उपासना नारीशक्तीची
महिला सक्षमीकरण आणि पर्यावरण संरक्षणासाठी झटणाऱ्या वनिताताई

नवरात्र म्हणजे शक्तीची उपासना, देवीच्या नऊ रूपांची आराधना. या नऊ दिवसांत आपण मातृशक्तीचे स्मरण आणि पूजन करतो. निर्मितीशक्तीचे आणि नऊ या अंकाचे अतूट नाते आहे. बी जमिनीत गेल्यावर नऊ दिवसांनी अंकुरते, गर्भधारणेपासून नऊ महिने नऊ दिवसांनी बाळ जन्मते. म्हणूनच आदिशक्तीची, निर्मितीशक्तीची पूजा नऊ दिवसांत केली जाते. अशाच एका 'आदिशक्ती' वनिताताई.
वनिता मोहिते यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील बुधगाव येथे झाला. त्यांचे शिक्षणही त्याच गावात झाले. बी.एस्सी., बी.एड. झाल्यानंतर लग्नानंतर त्या भवानीनगर, वाळवा, इस्लामपूर येथे स्थायिक झाल्या. मानवी आयुष्य हे संघर्ष आणि यश यांचा संगम आहे. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवनवीन आव्हाने समोर उभी राहतात. या सगळ्या आव्हानांना, संकटांना सामोरे जाताना माणूस स्वतःला पुन्हा पुन्हा घडवत राहतो. असा संघर्ष वनिता यांच्या वाट्यालाही आला.
२०१०मध्ये त्यांच्या पतीचे आकस्मित निधन झाले. या दुःखात खचून न जाता, त्यांनी स्वतःला कामात गुंतवून घेतले. त्यांनी घरगुती कोचिंग क्लासेस घ्यायला सुरुवात केली, त्या माध्यमातून त्यांची अनेक महिलांशी ओळख व्हायला लागली. लहानपणापासूनच काहीतरी करण्याची धडपड आणि जिद्द त्यांच्यात होती. याच जिद्दीतून त्यांनी बचत गट चालवण्यास सुरुवात केली. आज त्या तब्बल ५० बचत गट चालवतात, त्यापैकी १५ बचत गटांचे काम त्या स्वतः पाहतात. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळे हे काम करू शकले असे त्या आवर्जून नमूद करतात.
पतीच्या निधनानंतर सासऱ्यांनी दुसऱ्या विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु तो मी स्वीकारला नाही, कारण मला समाजातील महिलांसाठी आणि तरुणींसाठी कार्य करायचे आहे, असे त्यांनी सांगितले. तेव्हा सासरे त्यांच्या पाठीशी ठाम उभे राहिले आणि त्यांचा पुढील प्रवास सुरू झाला. त्यांनी त्यांच्या दोन जाऊबाईंसह एकत्र येऊन मातृभूमी महिला विकास संस्था, भवानीनगरची स्थापना केली. त्यांच्या जाऊबाईंचा उल्लेख त्या 'मैत्रिणी' असा करतात. या संस्थेच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणाचे काम हाती घेतले आहे. बचत गट चळवळीतून महिलांना विविध उद्योग व्यवसायासाठी मार्गदर्शन केले जाते. महिलांसाठी विविध कार्यशाळा घेतल्या जातात.
संस्था कृषी, पर्यावरण, आरोग्य आणि व्यवसाय मार्गदर्शन या क्षेत्रांत काम करते. कृषी विभागाच्या 'आत्मा' योजनेअंतर्गत कृषीचे दोन महिला बचत गट स्थापन करून शासनाच्या विविध कृषी योजना या गटांच्या माध्यमातून राबविल्या जातात. महिलांना आर्थिक मदत दिली जाते आणि कमी व्याजदराने कर्ज देऊन विविध व्यवसाय सुरू करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जाते. विशेष बाब म्हणजे, या महिला स्वतःच्या कमाईतून बचत गटाचे कर्ज फेडतात आणि मासिक हप्ता भरतात. अशा प्रकारे महिला स्वावलंबी होत आहेत, याचा त्यांना आनंद वाटतो.
प्रणव क्लासेसच्या माध्यमातून मुलांना विविध विषयावरती व्याख्याने आयोजित केली जातात. त्यातून पर्यावरण रक्षण, स्पर्धा परिक्षा, विविध स्पर्धा आयोजित केल्या जातात. ग्रामपंचायत आणि संस्थेच्या वतीने विधवा महिलांसाठी हळदी-कुंकू कार्यक्रम आयोजित करून त्यांना समाजात मान मिळवून देण्याचे कामही संस्थेमार्फत केले जाते. भवानीनगरमध्ये जवळजवळ ८५% महिलांचे स्वतःचे विविध काम व व्यवसाय चालू आहेत. महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागांतर्गत सुरू असलेल्या सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेवर सध्या संस्था काम करीत आहे. विविध कार्यासाठी त्यांना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
लेखक - शीतल बसाकरे