हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व - मुकुल कानिटकर
नाशिकशहरात संघशताब्दी मंथन कार्यक्रमाचे आयोजन

नाशिक, दिनांक २४ मे २०२६ :
"भारतभूचा पिंड आणि संस्कृती मूलतः हिंदू असून, ही सर्वसमावेशक जीवनपद्धती आहे.म्हणूनच इथे राहणारा प्रत्येक जण हिंदू असून 'हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व' आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रचार मंडळाचे सदस्य मुकुल कानिटकर यांनी केले."
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांतांतर्गत 'संघशताब्दी मंथन: परिवर्तनाच्या दिशेने' या विशेष व्याख्यानात ते बोलत होते. भोसला मिलिटरी कॉलेज परिसरातील 'डॉ. मुंजे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट'च्या सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर नाशिकचे शहर संघचालक डॉ. विजय मालपाठक व ज्येष्ठ विचारवंत प्रकाश पाठक उपस्थित होते.
मुख्य वक्ते मुकुल कानिटकर म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या मातीमध्ये हजारो वर्षांपासून ऋषीमुनींनी आपल्या रक्तसिंचनाद्वारे मानवकल्याणासाठी जे योगदान दिले आहे, त्या श्रमाचा अर्कच पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवला आहे. या भूमीने कधीही विश्वात कुणाला दगा दिला नाही. राष्ट्रीय एकात्मतेची भावना असल्याशिवाय कोणतेही राष्ट्र मजबूतपणे उभे राहू शकत नाही. केवळ व्यक्तिनिर्माणातून राष्ट्रनिर्मिती होत नाही, तर राष्ट्राच्या प्रेरणेतून व्यक्ती घडते हे सत्य आहे. हेच तत्त्व संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी ओळखले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे केवळ एक संघटन नसून ते स्वतः एक 'स्वातंत्र्य आंदोलन' होते."
प्रत्येक राष्ट्राचा एक स्वतंत्र स्वभाव असतो, हा सिद्धांत मांडताना त्यांनी स्वामी विवेकानंदांच्या मांडणीचे संदर्भ दिले. ते म्हणाले, "स्वामीजींचे निरीक्षण असे सांगते की, ब्रिटनचा स्वभाव राजकारणप्रधान, अमेरिकेचा स्वभाव व्यापारप्रधान, जर्मनी युद्धखोर, फ्रान्स सौंदर्यशील तर भारताचा स्वभाव हा धर्माधिष्ठित आहे. भारताच्या धर्माचे अधिष्ठान हे विश्वाला अध्यात्माचा संदेश देते. राष्ट्रीय चरित्र अंगी बाणवून एक समर्थ समाज उभा करणे हे आपले ध्येय आहे. भारतमातेची सेवा करणारे लाखो हात उभे राहावेत आणि 'राष्ट्र प्रथम' मानणारा माणूस समाजात निर्माण व्हावा, हीच संघाची मूळ भूमिका आहे. हिंदुत्व हे या देशाचे राष्ट्रीयत्व आहे." कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरातील विविध क्षेत्रांतील नागरिक, विचारवंत आणि स्वयंसेवक उपस्थित होते.
-----
संघाची शाखा ही स्वातंत्र्याची चळवळच -
कानिटकर म्हणाले की, "देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सहभाग होता का?" असा प्रश्न विरोधकांद्वारे उपस्थित केला जातो. याच्या उत्तराच्या अनुषंगाने असंख्य दाखले देता येतात. परंतु, माझा दावा असा आहे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चळवळ ही एक प्रकारे स्वातंत्र्य आंदोलनाचेच स्वरूप होती. कारण, संघस्थानात केवळ आणि केवळ राष्ट्रहिताचाच विचार सर्वकाळ केला गेला. या मातृभूमीला तन, मन आणि धनाच्या अर्पणाने परमवैभवाला नेण्याचे स्वप्नच संघाच्या स्थापनेपासून आजपर्यंत प्रत्येक स्वयंसेवकाने बघितले आहे.