‘गो, कोलंबस, गो’, ‘गो बॅक, कोलंबस’, अशा घोषणांचा आवाज आणि त्यातील आक्रोशाने अमेरिकेचा आसमंत भरून गेला होता. अमेरिकेतील मूलनिवासी म्हणजेच अमेरिकन आदिवासी समाजाने हा आवाज उठवला होता.
कोलंबसाने अमेरिकेच्या जमिनीवर पाऊल ठेवले, या गोष्टीला पाचशे वर्ष पूर्ण होत होती, म्हणून १९९४ च्या ऑक्टोबर महिन्यात खूप मोठ्या समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. अशा वेळी मूलनिवासी समुदायाने, म्हणजेच अमेरिकन आदिवासी समुदायाने घोषणा द्यायला सुरुवात केली, आणि अत्याधुनिक अमेरिकेतील हा आक्रोश क्षणात जगभर पोहचला. मानावाधिकारांच्या मोठमोठ्या बाता करणाऱ्या अमेरिकेला आता, ‘आपण मूलनिवासींना कसे चांगले वागवतो’ हे जगासमोर मांडायची वेळ आली. मूलनिवासींसाठी काही योजना मंजूर करून, त्यांच्या हक्काचा आणि मानाचा एक दिवस जाहीर करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी देण्यात आले. यासाठी दिवस जाहीर झाला तो होता नऊ ऑगस्ट.
पण प्रत्यक्षात ९ ऑगस्ट या दिवशी 'जागतिक मूलनिवासी दिन' साजरा करायला सुरुवात झाली, आणि त्याच दिवशी अमेरिकेतील मूलनिवासी म्हणजेच तेथील आदिवासी या गोष्टीला प्रखर विरोध करू लागले. नऊ ऑगस्ट या दिवसाची निवड करणे म्हणजे या मूलनिवासींच्या मनातील जखमेवर नुसते मीठ चोळणे कसे आहे, ते लक्षात घेतले पाहिजे. यामागचा क्रूर, रक्तरंजित इतिहास समजून घेतला तरच त्यांच्या आक्रोशातील वेदना जगापर्यंत पोहोचेल.
मध्ययुगीन काळात, युरोपियन व्यापाऱ्यांना व्यापारासाठी व मिशनरी लोकांना ख्रिश्चन धर्माच्या प्रचारासाठी, नवीन वसाहतींचा शोध लावणे आवश्यक वाटत होते. यासाठी या सर्वांना चर्चकडून मोठ्या प्रमाणावर आर्थिक मदत मिळत होती. या लोकांमध्ये इंग्रज आघाडीवर होते.
सन १४९२ मध्ये भारताचा म्हणजेच इंडियाचा शोध घेण्यासाठी एक धाडसी दर्यावर्दी 'कोलंबस' निघाला. पण प्रवास करीत प्रत्यक्षात तो भारताऐवजी अमेरिकेत पोहोचला. त्याला वाटले की तो इंडियात पोहोचला आणि तेथील स्थानिक लोकांना तो 'इंडियन पीपल' समजला, व त्यांना 'रेड इंडियन' म्हणू लागला.
तिथे राहणाऱ्या मूलनिवासी समाजाची छोटी छोटी राज्ये होती. स्वतंत्र अशी संस्कृती होती, भाषा होती. यामध्ये चेरोकी, चिकासौ, चोक्ताव, मास्कोगी आणि सेमिनोल ही पाच प्रमुख राज्ये होती. या देशाचे क्षेत्र मोठे असल्याने जमिनीसाठी, पाण्यासाठी आपसात भांडायची गरज नव्हती. त्यांचे ते सुखाने राहत होते.
९ ऑगस्ट या दिवशी पौहाटन येथे इंग्रजांचे आणि अमेरिकेतील मूलनिवासी लोकांचे युद्ध सुरू झाले होते. इंग्रजांकडे आधुनिक शस्त्रास्त्रे होती व मूलनिवासींकडे फक्त धनुष्यबाण, तलवारीसारखी शस्त्रे होती. तरीही ते स्वतःच्या देशाच्या रक्षणासाठी लढत होते. चर्चने इंग्रजांच्या मदतीला मोठी फौज पाठवली. या युद्धात मूलनिवासी समाजाचे अतोनात नुकसान झाले, आणि अनेक लोक मृत्युमुखी पडले.
पुढे, अनेक देशांचे व्यापारी तिथे आले व त्यांनी मूलनिवासींची चांगली जमीन आपसात वाटून घेतली, आणि मूलनिवासींना मिसिसीपी नदीच्या पूर्वेला दूर निर्जन ठिकाणी पाठवण्यात आले. या प्रवासात मूलनिवासी लोकांचे प्रचंड हाल झाले. अंदाजे ३० हजार लोक यामध्ये मरण पावले. हा प्रवास ‘Trail of Tears’ म्हणजेच 'दुःखाश्रूंची रेघ' म्हणून अमेरिकेच्या इतिहासात कुप्रसिद्ध आहे.
मूलनिवासी तर ख्रिश्चन नव्हते. त्यांची प्रचंड नुकसानही झाले होते. त्यामुळे, ९ ऑगस्ट हा दिवस ‘मूलनिवासी दिन’ म्हणून त्यांना साजरा करावासा वाटत नाही. उलट, असे करण्यास, अमेरिकेतील मूलनिवासी म्हणजेच आपण ज्यांना अमेरिकन आदिवासी म्हणतो ते प्रखर विरोध करतात.
आज या मूलनिवासी समाजाची लोकसंख्या नगण्य आहे आणि त्यांना असलेले हक्कही तितकेच नगण्य आहेत. आज ते दुय्यम दर्जाचे नागरिक म्हणून जगत आहेत. त्यांच्याच देशात त्यांना कुठलेही स्थान नाहीये. आलेल्या व्यापाऱ्यांमधले युरोपातील अनेक लोक अमेरिकेत स्थायिक झाले, व त्यांनी आपापल्या वसाहती बनवल्या. काळाच्या ओघात तो एक स्वतंत्र देश बनला. अमेरिकेतील जे सध्याचे नागरिक आहेत, त्यांच्यापैकी काहींचे पूर्वज इंग्लंडमधून, काहींचे फ्रान्समधून तर कोणाचे जर्मनीमधून, असे वेगवेगळ्या युरोपियन देशातून आलेले आहेत. त्यामुळे बहुतेकांचे पूर्वज अमेरिकन नाहीत, आणि फक्त मूलनिवासी हे खरे अमेरिकन आहेत, पण आता त्यांना स्वतःची स्वतंत्र ओळखच उरलेली नाही.
या पार्श्वभूमीवर भारतातली परिस्थिती नेमकी उलटी आहे. भारतातील सर्व लोक मूलनिवासी आहेत. कुणीच बाहेरून आलेले नाही. ‘आर्य बाहेरुन आले’ हा सिद्धांत अतिशय विचारपूर्वक भारतामध्ये फूट पाडण्यासाठी तयार करण्यात आला होता, आणि तो लोकांच्या मनावर ठसवण्यात त्यात ते यशस्वी झालेला गेला. इतर भारतीय बाहेरचे आहेत की काय, असे अजूनही भारतातील आदिवासी समाजाला वाटते. पण आता विज्ञानाने सिद्ध केले आहे की, हा सिद्धांत धादांत खोटा होता.
हे सत्य आजही काही देशविरोधी शक्ती आदिवासी किंवा जनजाती समाजापर्यंत पोहोचू देत नाहीत. भारतीय जनजाती समाज कुणी वेगळा आहे व हेच सत्य आहे, असे त्यांना पटवून देण्याचे प्रयत्न होत असतो. नऊ ऑगस्ट हा आदिवासी दिवस म्हणून साजरा करणे कसे आवश्यक आहे हे सांगून त्यांना त्याकरता उद्युक्त केले जाते. यामध्ये नुकसान होते आहे ते भारतीय जनजाती समाजाचे. भारतीय समाजातील वनात राहणाऱ्या लोकांना 'जनजाती' हे संबोधन घटनाकार मा. डॉ. आंबेडकर यांनी दिले. त्यांना ‘आदिवासी’ हा शब्द आणि त्यामागचे कारस्थान ओळखता आले होते.
एखादा दिवस ‘आदिवासी दिवस’ किंवा ‘जनजाती गौरव दिवस’ म्हणून साजरा करावा असे भारतीय जनजाती समाजाला वाटल्यास त्यात काही वावगे नाही. जनजाती समाजाला स्वतःची अशी अत्यंत प्राचीन काळापासून चालत आलेली संस्कृती आहे,भाषा आहे, परंपरा आहे, इतिहास आहे. अनेक कर्तृत्ववान, कर्तबगार व्यक्ती या समाजात होऊन गेल्या आहेत. अशा एखाद्या व्यक्तीचे पुण्यस्मरण करून, तो दिवस आदिवासी दिवस किंवा जनजाती गौरव दिवस म्हणून मानण्यात यावा. असा विचार करून भारताने १५ नोव्हेंबर ' जनजाती गौरव दिवस' म्हणून साजरा केला जावा असे ठरविले, व त्याप्रमाणे हल्ली या दिवशी आपला आदिवासी दिन साजरा केला जातो.
=====
-- मोहिनी पाटणकर
(लेखिका जनजाती समाजासाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्या आहेत.)