पुणे ः महाराष्ट्राच्या मातीत खाशाबा जाधवांनतर तब्बल 72 वर्षांनी स्वप्नील कुसाळे यांनी ऑलंपीकचे पदक खेचून आणले आहे. संपूर्ण महाराष्ट्राला त्यांचा अभिमान असून, बालेवाडी - हिंजेवाडी येथील दहीहंडी कार्यक्रमात त्यांनी हिंदू संस्कृती वाढली पाहीजे, असे आवाहन केले .
स्वप्नील कुसाळे म्हणाले, “पहिल्यांदाच दहीहंडी उत्सवात सहभागी झालो आहे. आपली हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आपण सर्वजण जय श्रीराम म्हणतो, घोषणाबाजी करतो. त्या पुढे गेल्या पाहिजेत. हिंदू संस्कृती वाढली पाहिजे. आपण लहान मुलांना प्रोत्साहन दिले पाहिजे, म्हणजे आपले हिंदू राष्ट्र आणखी मोठे होईल.” पुढे ते म्हणाले, “दहीहंडी सारखे खेळ खेळण्यासाठी शरीरयष्टी महत्त्वाची आहे. उंचावर जाऊन हंडी फोडणे कौतुकास्पद आहे. त्यामागे मेहनत असते. तरुणांनी चांगला आहार घेतला पाहिजे. बाहेरचे खाऊ नये. घरातील जेवण करावे, वेळेत आणि पौष्टिक खावे,” असे आवाहनही स्वप्नील यांनी केले आहे. यावेळी स्वप्नील यांचा नागरी सत्कार करून त्यांना पाच लाख रुपये देण्यात आले.
---
कोल्हापूरचा रांगडा गडी
स्वप्नील कोल्हापुरच्या राधानगरीतल्या कांबळवाडी गावचा. 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वप्नीलने नेमबाजीचा सराव सुरु केला. स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे हे पेशाने शिक्षक. तर आई गावच्या सरपंच आहेत. त्याने भारतासाठी पदक विजेती कामगिरी केली आहे. स्वप्नील कुसाळे याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला तिसरं पदक मिळवून दिलं आहे. त्याने कांस्य पदकावर निशाणा साधला. स्वप्नीलने 50 मीटर रायफल थ्री पोजीशन प्रकार 1 मध्ये ब्राँझ पदक विजेती कामगिरी केली. स्वप्नील कुसाळे खाशाबा जाधव यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी पदक विजेती कामगिरी करणारा महाराष्ट्राचा दुसरा खेळाडू आहे.