‘जागर अहिल्यादेवींच्या कार्याचा’
प्रजाहितदक्ष अहिल्यादेवी होळकर
सती धन्य धन्य कलियुगी अहिल्याबाई । गेली कीर्ति करूनिया भूमंडळाचे ठायी ॥
महाराज अहिल्याबाई पुण्य प्राणी। सम्पूर्ण स्त्रियांमधी श्रेष्ठ रत्नचखाणी।
दर्शने मोठ्या पापाची होईल हानी । झडतात रोग पापांचे पिता पाणी ।
वर्णिती कीर्ति गातात संत ते गाणी । झाली दैवदशे ती होळकरांची राणी ॥- अनंत फंदी
जगाच्या इतिहासात उत्कृष्ट प्रशासक म्हणून नोंद घेतली गेलेल्या अहिल्यादेवी होळकर. नगर जिल्ह्यात, जामखेड तालुक्यातील चौंडी गावच्या माणकोजी शिंदे आणि सुशीलाबाई शिंदे यांचे कन्यारत्न. अठराव्या शतकातील, २८ वर्षे यशस्वीपणे राज्य सांभाळणार्याे मुत्सद्दी, धैर्यवान, शूर, चतुर, धर्मनिष्ठ, दूरदर्शी अशा बहुपेडी स्त्री राज्यकर्ती म्हणजे अहिल्यादेवी. अहिल्यादेवी यांचा राज्याचा काळ ( १७६७ - गादीवर बसून ते १७९५- निधन होईपर्यंत )म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातले सोनेरी पान. सर्वसामान्य कुटुंबातली अहिल्या एका वैभवशाली होळकर राज्याच्या स्वामींनी झाल्या.
राज्य कारभाराचे सर्व पदर मल्हाररावांनी अहिल्येला शिकविले होते. त्यातल्या खाचा खोचा शिकवल्या. आपल्या मुलाच्या खंडेरावाच्या मृत्यूनंतर पैशांचे हिशोब, वेगवेगळे राजकीय संबंध या बद्दल दोघात सल्ला मसलत, चर्चा होत असत. मल्हारराव आणि अहिल्याबाई यांना एकमेकांबद्दल आदर होता विश्वास होता. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्याबाई थोडा फार कारभार बघत होत्या. अनुभवाने शिकत होत्या. काही चुकीचे निर्णय घेतले गेले तर तिथल्या तिथे मल्हारराव स्पष्ट पणे दुरूस्ती करून काय योग्य काय अयोग्य हे सांगत. मल्हार राव आणि गौतमाबाई अहिल्येच्या पाठीशी सर्वार्थाने खंबीरपणे उभे राहिले.
मल्हारराव मोहिमेवर गेले की, सर्व कारभार अहिल्या बघत असे. मल्हाररावांच्या सूचनेनुसार सर्व व्यवस्था करीत असत. हिंदुस्थानात अब्दालीच्या करामतींच्या बातम्या कानावर येत होत्या. त्याने मथुरा वृंदावनात मुंडक्यांच्या राशी घातल्या, हे कळल्यावर त्यांनी ठरविले की, हिंदूंना आता चिरेबंद आश्रयस्थाने हवीत. त्यांनी ठिकठिकाणी धर्मशाळा बांधल्या.
ब्रिटिश चोहोबाजूंनी वाढत असता, आपल्या समाजाचे अस्तित्व टिकविण्यासाठी त्या प्रयत्न करत होत्या. संस्कृती टिकविण्याचे प्रयत्न करत होत्या. राज्यात पाणी पुरवठा सुधारणा घडवल्या. त्यांनी अन्नछत्रे उघडली, धर्मशाळा बांधल्या, चिरेबंदी विहिरी खोदल्या, राज्यातून उन्हाळ्यात प्रवास करणार्या, लोकांसाठी पाणपोया बांधल्या, पांथशाळा, आश्रयशाळा बांधल्या, मंदिरे बांधली, नद्यांवर घाट बांधले, स्त्रियांसाठी कपडे बदलण्यासाठी व सुरक्षित स्नानासाठी बंदिस्त ओवर्याब बांधल्या, वेळोवेळी आक्रमणात उध्वस्त झालेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला.
पुलांचे बांधकाम, रस्ते निर्मिती, रस्ते दुरूस्ती, डाक व्यवस्था,रायते साथी शिक्षणाची व्यवस्था ग्रंथ संग्रह व ग्रंथ निर्मिती, आरोग्यासाठी दवाखाने , औषधी बागा, शेतीसाठी सिंचना सोयी, ,माळरानावर वृक्षलागवड, आरक्षित गयरान , करप्रणाली ,विद्वान आणि कलाकार यांना राजाश्रय अशा अनेक गोष्टी केल्या.
त्यांचे कार्य इंदूर उज्जैन पर्यंतच मर्यादित नव्हते. केदारनाथ, रामेश्वर, जगन्नाथ पुरी,ते द्वारका असे चारही दिशांना होते. विशेष म्हणजे सर्व प्रांतातील माणसे जोडण्याची कला त्यांच्याकडे होती. त्यांनी गंगेचे पाणी महाशिवरात्रीला प्रांताप्रांतात कावडीने नेण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळे प्रांतीय भारत जोडला गेला. ते कुठलीही सक्ती न करता, सात्विकता या त्यांच्या गुणामुळेच.माणसांबरोबरच पशू, पक्षी, प्राणी यांचाही विचार त्या करत. त्यांच्यासाठी डोण्या, वैद्यकीय उपचाराची सोय केली होती. सर्पदंशावर उपचार करण्यासाठी हकीम व वैद्य नेमले, मुंग्या व जलचर प्राण्यांसाठी सुद्धा साखर, कणकेच्या गोळ्या असे अन्नदान त्या करीत. गोरगरिबांना सणासुदीला अन्नदान, कपडे ,थंडीपासून संरक्षण म्हणून घोंगड्या वाटप करीत.
अहिल्याबाईंच्या बुद्धीचातुर्य, मुत्सद्दीपणा,प्रजाहित दक्ष आणि धर्मपरायणतेमुळे धर्म टिकला, संस्कृती संवर्धन झाले. कलेला प्रोत्साहन मिळाले. चरीतार्थाची साधने उपलब्ध झाली. त्यांनी आपल्या सासर्यांेचे ,होळकर घराण्याचे नाव स्व -कर्तृत्वाने इतिहासात अजरामर केले.
---- डॉ. नयना कासखेडीकर ,पुणे .