सोलापूरमध्ये 'सेवासंगम' -६९ सेवाभावी संस्थांचा उत्स्फूर्त सहभाग

सोलापूर: देशहित आणि समाजहित जपणाऱ्या सेवा संस्थांचे जाळे अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने, सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात नुकताच 'सेवासंगम' सोहळा आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात सोलापूर जिल्ह्यातील ६९ सेवा संस्थांचे प्रतिनिधी आणि सेवा कार्यकर्ते उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन आणि भारतमाता प्रतिमेच्या पूजनाने झाली. या प्रसंगी व्यासपीठावर विविध मान्यवर उपस्थित होते
• डॉ. सुनीलजी इंगळे (मा. जिल्हा संघचालक, सोलापूर)
• डॉ. रमेश माधवराव पांडव (अखिल भारतीय सामाजिक समरस्ता गतिविधी वस्ती विषय प्रमुख)
• श्री शिलेंद्रजी बोरकर (पश्चिम महाराष्ट्र प्रांत सेवा प्रमुख)
• श्री राजुसा काटावे (मा. शहर संघचालक)
• श्री वरदराजजी बंग (शहर सह संघचालक)
• सौ. चंद्रिका चौहान (अखिल भारतीय सेवाभारती संचालक)
• श्री बाबुलालजी वर्मा (सेवाभारती सचिव, सोलापूर)
• श्री मदनजी मोरे (पुणे विभाग व्यवस्था प्रमुख)
मुख्य वक्ते डॉ. रमेश पांडव यांनी आपल्या बीजभाषणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या १०० वर्षांच्या प्रवासावर प्रकाश टाकला. संघाने सेवाकार्यातून उभी केलेली जनशक्ती आणि सामाजिक परिवर्तनाचे महत्त्व त्यांनी विषद केले. जिल्हा संघचालक डॉ. सुनील इंगळे यांनी 'पंच परिवर्तन' या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण रक्षण, स्वदेशी आणि नागरिक कर्तव्य या पाच आयामांवर त्यांनी भर दिला.
शैलेंद्र बोरकर यांनी सेवासंगमचा समारोप केला. सेवा कार्यात सातत्य आणि कार्यकर्त्यांमधील समन्वय किती महत्त्वाचा आहे, याबाबत त्यांनी विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगीता कोरे यांनी केले, तर जिल्हा सेवा प्रमुख श्री. ना. करपे यांनी प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय करून दिला. अण्णाभाऊ साठे नगर सेवा प्रमुखांनी 'देश हमे देता है सबकुछ' हे प्रेरक वैयक्तिक पद्य सादर केले.