मूल्यशिक्षण अन् कौशल्यवृद्धीच सशक्त भारताचा पाया: सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे

गुवाहाटी, दि. ९ सप्टेंबर २०२६ :
"देश आणि समाजाच्या प्रगतीत शिक्षणाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. आजच्या आधुनिक काळात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तकी ज्ञानापुरते मर्यादित न ठेवता अनुभवातून शिकणारे आणि कौशल्यांवर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार दिलेले मूल्यशिक्षण आणि मुलांवर केलेले चारित्र्याचे संस्कार हेच सशक्त भारताच्या भविष्याचा खरा पाया ठरतील," असे रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे यांनी केले.
गुवाहाटी येथील प्राग्ज्योतिषपूर विद्यापीठाला दिलेल्या विशेष भेटीदरम्यान ते उपस्थितांशी संवाद साधत होते. या वेळी शिक्षण, संस्कृती आणि भारतीय मूल्यांच्या माध्यमातून राष्ट्रनिर्मिती कशी साधता येईल, यावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांचे महत्त्व अधोरेखित करताना होसबाळे म्हणाले, "तरुण पिढी हीच देशाच्या भविष्याचा मुख्य आधारस्तंभ आहे. प्राग्ज्योतिषपूर विद्यापीठ हे समाजाच्या सहभागातून उभे राहिलेले ना-नफा तत्त्वावरील एक उत्तम उदाहरण आहे. या विद्यापीठाची पहिलीच तुकडी इतिहास घडवणारी ठरेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासातील गुणवत्तेसोबतच जबाबदार नागरिकत्वाची भावना मनाशी बाळगणे गरजेचे आहे."
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. राघवेंद्र प्रसाद तिवारी यांनी विद्यापीठाच्या ध्येयाबद्दल माहिती दिली. "भारतीय ज्ञानपरंपरा, संस्कृती आणि मूल्यांची आधुनिक शिक्षणाशी सांगड घालणे हा आमचा मुख्य उद्देश आहे. स्वतःच्या मूळ वारशाचा अभिमान बाळगणारी आणि आधुनिक ज्ञानाने सज्ज असलेली नवी पिढी घडवून भारताला पुन्हा 'विश्वगुरू' बनवण्यात योगदान देण्याचा आमचा प्रयत्न आहे," असे प्रा. तिवारी म्हणाले. हा संपूर्ण कार्यक्रम विद्यापीठाचे कुलपती लेफ्टनंट जनरल (निवृत्त) राणा प्रताप कलिता यांच्या विशेष उपस्थितीत पार पडला.
- पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण
संवादाच्या कार्यक्रमानंतर दत्तात्रेय होसबाळे आणि संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य व्ही. भागाय्या यांनी विद्यापीठ परिसरात वृक्षारोपण केले. शिक्षण आणि सामाजिक जबाबदारीसोबत पर्यावरण संवर्धनाची जोड देणे ही काळाची गरज असून, या उपक्रमातून हरित आणि शाश्वत भविष्याचा संदेश देण्यात आला