•  14 Jun 2026
  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
    • केंद्राविषयी
    • वेबसाईटविषयी
  • विभाग
    • 'अर्थ'पूर्ण / Finance
    • आंतरराष्ट्रीय / International
    • कायद्याचे बोल / Legal Matters
    • क्रीडाविश्व / World of Sports
    • दिन विशेष / Dinavishesh
    • पर्यटन / Paryatan
    • पर्यावरण / Environment
    • पुस्तक परिचय / Book Review
    • बातम्या / News
    • भाष्य / Views
    • मनोरंजन / Entertainment
    • मुलाखत / Interview
    • राष्ट्र संत / Rashtra Sant
    • विज्ञान आणि तंत्रज्ञान / World of Science
    • व्यक्तिविशेष / Vyaktivishesh
    • संकीर्ण / Miscellaneous
    • संपादकीय शिफारस / Editors' Choice
    • संस्कृती / Samskruti
    • सेवा प्रकल्प / Seva Prakalp
  • अभिप्राय

संघ आणि समरसता

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk) 4 days ago
भाष्य  

संघ आणि समरसता
आपल्या स्थापनेपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने सामाजिक समरसतेला महत्त्वाचे स्थान दिले आहे. समरसता ही समतेच्या पुढे जाणारी एक पायरी आहे. आज विजयादशमी आणि धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने प्रा. डॉ. डी. डी. कुंभार यांचा संघाच्या समरसतेचे विवेचन करणारा लेख....
संघ व संघाची स्थापना व उद्देश


भारतावर परकियांची आक्रमणे मोठ्या प्रमाणावर झाली. त्यात शकांची टोळी, हूणांचे आक्रमण, इराणी व ग्रीक आक्रमणे, मुस्लिम आक्रमणे व शेवटी इंग्रजांचे आक्रमण, ज्यांनी १५० वर्षे राज्य केले. ब्रिटीशांनी हिंदू समाजात पद्धतशीर योजना करून गैरसमज निर्माण केले. समाजाचा बुद्धिभेद केला. हिंदू समाजाचा आपल्या श्रद्धास्थानांवरील विश्वास उडून जावा, अशी शिक्षण पद्धती निर्माण केली. या सर्व गोष्टींमुळे सर्व भारतातील समाज प्रांत, भाषा व जाती यांच्यातील भेदांनी पोखरला होता. त्याचप्रमाणे अस्पृश्यता हा तर भयंकर सामाजिक रोग होताच आणि आहे. आजही सगळ्या समाजातील अस्पृश्यता नष्ट झालेली नाही. भारतीय समाज संघटित आणि बलसंपन्न करायचा तर अशा दुष्ट दोषांपासून तो मुक्त करावाच लागेल. अशा स्थितीत काय केल्यामुळे समाजाची अधोगती थांबेलॽ सर्व समाज इतका बलशाली झाला पाहिजे की जगातील कोणतीही शक्ती त्याकडे डोळे वाकडे करून पाहण्याचे धडस करणार नाही. संघर्षातून संघटन होत नसते, ते समन्वयातून होते. मतपरिवर्तनातून होते. ही समाजाची स्थिती आणण्यासाठी, असा समाज उभा करण्यासाठी तसेच समाजातील आबालवृद्ध सर्वांनी तासभर तरी एकत्र यावे, आपल्या देशाचे, समाजाचे चिंतन करावे, परस्परांतील बंधूभाव, आत्मीयता, स्नेह वाढावा, देशभक्ती, चारित्र्य, निःस्वार्थीपणा या गुणांची जोपासना करणारे सामूहिक कार्यक्रम करावेत, त्याग, भक्ती, देशप्रेम, इतिहास, संस्कृती यांचे हजारो वर्षांपासून प्रतीक असलेला भगवा ध्वज, त्याला प्रणाम करून त्यापासून प्रेरणा घ्यावी, शेवटी सर्वांनी एकत्र येवून मातृभूमीची - प्रार्थना म्हणावी व 'भारत माता की जय", असा घोष करावा या सर्व हेतूंसाठी प्रेरित होवून परमपूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी १९२५ साली नागपूर येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. १९२५ पासून सुरु झालेले संघाचे कार्य आता सर्व जगात पसरले आहे. जर संघाची स्थापना झाली नसती तर सर्व भारतीय समाज आपापसातल्या मतभेदांमुळे संघटीत झाला नसता, दुबळा झाला असता. असा हिंदू समाज दुभंगला असता आणि पुन्हा एकदा परकियांना आक्रमणाची संधी प्राप्त झाली असती.
संघ भेदभाव विरहित, समतायुक्त व शोषणमुक्त समाज घडवण्याचे काम करत आहे हेच फार मोठे समरस‌तेचे काम आहे. समरसतेचा विचार पुढे न्यायचा असेल तर विचारांबरोबच प्रत्यक्ष आचारावर भर द्यावा लागतो, संघाने प्रत्यक्ष कृतीतून समरसता दाखवली आहे.
समरसता म्हणजे काय त्याची व्याप्ती

समरसता म्हणजे एकात्मता. एका व्यक्तीला दुसऱ्या व्यक्तीविषयी, एका समाजघटकाला दुसऱ्या समाजघटकाविषयी वाटणारी भावनिक एकात्मता म्हणजे समरसता होय. स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय यांच्या आधारावर नवी समाजरचना व्हावी. विषमता, उच्च-नीचता, जातीयता व वर्णव्यवस्था यांचे उच्चाटन व्हावे, ही भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची तळमळ होती. विकासाच्या मार्गावर समाज चालत असताना असे लक्षात येते की केवळ समता असून उपयोग नाही. समाजातले सारे घटक समरस झाल्याशिवाय, एकरूप झाल्यशिवाय समता नांदूच शकत नाही. समता ही सामान्यतः बाह्य परिस्थितीमधील समानता दर्शविते. तर समरसता आंतरिक बदल, मनपरिवर्तन आणि एकात्मता दर्शविते. समरसतेचा भाव जागृत झाल्याशिवाय समता येऊ शकत नाही. आली तरी ती टिकणार नाही. त्यामुळे समता येण्यासाठी सुद्धा समरसता आवश्यक आहे आणि आलेली समता टिकविण्यासाठीही समरसतेचीच आवश्यकता आहे. समता - समरसतेचा मेळ जमल्याशिवाय बंधूभाव येत नाही. समरसता हे मन परिवर्तनाचे, मनात बदल घडवून आणण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. आपल्या समाजातील जातिभेदाचा रोग बरा करायचा असेल तर त्यासाठी केवळ शिक्षण आणि नोकरीचे बिरुद कामाचे नाही. त्या पलीकडे जाऊन आपली मनं, विचारप्रवृत्ती बदलायला हवी. शिक्षण, वरवरचं आधुनिक व्यक्तिमत्व या पलीकडे जाऊन स्वतःची व पर्यायाने समाजाची मानसिकता बदलायला हवी. त्यासाठी एकमेव उपाय म्हणजे, 'समभावा' बरोबर 'ममभाव' हवा. समाजातल्या सर्व व्यक्ती समान आहेत हे केवळ तत्त्वत: मान्य करून चालणार नाही, तर त्यासाठी तितकाच आपलेपणा वाटायला हवा म्हणूनच समभाव + ममभाव = समरसता हे एक महत्वाचे सूत्र आहे. समरसता हे जीवनमूल्य आहे
सामाजिक समरसता मंचाची स्थापना उद्देश व कार्य 
संपूर्ण देशात समरसतेचा विचार, भाव आणि काम पोहोचावे या हेतूने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मातृसंस्था असलेल्या संघटनेमधूनच सामाजिक समरसता मंच व त्यानंतर समरसता साहित्य परिषद यांची निर्मिती झाली. पुणे येथे १९७४ साली वसंत व्याख्यानमालेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तिसरे पूजनीय सरसंघचालक मा. बाळासाहेब देवरस यांचे एक भाषण झाले. भाषणाचा विषय होता 'सामाजिक समता व हिंदू संघटन'. या भाषणातील अत्यंत तर्कशुद्ध व सुस्पष्ट विचार ही समरसता मंचाच्या स्थापनेची पार्श्वभूमी आहे. या भाषणाची तार्किक परिणती म्हणजे समरसता मंचाच्या कामाची सुरवात होय. हिंदू समाजातील अनिष्ट रूढी व परंपरा यांचे उच्चाटन करून तो समतेच्या व बंधूभावाच्या पायावर उभा रहावा यासाठी सर्व समाजसुधारकांनी प्रयत्न केले. एका अर्थाने हिंदू समाज समतायुक्त व शोषणमुक्त व्हावा हाच यामागील उद्देश होता. हाच या भाषणातील मुख्य आशय होता.

भारतरत्न पू. डॉ. बाबासारेब आंबेडकर यांची इंग्रजी कालगणनेनुसार १४ एप्रिल १९८३ रोजी जयंती होती. त्याच दिवशी भारतीय कालगणनेनुसार वर्षप्रतिषदा म्हणजे गुढीपाडवा होता. या दिवशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांची जयंती होती. या दोन महापुरुषांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून समरसता मंचाच्या कामाला सुरुवात झाली. जाती व्यवस्थेमध्ये हिंदू समाज संघटित होत नाही व जोपर्यंत तो संघटित होत नाही तोपर्यंत त्याला उज्ज्वल भविष्य नाही, हे वेळोवेळी डॉ. बाबासाहेबांनी मांडले आहे. जातीवर आधारीत विषमता नष्ट होण्यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला. विषमतामूलक क्षुद्र भेदाभेद मिटवायचे असतील तर हिंदू म्हणून एकत्र या, हा संघटनेचा मंत्र डॉ. हेडगेवारांनी दिला. मार्ग भिन्न असले तरी दोघाही महापुरुषांना अंतिमतः समाजहिताचीच चिंता होती. त्यामुळे दोघांच्याही जयंतीच्या दिवशी ज्येष्ठ विचारवंत मा. दत्तोपंत ठेंगडी यांच्या मार्गदर्शनाने सामाजिक समरसता मंचाच्या कामाला सुरुवात झाली. त्या वेळी त्यांनी केलेले भाषण अत्यंत विचारप्रवर्तक असून 'समरसतेशिवाय सामाजिक समता, अशक्य' या नावाने ते प्रसिद्ध आहे. हे भाषण म्हणजे समरसता मंचाचा आधारभूत असा दस्ताऐवज आहे.
सामाजिक समरसता मंचाचे ब्रीदवाक्यही 'बंधुभाव हाच धर्म' असेच आहे. बंधुभावनेमुळे सर्व प्रकारचे भेद गळून पडतात व एकमेकांमध्ये अभिन्नतेची भावना निर्माण होते. यातून सर्व समाजघटक परस्परांच्या सुख-दुःखाच्या भावनेशी एकरूप होतात. हीच खरी समरसता होय. अशी समरसता निर्माण करण्यासाठी सामाजिक समरसता मंचाने मराराष्ट्रात खूप प्रयत्न केले. 
संघाने केलेले समरसतेचे कार्य
संघाने संघाच्या शाखेमधून अनेक चांगले 'स्वयंसेवक' घडवले आहेत. संघाने देशाला दोन उत्कृष्ट पंतप्रधान दिले. मा. अटलबिहारी बाजपेयी व मा. नरेंद्र मोदी यांनी सामाजिक समरसतेच्या तत्वातून देशात मोठे कार्य उभे केले. संघाचे स्वयंसेवक गरीब आणि मागास वस्त्यांतून जातात. तेथील मुलांसाठी साक्षरतेचे वर्ग चालवितात. स्वच्छतेचे पाठ देतात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कर्तव्य भावनेतून १९९३ साली ३० सप्टेंबरला लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे झालेला भूकंप, २६ डिसेंबर २००८ रोजी आलेली सुनामी व १६ ऑगस्ट २०१८ मध्ये केरळमधील महापूर अशा प्रसंगी मोठ्या प्रमाणात विविध प्रकारची सेवाकार्ये चालविली. जेव्हा-जेव्हा नैसर्गिक आपत्ती येते तेव्हा-तेव्हा संघ मदतीला धावून जातो. याप्रमाणेच उत्तर भारतात दुर्गाष्टमीच्या दिवशी कन्यापूजनाची प्रथा चालू आहे. शेकडो स्वयंसेवकांच्या घराघरातून त्या दिवशी सेवावस्तीतील छोट्या-छोट्या शेकडो कन्यकांना आवर्जून बोलाविले जाते. त्यांची विधिपूर्वक पूजा केली जाते. त्यामुळे वस्तीत समतेचे व ममतेचे वातावरण निर्माण होते. अयोध्येतील राम मंदिराचा शिलान्यास हरिजनबंधू चौपाल यांच्या हस्ते करण्यात आला होता. हरियाणातील चरखी दादरीच्या विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सारेच मुसलमान होते. इस्लामी पद्धतीनुसार त्या मृतदेहांचे दफन करण्यासाठी कोणी इस्लामी संस्था पुढे झाली नाही. तेथील मौलवींना बोलावून अथपासून इतिपर्यंतचे सर्व विधी करणारे सारे संघ स्वयंसेवक होते. सौदी अरब देशातील वृत्तपत्र 'अल रियादा'ने म्हटले, "आजपर्यंत आमची अशी जी धारणा होती की, RSS मुस्लिमविरोधी आहे. ती धारणा पूर्ण चुकीची होती हे आता आम्हाला नीट उमगले आहे. गुजरातमध्ये मच्छू धरण फुटल्यावर बेघर झालेल्यांमध्ये मुस्लिमांची संख्या जास्त होती. ते रमजानचे दिवस होते. श्री. वाजपेयी तेथे गेले होते. शेकडो मुस्लिमांनी वाजपेयींची भेट घेऊन कृतज्ञतापूर्वक सांगितले, "संघवाल्यांनी रमजानच्या पद्धतीनुसार आमच्यासाठी खाण्यापिण्याची सारी व्यवस्था उत्तम प्रकारे केलेली आहे. "
संघाच्या स्वयंसेवकांनी १९६२ साली झालेल्या चीनच्या युद्धात देशभरातील जनमत सरकारच्या, आपल्या सैन्याच्या पाठीशी उभे केले होते.  पाकिस्तानशी झालेल्या १९६५ सालच्या युद्धानंतर श्रीगुरुजींना आपला नियोजित दौरा रद्द करून दिल्लीला जावे लागले. प्रमुख नेत्यांच्या बैठकीत श्रीगुरुजींची भूमिका अत्यंत मार्गदर्शक ठरली. बांगलादेश मुक्तिसंग्रामाच्या १९७१ च्या काळातही स्वयंसेवकांची भूमिका खूपच प्रभावी ठरली. कारगिल युद्धाच्या वेळी घायाळ झालेल्या सैनिकांना त्वरेने रक्तपुरवठा करणे, खाद्य-पेयांचा पुरवठा करणे इत्यादी कामे संघाच्या स्वयंसेवकांनी केली. देशातील समरसतेचे दर्शन त्यातून सर्वांना झाले. अनेक उदाहरणे देता येतील एवढे संघाने समरसतेचे काम केले आहे.
सामाजिक समरसता मंचाचे कार्य
सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातूनही समरसतेचे फार मोठे कार्य झाले आहे. महापुरुषांची जयंती आणि पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करून समरसतेचा विचार सर्व समाजापर्यंत पोहोचविण्यात आला. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी समरसता साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात येते. 'भटके-विमुक्त विकास परिषद' स्थापन करण्यात आली. भटके-विमुक्त समाजातील विद्यार्थ्यांसाठी तुळजापूरजवळ यमगरवाडी येथे प्रकल्प सुरू करण्यात आला. आता भटके-विमुक्त समाजातील विविध घटकांसाठी १६ प्रकल्प सुरू आहे. भटके-विमुक्त समाजासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्या युती शासनाने 'इदाते कमिशन'ची घोषणा केली. समरसता सभेचे २००५ साली आयोजन केले.
"अस्पृश्यता म्हणजे सवर्ण (स्पृश्य) समाजाच्या मनातील संकुचित भाव' असे श्री गुरुजींनी म्हटले आहे. समरसता मंचामुळे हा संकुचित भाव दूर होण्यास मदत झाली. अस्पृश्यता पाळणे हा धर्माचाच एक भाग आहे, अशी चुकीची समजूत होती. यासाठी सर्व धर्माचार्यांना श्री गुरुजींनी एकत्र आणले व अस्पृश्यतेला धर्मात कोणतेही स्थान नाही, असा ठराव एकमताने संमत करण्यात आला. 
हिंदू समाजाच्या हजारो वर्षांच्या इतिहासातील ही एक वैशिष्ट्यपूर्ण घटना श्री गुरुजींमुळे घडून आली. त्यामुळे त्यांच्या जन्मशताद्बीच्या निमित्ताने समरसता यात्रेचा उपक्रम हा अतिशय महत्वाचा मानला जातो. वर्धा येथील १९३४ सालच्या संघशिबीराला महात्मा गांधींनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले की, शिबिरात कुणाच्या मनात स्वतःच्या जातीचे भान नव्हते आणि दुसऱ्याच्याही जातीचे भान नव्हते. आपण सर्व हिंदू आहोत, हीच एकमात्र भावना सर्वांच्या मनात होती. महात्मा गांधींनी डॉ. हेडगेवारांचे अभिनंदन केले. तसेच डॉ. बाबासाहेबांनी पुणे येथे भरलेल्या संघाच्या उन्हाळी शिबिराला १९३९ मध्ये भेट दिली होती. तेव्हा डॉ. हेडगेवार व डॉ. आंबेडकर यांची भेट झाली होती. डॉ. आंबेडकरांचा अनुभव महात्मा गांधी यांच्यासारखाच होता. पू. सरसंघचालक मा. मोहनजी भागवत यांनी २२ सप्टेंबर २०२२ रोजी ऑल इंडिया इमाम संघटनेचे प्रमुख इमाम उमर अहमद इलियासी यांची भेट घेतली. इल्यासी यांनी मा. भागवत यांचा राष्ट्रपिता, राष्ट्रऋषि असा उल्लेख केला. मदरशाला दिलेली ही भेट म्हणजे सामाजिक समरसतेचाच एक उपक्रम आहे. 
समाजात समरसता निर्माण होण्यासाठी व्यापक पातळीवर सामाजिक प्रबोधन करणे आवश्यक आहे. आपला देश, आपली संस्कृती आणि समाज किती प्राचीन आहे? याची जाणीव करून देण्याची गरज आहे. प्रख्यात स्वातंत्र्यसेनानी, लेखक आणि विचारवंत कन्हैय्यालाल मुन्शी यांनी प्राचीन भारताच्या संस्कृतीविषयी म्हटले आहे, 'जगाच्या पाठीवर अनेक संस्कृती उदयाला आल्या आणि विलय पावल्या. त्या संस्कृती केवळ पुराणवस्तू संग्रहालयात अवशेष म्हणून पहायला मिळतात." इजिप्तची संस्कृती, रोमन संस्कृती, ग्रीक संस्कृती या नष्ट झाल्या पण भारतीय संस्कृतीचा प्रवाह मात्र गंगेच्या निर्मळ प्रवाहासारखा अक्षुण्ण आहे. 
कवी इक्बालने त्याच्या काव्यात सुंदर वर्णन केले आहे. तो म्हणतो,
" यूनान ग्रीस रोमाँ सब मीट गये जहाँ से।
 क्या बात हैं कि हस्ती मिटती नही हमारी।" 
हे वर्णन करताना तो या देशाला हिंदुस्थान म्हणतो. 'सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा' हे त्याचे शब्द आहेत. 
संघ भारतीय संस्कृतीचे संवर्धन करतो आणि भारतीय राज्यघटना हे सर्व समाजाचे, समरसतेचे डॉक्युमेंट आहे.
प्रा. डॉ. डी. डी. कुंभार


- विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

  • संघ
  • विजयादशमी
Share With Friends

अभिप्राय

अभिप्राय लिहा

Can't read the image? click here to Refresh.

लेखक

विश्व संवाद केंद्र वृत्तसेवा (team vsk)

.

 उद्योग (8), सेवा (16), सामाजिक (163), कला (3), संस्कृती (41), हिंदुत्व (28), साहित्य (16), जनजाती (9), इतिहास (64), रा. स्व. संघ आणि परिवार (78), इस्लाम (5), मनोरंजन (2), माध्यमे (8), पर्यावरण (9), राजकारण (5), महिला (12), राष्ट्रीय संरक्षण (2), शिक्षण (9), विज्ञान (5), क्रीडा (4), कम्युनिझम (1), ख्रिस्ती पंथ (1), कृषी (1),

दिनविशेष

विषय:

साहित्य | शिक्षण | क्रीडा | इतिहास | संस्कृती | कला | सामाजिक | विज्ञान | उद्योग | सेवा | पर्यावरण | राजकारण | राष्ट्रीय संरक्षण | हिंदुत्व | कम्युनिझम | इस्लाम | ख्रिस्ती पंथ | कृषी | जनजाती | महिला | रा. स्व. संघ आणि परिवार | माध्यमे | मनोरंजन |

उपयुक्त लिंक

  • मुख्य पान
  • विश्व संवाद केंद्र
  • वेबसाईटविषयी
  • संकीर्ण
  • अभिप्राय
  • संपर्क

संवाद व संपर्क

  • +91-8468957320
  • samparka@vskpune.org

कार्यालय

  • विश्व संवाद केंद्र, पुणे.

© Copyright 2023, विश्व संवाद केंद्र, पुणे , All Rights Reserved.