•  15 Sep 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

प्रा.वसंतराव जोशी नावाचे ' यशवंतमार्गी '

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) today
भाष्य  

प्रा.वसंतराव जोशी नावाचे
' यशवंतमार्गी '

(महेश काळे)
आयुष्यात अशी खूप माणसं कमी येतात की जी आपल्या संपूर्ण आयुष्यावर प्रभाव सोडून जातात. जोशी सर त्यातलेच एक...!
  
' वसंत परशुराम जोशी, नाशिकच्या पंचवटी महाविद्यालयात प्राध्यापक होतो. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची अनेक वर्ष जबाबदारी होती, सध्या वनवासी कल्याण आश्रमाची पश्चिम क्षेत्राचा नगरीय कार्य प्रमुख अशी जबाबदारी...नाशिक रोडला राहतो '  हा सरांचा खणखणीत आणि तेवढ्याच स्पष्ट शब्दातला परिचय १९८७ पासून ऐकतोय. फक्त प्राध्यापक आहे, होतो आणि एखाद्या संघटनेची जबाबदारी एवढाच काय तो बदल झाला असेल. कार्यकर्ता म्हणून मानसिकता मात्र तीच .... अगदी अखेरच्या श्वासापर्यंत!

१९८७ ला परभणीहून नाशिकला शिक्षणासाठी आलो. कॉलेजचा शोध घेत असताना एका कार्यकर्त्याने सुचवल्यानुसार पंचवटी कॉलेजमध्ये प्रवेश झाला. त्याच ठिकाणी प्रवेश घेण्याचा निकष काय तर तेथे वसंतराव जोशी सर असतात. आमची पहिली भेट तशी नजर भेटच... नियमित कॉलेज सुरू झाल्यानंतर पहिल्या दोन पाच दिवसातच केव्हातरी अचानक व्यक्तिगतरित्या सरांच्या रौद्ररूपाचा सामना करण्याची वेळ माझ्यावर आली. आमची भेट झाल्याचे किंवा त्यांच्या संपर्काने मी तिथे आल्याचे कदाचित त्यांच्या स्मरणात नसावे. पण अकरावीला लेक्चर सुरू असताना निमित्त घडलं ते बाकावर पेनने रेघोट्या ओढण्याचं.  सरांनी हे पाहिल्यानंतर पुढचे २५-३० मिनिट माझा जो पाणउतारा त्यांनी केला तो मात्र आयुष्यभर लक्षात राहिला. त्यानंतर मात्र तब्बल ३९ वर्षे सरांचा केवळ स्नेह, प्रेम आणि आपुलकी याच गोष्टींशी सामना करावा लागला. 

सर विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते. पंचवटी महाविद्यालयाच्या एकंदरीत स्वरूपाची ज्याला कल्पना आहे त्याच्या दृष्टीने या महाविद्यालयात संघाशी संबंधित कार्यकर्त्यांने त्याकाळात काम करणे किती अवघड होते हे लक्षात येऊ शकेल. मात्र सरांनी ना विद्यार्थी परिषदेशी असलेले आपले नाते लपवले ना या नात्याचा गाजावाजा केला. कारण शिक्षण आणि विद्यार्थी यांच्याप्रती त्यांची प्रतिबद्धताच इतकी जबरदस्त होती की त्यांच्या या कमिटमेंटला शिक्षण संस्थेतील कोणी आव्हान देऊ शकले नाही. अंतर्गत राजकारणापायी त्यांच्या बदलीचे अनेक प्रयत्न झाले देखील पण 'आम्हाला नाशिक मध्ये कॉलेज चालवायचे आहे, वसंतराव जोशींना हलवून कसे चालेल...?'  या मूलभूत  प्रश्नापर्यंत हे प्रयत्न कायम थांबत गेले.  त्यामुळे कॉलेजमध्ये सरांचा आदरयुक्त दरारा हा कायम राहिला. 

जोशी सरांचे आणि माझे संबंध प्रामुख्याने तीन भूमिकेतून राहिले एक तर महाविद्यालयात त्यांनी शिकवले असल्यामुळे शिक्षक म्हणून, विद्यार्थी परिषदेच्या कामात असताना मार्गदर्शक आणि वनवासी कल्याण आश्रमाचे कार्य करत असताना सहकारी म्हणून... माझी त्यांच्याकडे बघताना भूमिका कायम गुरु, मार्गदर्शक म्हणूनच राहिली . सरांनी मात्र या तीनही भूमिकांची कुठेही गल्लत होऊ दिली नाही. हे त्यांच्या श्रेष्ठत्वाचे सर्वात मोठे लक्षण मी अनुभवले. 

सर प्राध्यापक आणि विद्यार्थी परिषदेसारख्या संघटनेचे दीर्घनुभवी कार्यकर्ते असल्याने शब्दशः हजारो विद्यार्थ्यांशी सरांचा परिचय होता. त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेल्या कार्यकर्त्यांना शोधून काढणे आणि त्यांच्याशी संपर्क करून त्यांना कामाशी जोडण्यावर सरांचा कायम भर असे. सध्या कुठलीही जबाबदारी नसलेल्या पण कार्यकर्ते असलेल्या अनेक जणांना त्यांनी स्वदेशी जागरण मंच, वनवासी कल्याण आश्रमाच्या कामात जोडले होते. कल्याण आश्रमाच्या क्षेत्रीय कामाची जबाबदारी आल्यानंतर तर त्यांनी जुन्या कार्यकर्त्यांना आवर्जून भेटणे हा आपल्या प्रवासाचा एक भागच बनवला होता. 

एखाद्या संघटनेमध्ये दीर्घकाळ कार्य केल्यानंतर माणूस आपल्या विचारांबाबत अनावश्यक आग्रही होतो असा सार्वत्रिक अनुभव आहे. मात्र जोशी सरांनी नव्या संघटनेची कार्यपद्धती, विचारसरणी ज्या सहजपणे आत्मसात केली त्यामुळे नवीन संघटनेत देखील ते केवळ रुळलेच नाही तर संघटनेमध्ये त्यांनी स्वतःचे असे वेगळे स्थान निर्माण केले. वनवासी कल्याण आश्रमाचे काम करत असताना गेल्या काही वर्षांमध्ये प्रवासात त्यांनी असंख्य कार्यकर्त्यांशी जोडलेले ऋणानुबंध हे त्यांच्या याच वेगळेपणाचे परिचायक आहे. 

बऱ्याच वर्षांपूर्वी सरांच्या धाकट्या भावाचा अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेचा परिणाम म्हणून असेल कदाचित त्यांनी देखील वाहन चालवणे सोडले होते. कॉलेज असो की परिषदेचे काम ते कायम सिटी बसने प्रवास करत राहिले. महाविद्यालयातून निवृत्त झाल्यानंतर देखील ते दुचाकी वापरत नसत. मात्र निवृत्तीनंतर काही काळाने त्यांनी स्कूटर वापरण्यास सुरुवात केली. सर एवढे वेगाने गाडी चालवायला लागले की आमच्या सारखे तरुण कार्यकर्ते देखील थक्क होऊ लागले. मात्र वाहन पुन्हा चालवण्याच्या निर्णयामागे कार्याची गती वाढवणे हाच त्यांचा एकमेव उद्देश होता. एवढ्या वर्षांमध्ये 'मी इकडे कुठल्या व्यक्तिगत भेटीसाठी आलो होतो' असे कधीही त्यांच्याकडून ऐकण्यात आले नाही. सतत संघटन, कार्यकर्त्यांच्या भेटी याचाच ध्यास त्यांच्या कायम डोक्यात असे.

काही महिन्यांपूर्वी मुलाच्या लग्नाच्या रिसेप्शनसाठी सरांचा आवर्जून फोन आला होता. या सोहळ्यात झालेली जोशी सरांची अखेरचीच भेट. एवढ्या आनंदाच्या प्रसंगात सर काहीसे थकल्यासारखे वाटले. दोन-तीन दिवसातच तपासणीअंती कर्करोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे लक्षात आले. गेल्या काही महिन्यांपासून चालू असलेल्या उपचाराला ते सकारात्मक प्रतिसाद देऊन या आजारावर मात करतील असे वाटले होते. सर्व उपचार चालू असताना प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष किंवा सोशल मीडियावर त्यांची सकारात्मकता ही थक्क करणारी होती. अशा कसोटीच्या प्रसंगी कार्यकर्त्याची मनस्थिती कशी असावी हेच जणू सरांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिले. कार्यकर्त्यांच्या भेटींमध्ये देखील कायम कल्याण आश्रम, कार्यकर्ता हाच त्यांच्या दृष्टीने चर्चेचा विषय असे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या मुलाच्या झालेल्या गंभीर अपघातानंतर एक धीरोदात्त पिता त्यावेळी सर्वांनी अनुभवला होता. त्यामुळे या आजारपणावर देखील ते तेवढ्याच धीरोदात्तपणे ते सहज मात करतील असे वाटले होते. 
मात्र आज अखेर नको असलेली ती बातमी आलीच..!!

विद्यार्थी परिषदेमध्ये कै.यशवंतराव केळकर यांचे प्रामुख्याने नाव घेतले जाते ते ' माणूस ' आणि 'संघटन' या विषयातील त्यांच्या असलेल्या प्रगाढ चिंतनाबद्दल. यशवंतरावांचे हे चिंतन ज्यांनी ज्यांनी आपल्या कृतीतून पुढे नेले त्यातीलच जोशी सर एक होते असे निश्चितपणे म्हणता येईल. सरांना वक्तृत्वाची एक उत्तम शैली लाभली होती त्यामुळे या शैलीतून त्यांनी यशवंतरावांची ही सूत्रे मांडलीच, पण प्रत्यक्ष कृतीरूपात देखील ही सूत्रे त्यांनी यशस्वीपणे जीवनात आणली. 

आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत 'माणूस' नावाच्या कामाचा ध्यास घेतलेले जोशी सर समर्पित 'यशवंतमार्गी ' होते...


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • यशवंतमार्गी
  • प्राध्यापक
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (17), सामाजिक (213), कला (3), संस्कृती (44), हिंदुत्व (29), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (70), रा. स्व. संघ आणि परिवार (89), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (12), विज्ञान (6), क्रीडा (5), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (2),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.