रायगडावर शिवपुण्यतिथी निमित्त दुर्गसंवर्धन परिषद
खासदार सुधांशु त्रिवेदी यांची प्रमुख उपस्थिती; आनंद पाळंदे यांना 'श्रीशिवपुण्यस्मृती' पुरस्कार जाहीर

पुणे, दिनांक ३० मार्च २०२६ : किल्ले रायगड येथे १ आणि २ एप्रिल रोजी ३४६ व्या शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवछत्रपतींच्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे हे शताब्दी वर्ष असल्याने, या निमित्ताने विशेष 'दुर्गसंवर्धन परिषद' आयोजित करण्यात आली आहे. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने होणाऱ्या या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार सुधांशु त्रिवेदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान यांच्यातर्फे दिला जाणारा १५ वा 'श्रीशिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार' ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक आनंद पाळंदे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तसेच, नागपूरकर भोसले घराण्याचे वंशज श्रीमंत मुधोजीराजे भोसले आणि निवृत्त ब्रिगेडियर संग्राम मोहिते यांचाही या प्रसंगी विशेष सन्मान केला जाईल. शिवपुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला म्हणजेच १ एप्रिल रोजी मंडळ आणि श्रीशिवशंभू विचार मंचाच्या वतीने दुर्गसंवर्धन परिषद पार पडेल. यामध्ये दुर्ग अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर, डॉ. सचिन जोशी आणि राज्य पुरातत्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे यांची व्याख्याने व सादरीकरणे होणार आहेत. आदल्या रात्री गडावरील राजसभेत सन्मानित मान्यवरांच्या मुलाखतींचा कार्यक्रम होईल, तर शाहीर विक्रम अवचिते यांचा शाहिरी कार्यक्रम विशेष आकर्षण ठरेल.
- शिवभक्तांसाठी विशेष सोय
रायगडावर येणाऱ्या शिवभक्तांसाठी निवास, भोजन, न्याहरी आणि स्वच्छतागृहांची चोख व्यवस्था करण्यात आली असून महिलांसाठी स्वतंत्र सोय उपलब्ध आहे. या कार्यक्रमास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे आणि कार्यवाह सुधीर थोरात यांनी केले आहे.