीचे मूळ कारण आहे. एकीकडे अमाप संपत्ती तर दुसरीकडे टोकाचे दारिद्र्य अशी विषमतेची पोकळी समाजात निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात सामाजिक स्वास्थ्य अबाधित राहायचे असेल, चोरी - लुटमारीची भीती असू नये असे वाटत असेल, संपूर्ण जगामध्ये मानसिक व आर्थिक शांतता प्रस्थापित व्हावी असे वाटत असेल, युद्धप्रसंग टाळायचे असतील आणि एकूणच जागतिक महायुद्धाची टांगती तलवार नको असेल तर भगवान महावीरांच्या संदेशातील सर्वात महत्त्वपूर्ण असा अपरिग्रह सांभाळावा लागेल. साठवून ठेवण्याची, ममत्त्वाची प्रवृत्ती सोडून देऊन सृष्टीतील संसाधने सर्वांसाठी आहेत व सर्वांचा त्यावर सामान अधिकार आहे हे सत्य समजून घेऊन त्याप्रमाणे लालसेचा त्याग जोपर्यंत आपण करणार नाही, तोपर्यंत जागतिक शांतता अशक्य आहे.
- महावीरांच्या तत्त्वज्ञानातून काल, आज आणि उद्यासाठीही अशा पद्धतीच्या शांततेचा संदेश समाजाला मिळत राहतो.
- 'क्षमा वीरस्य भूषणम्।' आणि 'अहिंसा परमो धर्मः।' यांसारख्या संदेशांमधून आपले आयुष्य समृद्ध करण्यामध्ये महावीरांचा मोलाचा वाटा आहे. अनेकांतवादासारख्या अमूल्य देणगीतून त्यांनी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या वस्तू, घडणाऱ्या घटना व एकूणच परिस्थितीकडे पाहण्याची सखोल आणि चिकित्सक दृष्टी आपणास दिली आहे. एकाचवेळी एकाच परिस्थितीकडे विविध बाजूनी पाहिल्यास ती वेगवेगळी भासते. चार आंधळ्यांनी हत्तीच्या वेगवेगळ्या अवयवांना स्पर्श करून हत्तीच्या अस्तित्त्वाविषयी बोलण्याप्रमाणेच आपण अनेकदा जीवनाविषयी व परिस्थितीविषयी आपले मत मांडत असतो. महावीरांचा अनेकांतवाद आपल्या संवेदना अधिक विस्तृत करण्यास मदत करतो.
- सध्याच्या काळात धार्मिक तेढ आणि त्यातून निर्माण होणारे हिंसेचे प्रसंग पाहता महावीरांची धर्माविषयीची व्याख्या अधिक सखोल आणि चिंतनीय आहे याची जाणीव होते. धर्म सर्वोत्तम आहे. धर्म म्हणजेच अहिंसा, संयम आणि तप असे महावीर सांगतात. मी सर्व प्राणिमात्रांची क्षमा मागतो, माझे कोणाशीही वैर नाही, मी प्रामाणिक मनाने धर्मामध्ये स्थिर झालो आहे व सर्व प्राणिमात्रांच्या माझ्याविरुद्ध केलेले अपराधांना मी क्षमा करतो, असे ओजस्वी विचार मांडणारे महावीर मग सृष्टीतील आत्मतत्वाशी एकरूप झालेले, विशाल अंतःकरण व साक्षात प्रेम असेच भासतात. दंड देण्याची ताकद असतानाही जो क्षमा करतो तो खरा वीर असतो. आणि असे तत्त्वज्ञान जगाला देऊन असंख्य वीरांना व असंख्यांमधील वीर प्रवृत्तीला जागृत आणि प्रेरित करणारा महावीर असतो.
भगवान महावीरांचे तत्त्वज्ञान यामुळेच त्रिकालाबाधित आहे. काल, आज आणि उद्याही हा मुक्ती संदेश संपूर्ण विश्वाला प्रेरणा देत राहील यात काही दुमत असण्याचे कारण नाही. आज भगवान महावीरांच्या जयंती निमित्त त्यांचे स्मरण करून विश्वशांतीसाठी प्रार्थना करूया आणि केवलज्ञान प्राप्तीच्या मार्गावरील महावीरांच्या विचारांचा व संदेशांचा अवलंब करूया.
डॉ. ऋषिकेश जाधव, कोल्हापूर
(लेखक संशोधक आणि विविध विषयांचे अभ्यासक आहेत.)