
अहिल्यादेवी आणि पर्यावरण
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर या मराठा साम्राज्यातील एक आदर्श प्रशासक आणि जनकल्याणकारी राजमाता म्हणून प्रसिद्ध आहेत. यावर्षी त्यांचे ३००वी जयंती वर्ष सर्वत्र साजरे केले जात आहे. त्यांचे जीवन समाजसेवेसाठीच्या आदर्शाचा वस्तूपाठ मानले जाते. संपूर्ण भारतीयांसाठी त्यांचे सामाजिक, सांस्कृतिक योगदान मोठे आहे. त्यासोबतच पर्यावरण संवर्धन, जलव्यवस्थापन आणि निसर्गाशी सुसंवाद राखण्यामध्येही त्यांचे योगदान महत्त्वाचे होते. अहिल्याबाईंनी इ.स. १७६७ ते १७९५ या कालावधीत होळकर राज्याचा कारभार हाती घेतला आणि लोककल्याणासाठी अनेक उल्लेखनीय कार्य केले. अहिल्याबाई होळकर यांच्या काळात 'पर्यावरण' शब्द हा आधुनिक अर्थाने प्रचारात नव्हता, तरीही त्यांच्या धोरणांमधून अप्रत्यक्षपणे पर्यावरण व वनसंवर्धनास चालना मिळाल्याचे दिसते. त्यांच्या कार्यातून निसर्ग व संसाधनांचे शाश्वत व्यवस्थापन याला महत्त्व देण्यात आले होते. अहिल्याबाई होळकर यांनी अनेक धार्मिक स्थळांच्या पुनर्बांधणीसोबतच त्या परिसरात वृक्षारोपण केले. मंदिरांच्या आवारात , फळझाडे वड, पिंपळ आणि औषधी वनस्पती लावल्या गेल्या, जे पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी उपयुक्त होते. अहिल्याबाईंनी शेतकऱ्यांस मदत करून शेतीस चालना दिली व न्यायपूर्ण प्रशासन ठेवून प्रजेचे कल्याण साधले. ज्या काळात स्त्रियांवर अनेक बंधने होती, शिक्षणाची काही सोय नव्हती, सतीसारख्या कुप्रथा होत्या, राजकारणात युद्ध, लूट, कटकारस्थाने चालायची. त्या काळात अहिल्याबाईंना राज्यकारभार करण्याची संधी मिळाली आणि स्वकर्तृत्वाने त्यांनी त्या संधीचे सोने केले. धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले व हे करत असताना पर्यावरण संवर्धनाची कामे केली.
अहिल्याबाई होळकर यांचे पर्यावरण संवर्धनातील योगदान:
१. घाट आणि बारव बांधणी (कुंड आणि पाणवठे)
पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. पाण्याचे महत्त्व ओळखून अहिल्याबाईंनी पाण्याबाबत आपले धोरण आखले होते. अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक नद्यांच्या काठावर घाट आणि पाण्याच्या बारव बांधून जलव्यवस्थापनाला चालना दिली. पाण्याच्या सोयीकरता त्यांनी ठिकठिकाणी विहिरी, तळी, बारव, कुंड, नद्यांवर बंधारे बांधले. ही कामे त्यांनी त्यांच्या राज्यात तर केलीच पण विशेष म्हणजे त्यांच्या राज्याच्या सीमेबाहेर भारतभर अनेक तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणीदेखील केली. त्यांनी बांधलेल्या बारवा बहुधा चौकोनी आकाराच्या असून त्यांना दोन्ही बाजूंनी पाण्याच्या तळापर्यंत पायऱ्या असत. वाटसरूंना थेट पाण्यापर्यंत जाऊन पाणी घेता यावे म्हणून पायविहीरी तयार करण्यात आल्या. त्यांचे घाट आणि बारव बांधण्याचे काम केवळ पूजाअर्चेसाठी नव्हते, तर त्या समाजातील लोकांसाठी जलस्रोत टिकवण्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे ठरले. काशीमध्ये गंगा नदीच्या काठावर अहिल्याबाई होळकरांनी घाट बांधले. या घाटाचा उपयोग धार्मिक विधींसाठी तसेच स्नानासाठी होत असे. तसेच गोदावरी नदीच्या काठावर त्यांनी घाट बांधले, ज्यामुळे यात्रेकरूंसाठी मोठी सुविधा निर्माण झाली. हे घाट आजही ऐतिहासिक स्थळ म्हणून ओळखले जातात. महाकालेश्वर मंदिराच्या परिसरात त्यांनी शिप्रा नदीवरील घाट सुशोभित केला. कुंभमेळ्याच्या काळात या घाटाचा उपयोग यात्रेकरूंसाठी मोठ्या प्रमाणात होतो. इंदूरमध्ये त्यांनी पाण्याच्या काही कुंडांची निर्मिती केली, ज्यामुळे त्या भागात जलस्रोत अधिक शाश्वत पद्धतीने उपलब्ध झाले. यामुळे परिसर स्वच्छ राहिला आणि पाणी व्यवस्थापन सुकर झाले. अहिल्याबाई होळकर यांनी काशीतील विश्वनाथ मंदिराचा जीर्णोद्धार केला तसेच गंगा, गोदावरी आणि नर्मदा नद्यांच्या काठावर धार्मिक स्थळे बांधताना त्यांनी वृक्षाच्छादनाला महत्त्व दिले. त्यांच्या या कार्यामुळे धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून मोठा फायदा झाला.
2. सामाजिक बांधणीसाठी वने जपली
अहिल्याबाई होळकर यांनी वने ही समाजाच्या जीवनशैलीचा भाग मानली. लोकांना वनसंपत्तीचा वापर शाश्वत पद्धतीने करण्याचा सल्ला दिला. जलस्रोतांचे रक्षण करण्यासाठी नद्यांच्या आणि तलावांच्या परिसरातील झाडे तोडण्यावर अप्रत्यक्षपणे निर्बंध आणले. जलसंवर्धनासाठी वनाच्छादन टिकवणे आवश्यक आहे, हे त्यांच्या धोरणांमधून दिसते. अहिल्याबाई होळकर यांनी नद्यांच्या पावित्र्याला आणि त्यांच्याकडून मिळणाऱ्या संसाधनांच्या संवर्धनाला प्राधान्य दिले. त्यांनी गंगा, नर्मदा, गोदावरी, आणि शिप्रा अशा अनेक नद्यांच्या काठांवर घाट बांधले.
३. प्रवास मार्गांवर झाडे लावणे
रस्त्याने पायी चालणाऱ्या ओझेकऱ्यांना विश्रांती घेता यावी म्हणून त्यांनी यात्रेकरूंना सावली व विश्रांती मिळावी म्हणून प्रवासमार्गांवर झाडे लावली. धर्मशाळा बांधल्या. कामगार कारागिरांना काम मिळावे यासाठी रस्ते बांधले, रस्त्याच्या दुतर्फा ओसाड जमिनी, डोंगर या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली व त्यांची निगा राखण्याचे आदेश दिले. त्या मागे जलसंवर्धन हा हेतू होता व झाडांमुळे पर्यावरण रक्षणासही मदत झाली.
४. शेतीसाठी जैवविविधतेला चालना
अहिल्याबाईंनी शेतीतही जैवविविधतेला महत्त्व दिले. शेतकऱ्यांना झाडे लावण्याचे व ती जपण्याचे मार्गदर्शन केले. शेतकऱ्यांस २० झाडे लावावीत असा हुकूम दिला. त्यातील ११ झाडे सरकारची तर ९ झाडे शेतकऱ्यांची होती. विनापरवाना झाडे तोडणाऱ्यांस मोठी शिक्षा केली जात होती. त्यांच्या कार्यामुळे शेतीत, बांधावर झाडांची लागवड वाढली, जमिनीची धूप थांबवली गेली आणि पर्यावरणीय नुकसान कमी झाले. शेतीपूरक उद्योग सुरू केले. सूतकताई, विणकाम, वस्त्र उद्योगाला प्रोत्साहन दिले. पशूंसाठी राखीव कुरणे ठेवली जायची, पक्ष्यांसाठी उभी पिकंदेखील अहिल्याबाई विकत घेत असत. पाण्याचे प्रदूषण टाळण्याकरता अहिल्याबाईंनी नदीच्या वाहत्या पाण्याचा एक प्रवाह वेगळा काढला होता. हे पाणी स्नान धुणीभांडी, जनावरांच्या पिण्यासाठी वापरून मग शेतीसाठी वापरले जायचे. त्यांच्या या कार्यामुळे धार्मिक, सामाजिक आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून मोठा फायदा झाला.
5. निसर्गपूरक साधनांचा वापर
अहिल्याबाई होळकर यांच्या स्थापत्यकलेमध्ये पर्यावरणाशी सुसंवाद राखल्याचे दिसून येते. त्यांनी मंदिर, घाट आणि बारव बांधताना स्थानिक नैसर्गिक साधनांचा समतोल राखून वापर केला. स्थापत्यकामासाठी स्थानिक खनिजे व दगड वापरण्यात आले, ज्यामुळे अनावश्यक जंगलतोड किंवा प्रदूषण झाले नाही. मंदिर आणि घाट बांधताना स्थानिक वने आणि खनिजांचा समतोल राखत वापर केला. जलस्रोतांच्या संरक्षणासाठी संरचनांमध्ये पाणी गाळून पुनर्वापर करता येईल अशा यंत्रणा वापरल्या गेल्या.
अहिल्याबाई होळकर यांनी निसर्ग आणि माणसामधील संतुलन राखण्याचा प्रयत्न केला. त्या काळातील समाजाच्या गरजा ओळखून त्यांनी वने जपली, वृक्षारोपणाला प्रोत्साहन दिले आणि निसर्ग संवर्धनाचा अप्रत्यक्ष संदेश दिला. त्यांच्या धोरणातून आधुनिक काळातील वनसंवर्धनाच्या कार्याला प्रेरणा मिळते.
6. नद्यांचे संरक्षण आणि स्वच्छता
अहिल्याबाईंच्या काळात नद्यांना पवित्र मानले जाई, परंतु त्यांनी नद्यांचे पाणी केवळ धार्मिक कार्यांसाठी नव्हे, तर पिण्यासाठी आणि शेतीसाठीही टिकवून ठेवले. नद्यांच्या काठावर घाट आणि कुंड बांधून त्यांनी गाळ साठण्याचा प्रश्न सोडवला. पाणी प्रदूषण रोखण्यासाठी घाटांचे व्यवस्थित व्यवस्थापन करण्यात आले. काशीमधील 'अहिल्याबाई घाट' आणि उज्जैनमधील 'शिप्रा घाट' त्यांच्या दूरदृष्टीचे उत्तम उदाहरण आहेत. घाट बांधताना स्थानिक दगड आणि नैसर्गिक संसाधनांचा वापर केला जात असे, जे स्थापत्यकलेत पर्यावरणपूरक दृष्टीकोन दाखवते. घाटांमुळे पूजाअर्चेव्यतिरिक्त पाण्याचा वापर शाश्वत पद्धतीने होऊ शकला. त्यांनी अनेक बारव आणि पाण्याचे कुंड तयार केले. या पाणी साठवणुकीमुळे पिण्याचे पाणी आणि शेतीसाठी आवश्यक जलसाठा टिकवता आला. यामुळे भूजल पातळीही संतुलित राहिली.
अहिल्याबाई होळकर यांचे पर्यावरणीय योगदान हे त्यांच्या दूरदृष्टी आणि शाश्वत विचारांचे प्रतीक आहे. त्यांनी जलव्यवस्थापन, वनसंवर्धन, शाश्वत शेती आणि निसर्गपूरक स्थापत्यशास्त्राद्वारे पर्यावरणाचा समतोल राखण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या कार्यातून आधुनिक काळातील पर्यावरण संरक्षण आणि टिकाऊ विकास यांसाठी प्रेरणा मिळते. त्यांच्या योगदानामुळे त्या केवळ समाजसुधारक किंवा शासक नव्हे, तर पर्यावरण संवर्धनाच्या अद्वितीय विचारांनी प्रेरित नेत्याही होत्या. त्यांचे कार्य आजही आपल्याला निसर्ग व पर्यावरणासोबत सुसंवाद साधण्याचा संदेश देते. त्यांच्या काळातील धोरणांमध्ये नैसर्गिक संसाधनांचा शाश्वत वापर, नद्यांचे संरक्षण, वृक्षारोपण, जलस्रोत व्यवस्थापन, आणि निसर्गपूरक साधनांचा समतोल दिसून येतो.
घाट आणि बारव बांधणीमुळे केवळ धार्मिक व सामाजिक सुविधा नाही तर जलसंधारण, पर्यावरण रक्षण आणि निसर्गाच्या शाश्वत वापराला प्रोत्साहन मिळाले. त्यांनी बांधलेले व आजही उत्तम स्थितीत असलेले अनेक घाट, बारव, कुंड हे त्यांच्या कार्याचे स्मरण करून देतात. त्यांच्या द्रष्टेपणाचे द्योतक आहेत. त्यांच्या या योगदानामुळे त्या निसर्गाप्रति संवेदनशील नेत्या होत्या, असे स्पष्ट होते. 'ज्ञात-अज्ञात अहिल्याबाई होळकर' या ग्रंथाच्या लेखिका विनया खडपेकर यांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या व्यक्तिमत्त्वाचे सुंदर वर्णन केले आहे.
ती सत्ताधारी होती. पण ती सिंहासनावर नव्हती. ती राजकारणी होती. पण ती सत्तेच्या चढाओढीत नव्हती.
ती पेशव्यांशी निष्ठावंत होती. पण ती त्यांच्यापुढे नतमस्तक नव्हती. ती व्रतस्थ होती. पण ती संन्यासिनी नव्हती.
जेव्हा लढाई हे जीवन होते आणि लूट हा जेत्यांचा धर्म होता, हुकमत हा सत्तेचा स्वभाव होता तेव्हा - तिच्या कल्याणी प्रतिभेचे किरण नदीवरच्या घाटांमधून उमटले. तिच्या जीवनदायिनी प्रेरणेने तळी, अन्नछत्रे, धर्मशाळांचे रूप घेतले. तिच्या अनाक्रमक धर्मशीलतेचे मंगल प्रतिध्वनी भरतखंडाच्या मंदिरामंदिरांतून घुमले. मात्र ती सर्वगुणसंपन्न देवता नव्हती. तिला माणूसपणाच्या सगळ्या मर्यादा होत्या.
अठराव्या शतकातल्या मराठ्यांच्या इतिहासाच्या पटावर ती शुक्राच्या चांदणीसारखी लुकलुकली..."
अहिल्यादेवींना विनम्र अभिवादन
डॉ. राजेश मणेरीकर आणि चंद्रकला शिंदे
-917588065205
साभार – एकता